Type to search

Featured सार्वमत

शासनाच्या निषेधार्थ आंदोलक शेतकर्‍यांनी घातला स्वतःचेच दशक्रियाविधी

Share

जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी अन्नदाता शेतकरी संघटनेचे आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरूच

भेंडा (वार्ताहर) – पैठण तालुक्यातील आपेगाव- हिरडपुरी बंधार्‍यात अर्धा टीएमसी पाणी सोडावे, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेने जयाजीराव सूर्यवंशी यांचे नेतृत्त्वाखाली दि. 13 मे पासून पैठण येथे जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी सुरू केलेले आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरूच राहिले.पाणी सोडण्याबाबत कोणताच निर्णय न झाल्याने बुधवार 15 मे रोजी आंदोलक शेतकर्‍यांनी शासनाचा निषेध करीत स्वतःचेच दशक्रियाविधी घातले.

सोमवार 13 मे पासून हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची तिसरी रात्र ही गोदावरी नदीच्या कोरड्या पत्रातच जाणार आहे.
दरम्यान बुधवार (दि. 15) आंदोलनाचा तिसरा दिवस होता. सरकारने दखल न घेतल्यामुळे नानाभाऊ वाघमोडे (गुंतेगाव), महादेव दादा बडे (टाकळी अंजन), नानासाहेब किसन भांडवलकर (टाकळी अंजन), सलिम दगडू पठाण (नवगाव), शफीक मदन पटेल (तुळजापूर) या 5 शेतकर्‍यांनी आंदोलकांच्यावतीने प्रतिनिधिक स्वरूपात स्वतःचा दशक्रियाविधी केला. जर पाणी सुटले नाही तर शेतकर्‍यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. जर आत्महत्या केलीच तर दशक्रियाविधी करण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यामुळे पाच शेतकर्‍यांनी प्रातिनिधिक स्वरूपात जीवंतपणीच स्वतःचे दशक्रियाविधी केले.

स्वतःला कार्यालयात कोंडून घेतले…
दशक्रियाविधी करून सुद्धा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी फक्त मिटिंग घेण्यात व्यस्त होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा देऊन उत्तर जायकवाडीचे पाटबंधारे विभागाचे कार्यालयात कोंडून घेतले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकर्‍यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान तहसीलदार महेश सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राठोड, पोलीस निरीक्षक श्री. देशमुख, श्री. पायघन आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री. काळे यांनी भेट घेऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. परंतु शेतकर्‍यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावून जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. उद्या दि. 16 मे रोजी दुपारी एकपर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याची माहिती अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.

दारू कंपन्यांचे पाणी बंद करा…
3 दिवसांपासून पाण्यासाठी आंदोलन करतोय. प्रशासन म्हणते धरणात पाणी नाही, त्यामुळे पाणी सोडता येत नाही. शेतकर्‍यांना प्यायला पाणी देता येत नाही मग औरंगाबादच्या देशीदारू कंपन्यांना कसे काय पाणी देता? देशी पाजून माणसं मारायचीत का? पाणी पाजल्यावर माणसंं जीवंत राहतील की देशी दारू पाजून जीवंत राहतील हे सरकारला कळत नाही का? आम्हाला प्यायला पाणी नाही, मरायची वेळ आली आहे. त्या खार्‍या पाण्याने जनावरे गाभडलीत. घरातही काही नाही, शेतात काही नाही, थेंबभर पाणी नसल्याने आता कधी तरी मरायचचं आहे. मेल्यावर दहावा कोण आणि कसा घालणार म्हणून आम्हीच आमचे जीवंतपणी स्वतःचे दहावे घेतले आहेत.
– नानाभाई वाघमोडे (आंदोलक शेतकरी)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!