Friday, April 26, 2024
Homeजळगावसुनसगावच्या गो.तु.पाटलांना वाङ्मय पुरस्कार

सुनसगावच्या गो.तु.पाटलांना वाङ्मय पुरस्कार

जळगाव – 

जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनसगाव खुर्द या 500 लोकसंख्या असलेल्या गावातील गोविंदा तुकाराम उपाख्य गो.तु.पाटील यांच्या ‘ओल अंतरीची’ या आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे याआधीदेखील सुनसगाव बु.चे कवी अशोक कौतीक कोळी यांनादेखील राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे सुनसगाव बुद्रूक व सुनसगाव खुर्द ही दोन्ही गाव शासनाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

शासनाकडून राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे. अशा लेखकांकडून या पुरस्कारासाठी विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येत असतात. 2018 या वर्षात निर्मित करण्यात आलेल्या प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2018 जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता. त्यानुसार या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 35 मराठी लेखक व साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे.

गो.तु.पाटील यांचे मुळगाव सुनसगाव खुर्द (ता.जामनेर) असून त्यांचे माध्यमिक शिक्षण कुर्‍हे पानाचे (ता.भुसावळ) येथे आपल्या बहिणीकडे (स्व.गीताबाई सुपडू पाटील) यांच्याकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यपक म्हणून ते रुजु झाले.

तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतांनाच त्यांनी मराठी साहित्यातदेखील आपले कार्य सुरु केले. याआधीदेखील श्री.पाटील यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत श्री.पाटील यांनी अनेक अडचणींवर मात करीत आपले आयुष्य खर्ची केले.

ज्या गावात जन्म झाला त्या सुनसगावात त्याकाळी कोणतीही शिक्षणाची व्यवस्था नसताना त्यांनी आपल्या चिकाटीने उच्च शिक्षण घेत मायमराठीच्या सेवेसाठी जीवाचे रान केले. त्यांच्या या कष्टाचे चिज झाले असून आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये गो.तु.पाटील यांच्या नावाचा समावेश असल्याने एका साहित्यकाला खरोखर न्याय मिळाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. गो.तु.पाटील यांनी अनेक वर्ष अनुष्टुभचे संपादकपदही सांभाळले होते. तर प्राजक्तदेशमुख यांच्या संगीत देवबाभळी या नाटकाला विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

माझ्या मनात आज संमिश्र भावना आहे ती यासाठी की , माझ्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माझे गुरु डॉ.म.सु पाटील व माझी पत्नी जिचे अगदी अलिकडेच निधन झाले आहे. या दोघांचे स्मरण होत असून मी हा पुरस्कार त्या दोघांच्या स्मृतीस समर्पित करतो व नम्रपणे स्विकारतो. – प्रा. गो.तु.पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या