जम्मू-काश्मीर: चार ठिकाणी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये 2 जवान शहीद

0

जम्मू काश्मीरमध्ये एकाचवेळी साम्बुरा, पुलवामा, अनंतनाग आणि कुपवाडा या चार ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 2 जवान शहीद झाले असून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले. तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

दहशतवादी कारवाईची दुसरी घटना अनंतनागमध्ये घडली. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले.

श्रीनगरपासून 17 किलोमीटरवर असणाऱ्या पम्पोरमध्येही दहशतवादी घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्यामुळे या भागात जवानांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

याशिवाय कुपवाडामधील एसएसपी ऑफिसजवळ ग्रेनेड सापडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. यानंतर सुरक्षारक्षकांनी ग्रेनेड जप्त केले आहेत.

काश्मीरमध्ये सध्या भारतीय लष्कराकडून CASO (कॉर्डन अॅण्ड सर्च ऑपरेशन) सुरु केले आहे.

 

LEAVE A REPLY

*