कारखान्यातील तरुण कामगाराचा मृत्यू

0

जामखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम साखर कारखान्याच्या गरम मिक्सरच्या टाकीमध्ये पडून विनोद अंकुश मोरे (वय 19 वर्षे, रा. गांधनवाडी, ता. पाटोदा) या कामगाराचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गंभीर भाजून मृत्यू झाला.

 

मयत विनोद मोरे हा परांडा तालुक्यातील चिंचपूर याठिकाणी आपल्या बहिणीकडे राहात होता. तर त्याचे आईवडील हे मुंबई याठिकाणी राहात आहेत. त्याचे मेव्हणे शिवाजी झांबरे हे हळगाव येथील जयश्रीराम शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड या कारखान्यात नोकरीस होते. यामुळे विनोद देखील पंधरा दिवसांपूर्वी (दि. 12 नोव्हेंबर रोजी) या कारखान्यात उत्पादन विभागात कामाला लागला होता. नेहमीप्रमाणे 1 डिसेंबरच्या रात्री तो कामगारांसमवेत (सेंट्री फुगल) साखर प्रक्रियेद्वारे बाहेर पडते, त्या ठिकाणी असलेल्या मिक्सरजवळ काम करत होता.

 

 

यावेळी त्याचे इतर कामगार हे वरील मजल्यावर काम करत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विनोद अंकुश मोरे (वय 19 वर्षे) हा मिक्सरजवळ काम करत आलेल्या टाकीत पडला. यावेळी अचानक आवाज झाल्याने वरील कामगार धावत मिक्सरच्या टाकीकडे आले व त्याला ओढून बाहेर काढले व तातडीने त्यास उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटना घडल्याची माहिती समजताच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. हर्षल डोके, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब पोकळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी कारखान्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

विनोद मोरे या तरुणाचा कारखान्यात काम करत असताना मृत्यू झाल्यानंतर कारखान्याने त्याच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयाची मदत जाहीर केली.

LEAVE A REPLY

*