Tuesday, April 23, 2024
Homeनगरजामखेड दुहेरी हत्याकांड; एकास जन्मठेप

जामखेड दुहेरी हत्याकांड; एकास जन्मठेप

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची राजकीय वाद तसेच पोस्टर फाडल्याच्या रागातून साडेचार वर्षापूर्वी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने यातील एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर 13 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

- Advertisement -

आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव या 13 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 28 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी जामखेड शहरात ही घटना घडली होती. शहरातील बीड रोडवर छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारासमोर एका हॉटेलमध्ये राळेभात बंधु चहा पित असताना त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या होत्या.

या खटल्यात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली होती. श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांच्या समोर खटल्याची सुनावणी पुर्ण झाली. या खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. गोविंद गायकवाड यास दोषी धरून जन्मठेप, तसेच 10 हजाराचा दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, हत्यार कायद्यानुसार सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. तर इतर 13 जणांविरोधत सक्षम पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या