जामखेड मर्चंट बँकेत बनावट सोने तारण घोटाळा

0

अध्यक्ष, संचालक, कर्जदार व सराफासह 17 जणांवर गुन्हे दाखल

जामखेड (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बँकेने मान्यता रद्द केलेल्या शहरातील जामखेड मर्चंट बँकेत दहा लाखांच्या सोनेतारण घोटाळ्याप्रकरणी जामखेड मर्चंट बँकेचे अध्यक्ष दिलीप बाफना यांच्यासह दोन संचालक, एक नगरसेवक, तीन कर्जदार व आठ सराफ व्यवसायिक अशा 17 जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोने कर्जदार कैलास दिनकर मुरूमकर, श्रीनिवास बबनराव देशमुख, शितल हरिश्चंद्र सोळंकी, गोल्ड व्हॅल्युअर शाम गणेश पंडित, बँक मॅनेजर विनय लिलाचंद मंडलेचा, बँक कर्मचारी राजेंद्र दिनकर मुरूमकर,बँकेचे अध्यक्ष दिलीप चांदमल बाफना, संचालक महेश सदाशिव नगरे,सराफ व्यवसायीक अनिल बजरंग चिंतामणी, दयानंद सुभाष कथले, श्रीकांत कुलथे,संकेत चंद्रकांत ढाळे, नगरसेवक अमित अरुण चिंतामणी, अमोल विलास चिंतामणी, मोहन शंकरराव ढाळे, सतीश माधवराव कुलथे, ज्ञानेश्वर सुरेश कुलथे अशा एकूण 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बँकेने सन 2014 मध्ये खातेधारकांना सोनेतारण कर्ज दिले होते. त्यापैकी तीन कर्जदार यांनी कर्जाची रक्कम भरवून त्याचे सोने सोडवून घेतले नाही. संचालक मंडळाने त्यांना वारंवार नोटीस पाठवून देखील त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे संचालक मंडळाने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन बँकेकडे तारण असलेले सोन्याचा लिलाव घोषित केला. लिलावाची प्रक्रिया राबवत असताना तीन कर्जदाराचे सोनेच खोटे असल्याचे आढळून आले व एका कर्जदाराचे सोन्याचे वजन कमी भरले.
तीन कर्जदाराचे सोने खोटे असल्यामुळे बँकेने 31 मार्च 2016 अखेर 9 लाख 91 हजार 668 रुपये अधिक व्याज इतक्या रकमेचे नुकसान झाले. त्याप्रमाणे तीन कर्जदार, बँकेचे अधिकृत सोने तारण व्हॅल्युअर, तत्कालीन व्यवस्थापक व सोने तारण कर्जाचे करारनाम्यावर सही करणारे बँकेचे संबंधीत कर्मचारी यांनी बँकेची फसवणूक केली आहे. बँकेत खोटे सोने तारण ठेवणारे खातेदार- कैलास दिनकर मुरूमकर (रा. साकत) यांनी ठेवलेले खोटे सोने 110 ग्राम निवळ वजन 100 ग्रॅम, श्रीनिवास बबनराव देशमुख (रा. जामखेड) खोटे सोने 125 ग्रॅम निव्वळ वजन 118 ग्रॅम,
शीतल हरिशचंद्र सोळंकी (रा. जामखेड) खोटे सोने 162 ग्रॅम निव्वळ वजन 150 ग्रॅम, दि 31 मार्च 2016 रोजी वरील तिघांपैकी- कैलास दिनकर मुरूमकर यांच्याकडे मुळ कर्ज 2 लाख व व्याज 79 हजार 571 असे एकूण 2 लाख 79 हजार 571, श्रीनिवास बबनराव देशमुख यांच्याकडे मूळ कर्ज 2 लाख 10 हजार व व्याज 83 हजार 375 असे एकूण 2 लाख 93 हजार 375, शीतल हरिशचंद्र सोळंकी यांच्याकडे मूळ कर्ज 3 लाख त्यावरील व्याज 1 लाख 18 हजार 722 असे एकूण 4 लाख 18 हजार 722 इतकी थकबाकी आहे.
वरील कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने लिलावप्रक्रिया राबविण्यासाठी दि 24/09/2015 रोजी लिलाव प्रक्रिया करताना हे सोने खरेदी करण्यासाठी हजर असलेल्या सराफाना हे सोने खोटे असल्याचे निर्दशनात आले. बँकेने अधिकृत सोनार शाम गणेश पंडित (रा. जामखेड) यांची नेमणूक केलीली होती. त्यांनी सदरचे सोने खोटे असताना देखील ते खरे असल्याचे व वजन कमी असताना प्रत्यक्षात ते जास्त असल्याचे प्रमाणपत्र दिले. हे सोने खरे खोटे असल्याची खात्री न करता तत्कालीन व्यवस्थापक विनय लीलचंद मंडालेच्या व सोने तारण कर्जाचे करारनाम्यावर सह्याअसणारे कर्मचारी राजेंद्र दिनकर मुरूमकर यांचा यात समावेश येत आहे.
लिलाव प्रक्रिया राबण्याच्या वेळी हजर आसलेल्या संचालकांनी बँकेच्या तिजोरीतुन सोने बाहेर काढल्यानंतर ते दोन पंचा समक्ष पंचनामा करून उघडायला हवे होते. परंतु लिलावाच्या वेळी हजर असलेल्या संचालकांनी ही प्रक्रिया राबवली नाही. पंचनामा करताना दोन तटस्थ पंच न घेता लिलावात सोने खरेदी करण्यास उत्सुक आसलेले वरील आठ सराफ पंच म्हणून घेतले. सदरचे खोटे असतानादेखील सराफांनी ताबडतोब पोलिसांना कळवले नाही. तसेच बँकेत अफरातफर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही माहिती रिजर्व्ह बँकेला देणे बंधनकारक असतानाही त्यांना कळवले नाही.
लिलावाच्या वेळी सोने खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँक व्यवस्थापण व संचालकांनी या बाबत पंचनामा केला नसल्याचे लेखा परीक्षणात निदर्शनास आले. ही बाब व्यवस्थापण व संचालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नंतर मागील तारखेचा पंचनामा करून त्या लिलावात सहभागी आसलेल्या आठ सराफांनी पंचनामा खोटा असुनही त्यावर सह्या केल्या.
या वरुन लिलावात सहभागी असलेले व नंतर पंचनाम्यात सह्या करणारे सराफांच्या संगनमतातुन बँकेची एकुण 9 लाख 91 हजार 668 फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे लेखापरीक्षक अजय नंदलाल राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सतरा जणांनवर जामखेड पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

*