अखेर जामगाव सरपंचांविरूध्द अविश्‍वास ठराव मंजूर

0

जिल्हाधिकार्‍यांनी सुनावला फैसला

पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील जामगाव येथील सरपंच विजय बांगर यांनी आपल्यावर आलेल्या अविश्‍वास ठरावावर जिल्हाधिकार्‍यांकडे अपिल दाखल केले होते. त्याचा निकाल सोमवार (दि.7) रोजी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी सुनावला असून विवाद अर्ज नामंजूर केला. यामुळे सरपंचांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे. यावर सरपंच बांगर काय भूमिका घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
जामगावमध्ये मनमानी कारभार करून सदस्यांना विश्‍वासात घेत नसणे, ग्रामपंचायत कार्यालयात वेळ देत नाही यासह ठरल्याप्रमाणे अडिच वर्षांनंतर राजीनामा दिला नाही, असे आरोप करत 3 विरूध्द 8 सदस्यांनी सरपंच बांगर यांच्याविरूध्द 17 जून 2017 रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्‍वास ठराव आणला होता. मात्र अविश्‍वास ठराव प्रोसेडिंगमध्ये केलेल्या आरोप चुकीचे असून चौकशी करावी तसेच अविश्‍वासात अनेक चुका असल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.
तब्बल दिड महिन्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अविश्‍वास ठरावाची प्रक्रीया योग्य असल्याचे सांगत सरपंच बांगर यांचा विवाद अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे सरंपचाअभावी रखडलेले विकासकामे पूर्णत्वास जातील, असा विश्‍वास पॅनलप्रमुख सुरेश धुरपते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी,जामगावचे उपसरपंच सुरेखा शिंदे, ग्रा.पं.सदस्य दिनकर सोबले, माजी सरपंच सुमन धुरपते, पुष्पाताई माळी यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केला. अविश्‍वास दाखल केलेल्या सदस्यांचे काम अ‍ॅड. नंदकुमार देशमुख यांनी काम पाहिले.

दोन दिवसांपूर्वी बांगर यांनी मात्र अविश्‍वास आल्यास उच्च स्तरावर अपिल दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर काय निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर सरपंच निवड करून गावाला वेठीस धरू नये, अशी मागणी ग्रामस्थांमधून येत आहे. 

LEAVE A REPLY

*