Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जलशक्ती’च्या पहिल्या पंधरवड्यात नगर प्रथम

Share

जिल्हाधिकारी द्विवेदी : लोकसहभाग आणि शाळांचा सहभाग सर्वाधिक

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान (गडA) राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येत असून एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली आहे. देशातील 256 जिल्ह्यांत हे अभियान राबविले जात असून पहिल्या पंधरवड्यात लोकसहभ आणि शाळांचा सहभाग यात नगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक गाठला आहे.

श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि संगमनेर तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे. जलसंधारण व रेनवॉटर हार्वेस्टींग, परंपरागत जलस्त्रोतांचे नूतनीकरण, बोअरवेल व विहीर पुनर्भरण, पाणलोट क्षेत्रविकास आणि वृक्षलागवड आदी बाबींवर या अभियानात भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी कामास सुरुवात केली आहे. अधिकाधिक लोकसहभाग या अभियानात मिळावा, यासाठी तालुका व ग्रामपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी लोकसहभाग, विविध संस्था-संघटनांच्या पुढाकाराने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. वृक्षदिंडीसारखे उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले जात आहेत.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मंगळवारी विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यात शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टींग आणि अभियानाच्या विविध उपक्रमात लोकसहभाग, वृक्षलागवड, बोअर व विहीर पुनर्भरण, शोषखड्डे घेणे आदी कामांबाबत नियोजन आराखड्यावर चर्चा केली. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी ठाकरे यांच्यासह पाच तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी, साखर कारखाने, विविध खासगी शाळा-महाविदयालये, हॉस्पिटल्स, सहकारी संस्थांची कार्यालये आदींनी त्यांच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टींग करण्यासंदर्भात संबंधितांचा सहभाग घेण्याच्या सूचना केल्या. विविध संस्था, संघटना या कामात स्वताहून पुढाकार घेत आहेत. त्यांच्यासह इतर संस्था आणि नागरिकांनीही जलसंवर्धनाच्या या अभियानात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, यासाठी विविध दिवशी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. येत्या 20 जुलैला शालेय विद्यार्थी आणि इको क्लब दिवस साजरा केला जाणार आहे. पर्यावरण जागृती आणि जलसंवर्धनासाठी जाणीवजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दि. 22 जुलै रोजी क़ॉलेज कॅम्पस डे, दि. 29 जुलै रोजी समर इन्टर्नस् डे (राष्ट्रीय सेवा योजना/राष्ट्रीय छात्र सेना / नेहरु युवा केंद्र यांचा सहभाग), दि. 15 ऑगस्ट रोजी साखर कारखाना दिवस, दि. 17 ऑगस्ट रोजी माजी सैनिक व सेवानिवृत्त दिवस, दि. 24 ऑगस्ट रोजी सरपंच मेळावा, दि. 31 ऑगस्ट रोजी स्वयंसहायता समूह मेळावा आणि दिनांक 3 सप्टेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र मेळावा असे कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!