समायोजनेचा घोळ संपता संपेना

न.पा, महापालिकेच्या अतिरिक्त शिक्षकांच्या पहिल्याच दिवशी हरकती

0

जळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग व शिक्षक समायोजन प्रक्रिया चांगलीच चर्चेत आहे. त्यात नगर पालिका व महानगरपालिकांमधील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया गेल्या चार महिन्यापासून रखडतच असतांना अचानक 11 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रक्र्रियेत पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा ही प्रक्रिया लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत हे समायोजन पूर्ण करायचे आहे.

अन्य कार्यक्रमातून वेळ मिळेना

नगर पालिका व महापालिका अशा सुमारे 13 शाळांमधील 70 अतिरिक्त शिक्षक असून 120 जागा रिक्त आहे. या जागांवर या शिक्षकांचे समायोजन करायचे आहे. अशा स्थितीत गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, रिक्त पदे, संच मान्यता याची माहिती घेण्यात बराच कालावधी गेला. शिवाय 2015-2019 अशा चार वर्षांची एकत्रित संचमान्यता आहे. त्यातच जानेवारी महिन्यात शिक्षणाची वारी हा उपक्रम असल्याने या उपक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षण विभागाचा वेळ गेला. त्यानंतर फेबुवारीच्या पहिल्या आठवड्यात उदबोधन कार्यक्रमामुळे तिथे अधिकारी वर्ग अडकला. त्यामुळे ही समायोजनाची प्रक्रिया अधिकच रखडत गेली. अखेर कोणाला काहीही कल्पना न देता अचानक 11 फेब्रुवारी रोजी बाहेर याद्या लावण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅप द्वारे हा कार्यक्रम प्राप्त झाला. त्यामुळे मंगळवारी हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी काही शिक्षकांनी शिक्षणाधिकार्‍यांची भेटही घेतली मात्र तरीही कार्यक्रमाची कल्पना देण्यात आली नाही.

दोन दिवस मागविल्या शिक्षकांकडून हरकती

समायोजन प्रक्रिया कार्यक्रमास 11 फेबु्रवारीपासून सुरूवात झालेली आहे. यात 12-13 रोजी हरकती मागविण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी सुमारे वीस ते पंचवीस हरकती प्राप्त झाल्याची माहिती आहे. यात सेवा ज्येष्ठता यादीत नाव खाली वर झाल्याने अतिरिक्त ठरविण्यात आले, कला व 2012 च्या निर्णयानुसार भरतीच नसल्याने कार्यानुभव शिक्षकांना अतिरिक्त न ठरविण्याचे आदेश असताना त्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले, यासह काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ असतानाही त्यांचा समावेश करण्यात आला.

याशिवाय संवर्गातील काही चुका अशा हरकती नोंदविण्यात आल्या आहे. शाळांनी याद्या बरोबर पाठवूनही प्रशाकीय पातळीवरी चुका झाल्या तर काही प्रकरणात शाळांनीच चुकीच्या याद्या पाठविल्याची माहिती आहे. एकीकडे शिक्षक प्रतिक्षेत असतांना पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने 20 फेबु्रवारीपर्यंत हे समायोजन होईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 15 फेबु्रवारी रोजी शिक्षण अधिकार्‍यांच्या दालनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकतींवर निर्णय घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*