maharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय

# Video #जळगावला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार

जळगाव । जळगावची भूमी गौरवशाली आहे. जळगावला सोनेरी नगरी म्हणून ओळखले जाते. जळगावचा हा मान सन्मान जळगावला परत मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. यापुढे जळगाव महापालिका कर्जबाजारी म्हणून ओळखली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते जळगाव येथील विजय संकल्प सभेत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरिश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभेचे उमेदवार आ.उन्मेश पाटील, आ.राजूमामा भोळे, आ.किशोर पाटील, आ.स्मिता वाघ, माजीमंत्री सुरेशदादा जैन, जि.प. अध्यक्षा उजवला पाटील, महापौर सीमा भोळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक गल्लीची नसून, दिल्लीची आहे. देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. काँग्रेसचे सरकार दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी होते, मात्र मोदी सरकारने पाच वर्षात देशात परिवर्तन केले. सामान्य नागरिकांत परिवर्तन झाले, गरीबात परिवर्तन होऊन स्वाभिमानाने देश उभा राहिला आहे. 80 हजार कोटी रुपये जनधनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

काँग्रेसच्या दलालांचे जाळे तोडण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 98 टक्के घरात शौचालये बांधली आहेत. 13 कोटी कुटुंबांना मोफत शौचालये देण्यात आली. महाराष्ट्रात 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पाच लाख घरे पूर्ण झाली आहेत. 72 लाख शेतकर्‍यांना 4700 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. भारताने हल्ला केल्याचा पुरावा मागणारे दोनच घटक होते ते म्हणजे पाकिस्तान आणि काँग्रेस- राष्ट्रवादीची महाखिचडी. त्यांचा जाहीरनामा म्हणतो, पाकशी युद्ध नको, चर्चा करू.

देशद्रोहाचे कलम 124 अ काढण्याचे काँग्रेस म्हणणे आहे. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना मतदान करणार का, असा सवाल त्यांनी जनतेला केला. कोण खासदार होणार हे महत्वाचे नाही, हा देश राहिला पाहिजे. भारत राहिला पाहिजे. देशविरोधींचा नायनाट करावा म्हणून नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीवर कडाडून टीका करतांना फडणवीस यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले. माढाची मॅच मी खेळणार असे सांगितले. माढा मतदारसंघामध्ये पॅड बांधून गेले. मात्र, नरेंद मोदींच्या बॉलिंगने आपण त्रिफळाचित होणार या भीतीने ते 12वे खेळाडू म्हणून मागे परतले, अशी टीकाही त्यांनी पवार यांचे नाव न घेता केली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी गरिबांना 72 हजार रुपये देऊ, असे सांगितले. मात्र, राहुल गांधी यांना हे पैसे कुठून येतील हे त्यांना सांगता आले नाही. नरेंद्र मोदींच्या काळात विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. शौचालये, 34 कोटी लोकांना बँकेचा लाभ मिळतोय, उज्वला गॅस योजनेचा लाभ महिलांना झाला आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भाषणे झालीत.

वाघ दाम्पत्यांची व्यासपीठावर उपस्थिती
जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभेच्या सुरुवातीला आ.स्मिता वाघ व्यासपीठावर आल्या व मागील खुर्चीवर बसल्या. ना.महाजन मनोगत व्यक्त करण्यासाठी उठल्यानंतर जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे व्यासपीठावर आले. त्यांना खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर काहीशी नाराजी दिसत होती. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा लता बावीस्कर यांनी भाजपात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!