Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय

यावल उपनगराध्यक्षपदी राकेश कोलते

Share
यावल । येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश मुरलीधर कोलते यांची आठ विरुद्ध नऊ मतांनी पालिकेच्या विशेष सभेत निवड झाली. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पद निवडीसाठीच्या विशेष सभेत आज विरोधी गटाने पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर मात करून पालिकेत विषय समिती सभापतीसह उपनगराध्यक्ष पदाचे रूपात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी महर्षी विकास महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश कोलते यांचे सह काँग्रेसतर्फे ऐनवेळी शेख साईदाबी हरून यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. काँग्रेसने शेख असलम शेख नबी यांचे उमेदवारी अर्जाची घोषणा करून पक्षाचे सदस्यांना शेख असलम नबी यांना मतदान करणे विषयीचे पक्षादेश दिले होते. मात्र शेख असलम नबी हे शहरात नसल्यामुळे काँग्रेस ऐनवेळी शेख सईदाबी हारुन यांची उमेदवारी दाखल केली.

उपनगराध्यक्षपदासाठी राकेश कोलते व शेख सईदाबी हरून असे दोन अर्ज प्राप्त झाल्यामुळे पीठासीन अधिकारी श्री.हिरे यांनी सदरचा विषय मतदानासाठी ठेवला असता, राकेश कोलते यांचे बाजूने नऊ सदस्यांनी हात वर करून त्यांना मतदान केले. तर शेख साईदाबी हारून यांचे बाजूने नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांचेसह एकूण आठ सदस्यांनी मतदान केले. शेख असलम शेख नबी सभागृहात उपस्थित नसल्यामुळे पिठासीन अधिकारी श्री.हिरे यांनी शिपाई मार्फत शेख असलम नबी यांना सभागृहात हजर होणे संदर्भात बाहेर व्हरांड्यात पुकारा करण्यात आला.

मात्र शेख असलम शेख नबी हे अखेरपर्यंत सभागृहात उपस्थित झाले नाहीत. पालिकेत सर्वाधिक सात सदस्य असलेल्या सत्तारूढ गटातील काँग्रेसला यामुळे नामुष्की पत्करावी लागली आहे. पालिकेत सत्तारूढ गटाचे पुरेसे संख्याबळ असतानाही विरोधी गटातर्फे यावल शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील यांनी उपनगराध्यक्षपदी महर्षी व्यास आघाडीचे गटनेते राकेश कोलते हेच उपनगराध्यक्ष होतील असा दावा यापूर्वीच केला होता. पुरेसे संख्याबळ नसताना माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांची जादू यावेळी चालली आठ दिवसापासून राकेश कोलते उपनगराध्यक्ष होतील असे छातीठोकपणे अतुल पाटील सांगत होते तो अंदाज आज शेख असलम शेख नबी यांच्या अनुपस्थितीमुळे खरा ठरला आहे. राकेश कोलते यांचे उमेदवारी अर्जसाठी नौशाद तडवी यांनी सूचक म्हणून तर पौर्णिमा फलक यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती.

तर शेख सईदाबी हारून यांच्या उमेदवारी अर्ज साठी मनोहर सोनवणे यांनी सूचक तर रजीयाबी गुलाम रसूल यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. उपनगराध्यक्षपदी राकेश कोलते यांची निवड जाहीर होताच सभागृहाबाहेर समर्थकांनी फटाके उडवून जल्लोष केला. सभागृहात सभेच्या कामकाजात कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र देवरे, तुषार सोनार, राजेंद्र गायकवाड यांनी सहकार्य केले.महर्षी व्यास आघाडीतील सदस्य प्रा. मुकेश येवले, कल्पना वाणी, अभिमन्यू चौधरी यांनी आतापर्यंत सत्तारूढ गटासोबत राहून त्यांना सहकार्य केले होते. मात्र महर्षी व्यास आघाडीतर्फे या सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आल्यामुळे व यापूर्वीच पक्षादेश झुगारल्या प्रकरणी दोन सदस्यांना पद गमवावे लागल्यामुळे उपरोक्त तिघे सदस्यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडत महर्षी व्यास आघाडीचे गटनेते श्री.कोलते यांचे बाजूनेच मतदान केले हे विशेष.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षा सौ.सुरेखा कोळी या आमच्या बाजूने मतदान करतील अशी अपेक्षा होती. कारण नगराध्यक्ष निवडणुकीवेळी त्यांना आम्ही तन-मनाने सहकार्य केले होते. मात्र त्यांनी काँग्रेस उमेदवार यास मतदान करून आमच्याशी कृतघ्नपणा केला आहे. याबद्दल आमचे मनात खल आहे मात्र काही असो या निवडणुकीत आम्ही तयार केलेली रणनीति यशस्वी ठरली असून येणार्‍या काळात शहराचा थांबलेला विकास गतिमान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया निवडणुकीनंतर सभागृहाबाहेर माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील यांनी दिली.

मी उपनगराध्यक्ष होणे ही अतुल पाटील यांनीच रणनीती आखली होती व त्या रणनीतीचा विजय झाला. त्यांचे धडाकेबाज निर्णयांमुळे मनपाचे सहकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या बळावर हा विजय प्राप्त झाला आहे. गेल्या बारा वर्षापासून उपनगराध्यक्ष पदावर लेवा पाटीदार समाजाची वर्णी लागली नव्हती. मात्र माजी नगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे गटनेते अतुल पाटील यांचेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळाला त्याचा आनंद आम्हाला आहे. या पदाचा उपयोग शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी करू व विकासासाठी सुद्धा नक्की सकारात्मक भूमिका ठेवू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांनी दिली.

काँग्रेस पार्टीने मी उपनगराध्यक्ष होण्यासाठी व्हीप बजावला होता. मात्र माझी उमेदवारी डावलून दुसर्‍या नगरसेवकास उमेदवारी देण्यात आली. माझ्या नावाचा पक्षादेश त्यांना प्रसिद्ध करता काढला होता. प्रत्यक्ष मी उमेदवारी करीत असताना मला सूचक व अनुमोदक म्हणून कुठलेही काँग्रेस सदस्याने स्वाक्षरी केली नाही. माझ्याशी विश्वास घात केला आहे म्हणून मी नाईलाजाने निवडीवेळी अनुपस्थित राहिलो. मी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असूनही काँग्रेसचेच काम करणार आहे. सतत दोन वर्षे पक्ष बाजूला ठेवून शहर विकासासाठी शिवसेना नगराध्यक्ष सुरेखा कोळी सोबत नगरपालिकेमध्ये सोबत होतो. मात्र दोन वर्षांमध्ये मुस्लिम प्रभागांमध्ये कुठलेही विकासात्मक कामे झाली नाही म्हणून सत्ताधारी गटावर मी नाराज होतो तर ठरल्याप्रमाणे सहा सहा महिन्याने उपनगराध्यक्ष वाटप करण्याचे ठरले होते, तसे न होता राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी सलग दीड वर्षापर्यंत उपभोगले. यामुळे मुस्लिम समाजावर अन्याय झाला अशी प्रतिक्रिया शे.असलम शे.नवी यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!