Type to search

जळगाव

शालेय समितीच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा होणार

Share

जळगाव । जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची पद्धती यावर्षापासून पुन्हा बदलविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे न देता आता थेट शालेय समितीमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता आठवडाभरात गणवेशाचा निधी शिक्षण विभागामार्फत खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यानंतर साधारण पंधरा दिवसात गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यात येत असतात. गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी व आईच्या जॉईंट खात्यावर पैसे टाकले जात होते. परंतु, यात बँकांच्या नियमांमुळे गणवेश मिळण्यात अडचणी येत होत्या.

किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी यात यंदा बदल करण्यात आला असून, पुर्वीप्रमाणे गणवेश देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार या शैक्षणिक वर्षापासून शालेय समितीमार्फत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय, प्रति गणवेशासाठी देण्यात येणार्‍या चारशे रूपयांमध्ये शंभर रूपये कमी करून आता दोन गणवेशांसाठी सहाशे रूपये देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

गणवेश शिलाईसाठी टेंडर
जिल्ह्यात 1 लाख 56 हजार 177 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे. प्रति विद्यार्थी सहाशे रूपयांप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासाठी 9 कोटी 37 लाख 6 हजार रूपये इतका निधी लागणार आहे. गणवेशासाठीचा निधी शिल्लक निधीतून खर्च करण्याचे आदेश आहे. त्यानुसार सदर निधी पुढील आठवड्यात प्रत्येक शालेय समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हा निधी वर्ग केल्यानंतर गणवेश शिलाईसाठी टेंडर काढून ते काम दिले जाणार आहे. प्रत्येक शाळेसाठीचा निधी मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांला गणवेश दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ड्रेस कोड देणार
पूर्वी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शून्य टक्क्यावर खाते उघडण्याचे बँका टाळाटाळ करीत होत्या. आता शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक समिती यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना दोन ड्रेस मोफत देण्यात येणार आहे. जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांना एकच ड्रेस कोड देण्याचा मानस आहे. त्यामुळे जि.प.शाळेमधील विद्यार्थी एकसमान लक्षवेधी दिसतील.
-पोपट भोळे, शिक्षण सभपती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!