Type to search

उद्भव प्रमाणपत्राअभावी 80 कामांना ब्रेक!

maharashtra जळगाव

उद्भव प्रमाणपत्राअभावी 80 कामांना ब्रेक!

Share
जळगाव । टंचाईच्या कामांसाठी उद्भव प्रमाणपत्राअभावी जिल्ह्यातील 80 प्रकरणे भूजल सर्वेक्षण विभागाकडे गेल्या दोन-तीन महिन्यापासून धूळखात पडलेली आहेत. जिल्ह्यात टंचाई गंभीर स्थिती असतांना हे दाखले एक ते दोन दिवसात देणे अपेक्षित आहे. मात्र, भूजल सर्वेक्षणच्या अधिकार्‍यांच्या आडमुठ्याधोरणाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल तीन महिन्याच्या कालावधी उलटूनही उद्भव दाखले देण्यात आलेले नाही. परिणामी या कामांना ब्रेक लागल्याने टंचाईच्या झळा अधिकच गडद झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेमार्फत टंचाईची लहान मोठ्या तीन लाखांखालील योजनेच्या प्रस्तावासाठी भूजल सर्वेक्षण विभागाव्दारे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याचा उद्भव दाखला लागतो. त्याशिवाय टंचाईच्या संबंधित गावातील उपाययोजनाबाबत इस्टेमेट सादर करता येत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या भूजल सर्वेक्षणच्या अधिकार्‍यांनी टंचाईची बाब म्हणून त्याला प्राधान्यक्रम देऊन उद्भव दाखले त्वरीत देणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या झळा जनतेला मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागल्या. तसेच पाण्यासाठी रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागत आहे. उद्भव दाखल्याअभावी जिल्ह्यातील 80 टंचाईचे विषय यामुळे प्रलंबित राहिल्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

जिल्हभरातील विहीर खोलीकरण आणि इतर दोन ते तीन लाखांची टंचाईची कामे मार्गी लागली नाही. त्यामुळे संबंधित गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कि.मीच्या वरती उद्भव असेल तर भूजल सर्वेक्षणच्या संचालकांचा दाखल्याची आवश्यकता भासते. मात्र संचालकांनीही जिल्ह्यातील टंचाईस्थिती लक्षात घेवून दाखले त्वरीत देणे गरजेचे होते. मात्र त्यांनीही टंचाईच्या या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत तब्बल तीन महिने उद्भव दाखले देण्याचे कष्ट घेतलेले नाही. त्यामुळे टंचाईस जबाबदार असणार्‍या या भूजल सर्वेक्षणच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली आहे. भूजल सर्वेक्षणच्या दाखल्याशिवाय कामे होणे शक्य नसल्याने या अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील परिस्थिती पाहता याठिकाणी प्रत्यक्ष येऊन दाखले देणे अपेक्षित होते. मात्र भूजल सर्वेक्षणच्या अधिकार्‍यांच्या बेजाबदारपणामुळे जिल्ह्यात टंचाई वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा बु., पिंपळकोठा प्र.चा, सावदा प्र.चा.,विखरण, उमरदे, सोरटका आदी उद्भव गावातील टंचाईच्य कामांचे उद्भव प्रमाणपत्र तीन महिन्यापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना कोसो दूर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. परंतु त्यांचे या अधिकार्‍यांना सोयरसुतक काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!