शालार्थ आयडी, बोगस मान्यताप्रकरणी चौकशी होणार

10 मार्चपर्यंत कागदपत्र सादर करण्याचा शिक्षण विभागाला अल्टीमेटम
शालार्थ आयडी, बोगस मान्यताप्रकरणी चौकशी होणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शालार्थ आयडी,बोगस मान्यता आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये शिक्षण विभागात सावळा गोंधळ निर्माण झाल्याच्या संशय आहे.

याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून चौकशी सुरु झाली असून धुळ्यापाठोपाठ जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील घोटाळ्याची समिती मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातून शालार्थ आयडी, बोगस मान्यता देण्यात आलेल्या असल्याची बाब समोर आली आहे. या मान्यता प्रस्तावांचे कोठेही रेकॉर्ड नसून आवक-जावक नोंदी देखील करण्यात आलेल्या नाहीत.

केवळ त्या प्रस्तावांवर एकाच स्वाक्षरीवर मान्यता कशी देण्यात आली? महत्वाचे शैक्षणिक कागदपत्रांचे रेकॉर्ड न ठेवणे यासह विविध तक्रारी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी केलेल्या तपासणीमध्ये पुढे आलेल्या आहेत.

दरम्यान, 15 फेब्रवारी रोजी शिक्षण उपसंचालकांंनी जळगावात येऊन माध्यमिक शिक्षण विभागात बैठक घेऊन शिक्षण विभागाची झाडाझडती घेतली. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागातील बहुतांश रेकॉर्ड जप्त केले असून जप्त केलेल्या रेकॉर्डची संपूर्ण माहिती त्यांनी 10 मार्चपर्यंत सादर करण्याचा अल्टीमेटम शिक्षण विभागाला दिला आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दणका

शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी 15 फेब्रवारी रोजी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात बैठक घेतली होती. या बैठकीत शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील हे अनुपस्थित होते.

त्यामुळे माधमिक शिक्षणाधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांच्या कारवाईमुळे माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये चलबिचल निर्माण होऊन भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.

समितीमार्फत चौकशी होणार

धुळ्यात देखील मोठ्या प्रमाणावर शालार्थ आयडी, बोगस मान्यतांचा विषय पुढे आलेला आहे. तोच कित्ता जळगावच्या माधमिक शिक्षण विभागाने केला असून शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी तडकाफडकी समिती नेमूण धुळ्यातील चौकशी लावली आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर या समितीकडून जळगावातही चौकशी करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com