सीईओंसमोर अपेक्षापूर्तीचे ओझे !

करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीडवर्षानंतर प्रथमच जि.प. सर्वसाधारण सभा शुक्रवारी ऑपलाईन झाली.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नूतन सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्यावर सर्वपक्षीय गटनेत्यांसह सदस्यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले.

तसेच मिनीमंत्रालयातून जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन योजनाची अंमलबजावीची अपेक्षा व्यक्त केली. मात्र, या सभेत भाजप सत्ताधारी गटाच्या सदस्यांसह शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य विभाग आणि सिंचन विभागाला रडारवर घेत तक्रारींचा पाऊस पाडला.

या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी जि.प.प्रशासनाच्या अधिकार्‍यांवर आरोपाच्या फैरी झाडून सभा नावाच होता. मात्र, झालेल्या ठरावाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याची खंत काही सदस्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांमध्ये महिला सभापती असल्याने त्यांना गटविकास अधिकार्‍यांकडून सन्मानांची वागणूक मिळत नाही.तसेच जिल्हा परिषदेतील सदस्यांनाही त्यांच्या तालुक्यातील कामांसंदर्भात विचारणा केली जात नाही आणि कामाच्या शुभारंभालाही डावले जात असल्याची भावना सदस्यांच्या मनात खदखदत असल्याने सर्वसाधारण सभेचा मोका साधून सदस्य विरुद्ध अधिकारी असा उद्रेकातून अधिकारी टार्गेट होतात.

मात्र, अधिकार्‍यांनीही सदस्याच्या तालुक्यातील व गटातील कामांसंदर्भात समन्वय साधून विकासाचा मेळ साधला गेला तर सभांमधून होणार उद्रेक थांबू शकेल. त्यासाठी जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनीच आता पुढाकार घेऊन विभागानिहाय प्रमुखांकडून आठ ते दहा दिवसांनी आढावा घेऊन आलेल्या तक्रारींच्या समस्या सोडविल्या तर सदस्यांच्या भावनाचा उद्रेक थांबविता येऊ शकेल.

सदस्यांनीही राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून अधिकार्‍यांकडून कामे करुन जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्याची गरज आहे.

तत्कालीन जि.प.सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांसह विरोधी गटाच्या सदस्यांशी जुळवून घेत मवाळ भूमिका घेत उत्तम कामगिरी करुन ‘माझी वसंधरा‘ अभियानात राज्यस्तरीय उत्कृष्ट सीईओ पुरस्कार मिळविला होता. तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना राबविली.

तीच छबी नवीन सीईओ कायम ठेवतील का? डॉक्टरांना माणसाच्या आजाराची जशी नस ओळखून उपचार केला जातो आणि रुग्णाला इंजेक्शन देवून बरे केल्याने तो आनंदाने घरी जातो. तशीच डॉक्टर पंकज आशिया यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यांंची नस ओळखून त्यांच्या कामांची अपेक्षा पूर्तता करण्यात यशस्वी होतील का? हे येणारा काळच ठरवेल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *