Type to search

जळगाव

रेंगाळलेल्या कामांबाबत यावल न.पा. सभेत सदस्यांनी प्रशासनाचे काढले वाभाडे

Share

यावल। येथील पालिकेचे तब्बल 92 विविध विषय असलेली जम्बो विशेष सभा सोमवारी पार पडली. यात प्रशासन व मक्तेदारांच्या बेजवाबदार पणामुळे शहरातील रखडलेले विविध विकास कामे, वर्षाकाठी स्वच्छतेवर 50 लाखांचा खर्च होवुन ही पाहिजे तशी होत नसलेली स्वच्छता, फेब्रुवारी 2018 मध्ये हद्दवाढला मंजुरी मिळून ही अद्याप शासनाकडे विस्तारीत भागातील कामाचा प्रस्ताव न पाठवल्याचा मुद्दा मांडण्यात आला तेव्हा मुख्याधिकारींनी सभागृहात रेंगाळलेली कामे व सर्व विविध समस्या तात्काळ सोडवण्यात येतील असे सांगत विविध विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी पालिकेला विविध हेड खालील निधी व विकास कामे करायची आता लगीनघाई झाली आहे. त्यात तब्बल 92 विषय असलेली विशेष सभा सोमवारी सकाळी 11 वाजेला सुरू झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुरेखा कोळी होत्या. व्यासपिठावर उपनगराध्यक्ष राकेश फेगडे, मुख्याधिकारी बबन तडवी उपस्थित होते. नगरसेवक अतुल पाटील, दिपक बेहेडे, डॉ. कुंदन फेगडे यांनी कोल्हापुर,सांगली, केरळ व कर्नाटक येथे पुरग्रस्त तसेच माजी मरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणी धरणगावचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या श्रंध्दांजलीचा प्रस्ताव मांडून श्रंध्दाजली वाहण्यात आली. तर केंद्र सरकारने जम्मु काश्मीर मधील कलम 370 हटवल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला.

नगरसेवक अतुल पाटील यांनी तब्बल 92 विषय असतांना त्यात मुख्याधिकार्‍यांनी प्रत्येक विषयावर आपली टिप्पणी देणे आवश्यक होते मात्र, ती त्यांनी न देता केवळ सभागृहाने योग्य निर्णय घ्यावा या विषयावर नाराजी व्यक्त करीत प्रशासन म्हणुन मुख्याधिकार्‍यांनी प्रत्येक विषयावर अभ्यासपुर्वक मत देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. तर नगरसेविका रेखा चौधरी यांनी देखील प्रभागातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासुन बंद असुन त्या कामी संबधीत स्ट्रीटलाईट मक्तेदारास वारंवार सूचना करून देखील पथदिवे बदलवण्यात येत नसल्याचे सांगीतले. बैठकीत सत्ताधारी व विरोधकांत दिलजमाई झाल्याचे दिसत होते. समन्वयातुन विविध विषयांवर ऐकमेकांचे मुद्दे विचारात घेवुन निर्णय होतांना पाहून मुख्याधिकारी बबन तडवींनी देखील सभेत यावलच्या या ‘कुल राजकारणाबाबत’ बोलुन दाखवलं. मात्र, ही किंबहूना वादळापुर्वीची शांतता तर नसावी असे या बैठकीतुन एकंदरीत बघायला मिळाले.

प्रशासनाचे वाभाडे.. !
फेब्रुवारी 2018 मध्ये शहराच्या हद्द वाढीला मंजुरी मिळत या भागातील विविध कामांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवाचा होता. तो अद्याप ही पाठवला नाही. 50 लाख रूपये वर्षीय स्वच्छतेकरीता मक्तेदारास दिले गेले मात्र, त्या तुलनेेत शहरात स्वच्छता दिसत नाही.गट क्र. 46 मध्ये 2016 मध्ये कंम्पाऊंड वॉल मंजुर असुन सर्व प्रक्रीया पुर्ण होवुन देखील मक्तेदाराला कार्यरंभ आदेश दिला नाही. 2016 मध्ये खिर्णीपुरा कब्रस्थानच्या सरंक्षण भिंतीच्या कामाचे कार्यारंभ आदेश देवुन देखील संबधीत मक्तेदारानेे आजवर काम सुरू केले नाही. त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही.तसेच श्रीराम नगरात पुर्वीचं सार्वजनिक शौचालय मंजुर असुन ते काम झाले नाही व पुन्हा त्याचं भागात शौचालय का प्रस्तावित केले ? असे प्रश्न नगरसेवक अतुल पाटील यांनी उपस्थित केले.

कोणी कर घ्या हो.. !
सभागृहात नगरसेवक शेख असलम यांनी प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये अनेक नागरीक नगर पालिकेचा कर अदा करण्यास उत्सुक आहेतफ मात्र, प्रशासनाकडून त्यांच्या घराची कर आकारणी झाली नसुन या नागरीकांकडूनचं कुणी तरी कर घ्यायला येईल का? असे प्रश्न उपस्थित केला जात असल्याचे त्यांनी सांगत पालिकेने कर वसुल करावा अशी मागणी केली.

अद्यावत जीपीएस सिस्टीम घ्या
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कार्य पार दर्शक व्हावे म्हणुन घंटा गाड्यांना अद्यावत जीपीएस सिस्टीम लावावी व त्यांची माहिती थेेट प्रत्येक नागरीकास पुरवावी अशा सुचना नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी केल्या.

सभेतील विविध प्रश्न सोडवण्यात येेतील व प्रशासनाकडून सुंदर व स्वच्छ शहराकरीता आपण अधिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रसंगी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिली. तर शहरात 1 हजार वृक्ष लागवड केली जाणार असुन त्या वृक्षाना ट्रीगार्ड सह संगोपना करीता पालिका निधी खर्च करणार आहे. सभेच्या कामकाजात कार्यालय अधीक्षक विजय बडे, राजेंद्र देवरे, रमाकांत मोरे, राजेंद्र गायकवाड ,पंडित सावकारे, शिवानंद कानडे यांनी सहकार्य केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!