621 कोटी 68 लाखाच्या प्रस्तावाला मंजूरी

0
अमळनेर/जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे 621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
तापी नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरु आहे.
या प्रकल्पामुळे 502.09 दलघमी एवढा पाणीसाठा होणार असून 63 हजार 565 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकर्‍यांनी वैयक्तीक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत:च्या खर्चाने पाणी उपसा करुन शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे.

मात्र शेतकर्‍यांना स्वखर्चाने पाणी उपसा करणे शक्य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर जलसंपदामंत्री ना.महाजन यांच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी पाच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय जलआयोगानेही या क्षेत्रात उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी पुरविण्यासाठी मंजुरी दिली होती.

जलसंपदामंत्री ना.महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर या पाच उपसा सिंचन योजनेच्या 621.68 कोटी इतक्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून या योजनांमध्ये ऊर्जा कार्यक्षम पंप वापरण्याची सूचना केली आहे.

या योजनेमुळे प्रामुख्याने अमळनेर, धरणगाव, चोपडा या अवर्षण प्रवण क्षेत्रातील 20 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधेचा लाभ होणार आहे.

निम्न तापी प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यावेळी या सिंचन योजनेचा शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे ना.महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सदर कामाच्या मजुरीबद्दल आ.शिरीष चौधरी व आ.सौ.स्मिताताई वाघ यांनी पाठपुरावा केल्याचा दावा केला असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

या पाच सिंचन योजना पूर्णत: नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचित करण्यात येणार असून या योजनांसाठी मान्यता मिळाल्यामुळे आता सर्वेक्षण व इतर अनुषांगिक गोष्टी सुरुकरण्यात वेग येणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी व जलसंपदा मंत्र्यांशी सतत संपर्क साधून अमळनेर तालुका सतत अवर्षण प्रवण असल्याने ही योजना किती आवश्यक आहे याची तंत्रशुद्धपणे मांडणी करत पटवून दिले.

यामुळे मोठा निधी शासनाने मंजूर केला आहे. तसेच भविष्यात या उपसा सिंचन योजनेद्वारे नदी आणि तलाव पुनर्भरण करण्याचेही नियोजन असून त्यामुळे दहिवद, मांडळ, मुडी, शिरुड, डांगर, जवखेडे, बोदर्डे, आर्डी अशा जवळपास 60 ते 70 गावांचा पिण्याचा शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आ.शिरीष चौधरी व सौ.स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*