अपार्टमेंटच्या सेफ्टी टँकमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

0
जळगाव । शहरातील वाघनगर स्टॉपजवळ नव्याने बांधण्यात येणार्‍या अपार्टमेंटच्या सेफ्टी टँकमध्ये 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा आज मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. गोपी अशोक रावळकर वय 41 रा. जाखनी नगर, कंजरवाडा असे या मयत युवकाचे नाव आहे.

कंजरवाड्यातील गोपी अशोक रावळकर हा हातमजुरी करायचा. गेल्या दहा दिवसांपासून तो बेपत्ता होता. दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांना तो वाघनगर परिसरात दिसून आला होता. कुटूंबियांसह नागरिकांनी त्याचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नव्हता. दरम्यान वाघनगर स्टॉपपासून काही अंतरावर महाजन यांच्या अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी बांधण्यात आलेल्या सेफ्टी टँकवर झाकण नव्हते. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका युवकाचा या सेफ्टी टँकमध्ये मृतदेह तरंगत असतांना दिसून आला.

नागरिकांनी या घटनेची माहिती लागलीच रामानंद नगर पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळात बेपत्ता असलेल्या गोपी रावळकरचे नातेवाईक त्याला शोधत असतांना याठिकाणी आले. त्यांनी मयत युवक गोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी देखील याठिकाणी धाव घेतल्यानंतर त्याची ओळख पटली. याबाबत रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

अपार्टमेंट मालकाविरुध्द कारवाई करा
अपार्टमेंटचे बांधकाम जवळपास पूर्ण होवनू देखील अपार्टमेंट मालकाने सेफ्टी टँकमध्ये पाणी असतांना याठिकाणी टॅँकवर झाकण न ठेवल्याने पाण्यात पडून गोपी याचा मृत्यू झाल्याने अपार्टमेंट मालकाविरुध्द गुन्हा करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी केली. तसेच मयताला आर्थिक मदत देखील देण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली.

LEAVE A REPLY

*