विशेष : कॉल टू अ‍ॅक्शन

0

संस्थात्मक प्रसुतीला प्राधान्य देवून माता-बालमृत्यू रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्र देखील रोल मॉडेल ठरले आहे.

आदिवासी दुर्गम भागासाठी असलेल्या खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कॉल टू अ‍ॅक्शन’ कृती केली जात असल्याने माता-बालमृत्यूचे दर शून्यावर आणण्यासाठी काटेकोरपणे पाऊल उचलली जात आहेत.

वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी आणि आशा सेविकांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत असल्याने अद्ययावत आरोग्य सुविधा असलेल्या या केंद्रात संस्थात्मक प्रसुतीसाठी प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे दरमहा 18 ते 20 मातांची प्रसुती होत असल्याने माता-बालमृत्यू रोखण्यास यश आले आहे.

ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील नारिकांना तात्काळ प्राथमिक उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे. राज्यात 23 जिल्हा रुग्णालय, 81 उपजिल्हा रुग्णालय, 360 ग्रामीण रुग्णालय तर 1811 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 10,580 उपकेंद्र आहेत.

तर जळगाव जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह 3 उपजिल्हा रुग्णालय, 17 ग्रामीण रुग्णालय, 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 442 उपकेंद्र आहेत. रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र म्हटले की, अस्वच्छता, तोकडी यंत्रणा, आरोग्य सुविधांचा अभाव अशी काहीशी प्रचिती आहे.

परंतु राज्यात रोल मॉडेल ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणी कोळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र अपवाद आहे.

राजकीय आणि सामाजिक सेवेचे केंद्रबिंदु असलेल्या खिरोदा येथे लोक सहभागातून आणि रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून रुग्णांसाठी 24 तास अखंड सेवा दिली जात आहे.

पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी केली जाते. त्यानंतर आशा सेविकांच्या माध्यमातून संबंधित मातांची माहिती संकलित करुन आणि प्रसुतीची संभाव्य तारीख लक्षात घेवून औषधोपचारासह समुपदेशन केले जाते.

रक्तगट, हिग्लोबिनची तपासणी खाजगी स्त्री-रोग तज्ञांकडून सोनोग्राफीची मोफत तपासणी बरोबरच अत्याधुनिक मशीनद्वारे रक्तपेशींची तपासणी देखील केली जाते.

खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कॉल टू अ‍ॅक्शन’वर अधिक तर भर देण्यात येत आहे. गरोदर मातांची संपूर्ण आरोग्याबाबतची माहिती नोंदविली जात असल्याने त्यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून तपासणीसाठी किंवा प्रसुतीची पुर्व कल्पना देखील दिली जाते.

त्यामुळे प्रसुतीचे संभाव्य धोके टाळू शकण्यास मदत होते. प्रसुतीसाठी दाखल होण्याकरीता किंवा प्रसुतीनंतर घरी जाण्याकरीता स्वतंत्र रुग्णवाहिका असून संबंधितांना वाहनचालकांचाही मोबाईल क्रमांक दिला आहे.

तसेच 108 क्रमांकाची सेवा सुद्धा उपलब्ध आहे. मातांची प्रसुती झाल्यानंतर रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून बाळासाठी ‘किट’ तर मातेसाठी ‘मॅटर्निटी पॅड’ दिले जातात.

डॉ गोपी सोरडे

तसेच दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावर कॉल केल्यानंतर काही वेळातच सहा, नाश्ता, दुपारचे, सायंकाळचे जेवन उपलब्ध करुन देण्याची सुविधा वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांनी उपलब्ध करुन दिली आहे.

खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जेचा वापर करुन मातांना गरम पाणी, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फ्युरिफायर तर थंड पाण्यासाठी वॉटर कुलर लावण्यात आले आहे.

वातानुकुलित ऑपरेशन थिएटर असून प्रसुती कक्षाला ‘नवजात शिशु आगमन कक्ष’ असे दिले आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता असे 20 कर्मचारी 24 तास अखंडपणे सेवा देण्याचा प्रयत्न करुन जळगाव जिल्ह्यात ‘रोल मॉडेल’ ठरले, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.

रावेर, यावल तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात समुपदेशनाद्वारे संस्थात्मक प्रसुतीला प्राधान्य देवून माता आणि बालमृत्यू नियंत्रणात निश्चितच यश आले आहे.

खिरोदा ग्रामपंचायतीने दिलेल्या 1 हेक्टर 7 आर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. लोकसहभागातून लोकवर्गणी करुन रंगरंगोटी तर वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या प्रयत्नातून रुग्णांना आल्हाददायक वाटावा यासाठी बगीचा देखील तयार करण्यात आला आहे.

प्रसन्न आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करुन आरोग्य सेवा देण्यावर भर देण्यात येत असल्याने माता-बालमृत्यूचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे यात तिळ मात्र शंका नाही.

वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या नियोजनबद्ध आरोग्य सेवेमुळे खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्राला लैकिक प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

*