जलयुक्तच्या कामातील त्रृटी गांभीर्याने घ्या!

0

चेतन साखरे
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा करीत जलयुक्त शिवार योजना हा ड्रीम प्रोजेक्ट जाहीर केला. या योजनेंतर्गत शिवार जलयुक्त करण्यासाठी जिल्हानिहाय गावांची निवड करून त्यात सिंचनाची विविध कामे हाती घेऊन शिवार जलमय करण्याचा प्रयत्न गेल्या साडेतीन वर्षांपासुन सुरू आहे.

या योजनेंतर्गत शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण, यासह अन्य कामे केली जात आहेत. सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील 232 गावांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. निवड झालेल्या गावांमध्ये विविध यंत्रणांमार्फत 7316 कामे पुर्ण करण्यात आली. या कामांमुळे जिल्ह्यात 36118 टीसीएम साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला. सन 2016-17 मध्ये 222 गावांची निवड करण्यात आली होती. त्यात 4846 कामे पुर्ण करण्यात आली. तर 11 कामे अद्यापही प्रगतीपथावर आहेत.

या कामांवर आत्तापर्यंत 124 कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. सन 2017-18 मध्ये 206 गावांची निवड करण्यात आली. तीत 4271 कामे प्रस्तावित असुन त्यापैकी 1207 कामे पुर्ण तर 2394 कामे सुरू आहेत.सन 2018-19 मध्ये 233 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुर्ण झालेल्या कामांचे थर्डपार्टी ऑडीट केले जाते.

गतवर्षी जलश्री या संस्थेला या कामांच्या तपासणीचे अधिकार देण्यात आले होते. यंदा ते काम एरंडोल येथील एका खाजगी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने विहित मुदतीत कामांची तपासणी करून तसा अहवाल देखिल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. गतवर्षी झालेल्या निकृष्ट कामांची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर निश्चीत करून कारवाई देखिल करण्यात आली होती.

यंदा मात्र केवळ त्रृट्या दर्शविण्यात आल्याने या अहवालाबाबत प्रश्न उपस्थित राहत आहे. अहवालात ज्या त्रृटी दाखविण्यात आल्या आहेत त्या त्रृटी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांना ही योजना अत्यंत फायद्याची आहे.

गरज आहे ती फक्त प्रशासकीय इच्छाशक्तीची. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगली कामे देखिल झाल्याने त्याठिकाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. परंतु ज्याठिकाणी काही त्रृट्या आहेत किंवा निकृष्ट कामे झाली आहेत अशा ठिकाणी प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. असे झाल्यास खर्‍या अर्थाने जळगावचे शिवार हे जलयुक्त होईल!

LEAVE A REPLY

*