संप एसटीचा अन् प्रवासी टांगणीला!

0
अमोल कासार – 9579444525
वेतनवाढीसह इतर मागण्याकरीता एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी अघोषित संप पुकारला होता. आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप हा रास्तच आहे.

परंतु किमान आपल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. याचा विचार करण्यासाठी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. वारंवार होत असलेल्या संपामुळे प्रवाशी आता मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे सारासार विचार होणे अपेक्षित आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्‍यांना वार्षीक वेतनवाढ 3 टक्के दिली जात होती. परंतु ही वेतनवाढ शासनाने 2 टक्क्यांपर्यंत तसेच घरभाडे 10 टक्के मिळत होते. परंतु ते देखील दहा टक्क्यांवरुन 7 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय राज्य परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांनी घेतल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांकडून अघोषीत संप पुकारण्यात आला होता.

या संपात महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना व इंटक छाजेड गटाने जाहीर पाठिंबा देत संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. परंतु एस.टी. कर्मचार्‍यांनी संपाबद्दल प्रशासनाला कुठलीही पुर्वसूचना न देता अचानकपणे पुुकारलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल तर झालेच त्याच सोबत त्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागला.

परंतु याच बरोबर संपामुळे राज्य परिवहन महामंडळाला दोन दिवसांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान देखील सहन करावे लागले. एसटी कर्मचार्‍यांकडून गेल्या वर्षी वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी 4 दिवसांचा बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

त्याचीच पुनरावृत्ती गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या संपात नागरिकांना अनुभवली. शासन व एसटी कर्मचार्‍यांच्या संघटनांमध्ये समन्वय नसल्यामुळे कर्मचार्‍यांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. कर्मचार्‍यांना न्याय मिळवा यासाठी आंदोलन, संप यासह शासनाचा निषेध करणे लोकशाहीपद्धतीने योग्यच आहेत.

परंतु एसटी कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून वारंवार संपाचे अस्त्र उगारुन सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे. असा सवाल सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांच्या संघटनांचे पदाधिकारी व राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांमध्ये वेळोवेळी सुसंवाद व समन्वय असणे आवश्क आहे. त्यांच्यामध्ये योग्यप्रकारे समन्वय झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून संघटनांकडून संप पुकरण्याची वेळच कर्मचार्‍यांवर येणार नाही.

त्यामुळे एसटी महामंडळातील संघटनाच्या पदाधिकार्‍यांसह राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठांनी यावर विचार मंथन करणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

*