Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

‘एसपी’ ते ‘पीसी’ सर्वच रात्रभर रस्त्यावर

Share
जळगाव । शहरात पोलीस यंत्रणेतर्फे शुक्रवारी व शनिवारी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस अधीक्षकांंपासून ते पोलीस कर्मचार्‍यांपर्यंत जवळपास 80 टक्के पोलीस रात्री अचानक रस्त्यावर उतरले होते. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नाकाबंदी, वाहनांची तपासणी, हिस्ट्रीशिटरांवर कारवाई, तसेच रात्री उघड्यावर दारू पिणार्‍या तळीरामांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, डिवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांच्यासह सर्वच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कारवाई सहभागी झाले होते. त्यामुळे पहाटे उशिरापर्यंत शहरातील सर्वच रस्त्यावर फक्त पोलीसच दिसत होते. दरम्यान, पोलिसांची फौज रस्त्यावर असल्याने शुक्रवारी रात्री एकही चोरी व घरफोडीची गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरासह जिल्ह्यात वॉश आऊट ऑपरेशन स्क्रिमतंर्गत संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरात कारवाईला सुरुवात झाली. सुरुवातीला डिवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांच्यासह क्यूआरटीच्या पथकाने बसस्थानकाशेजारील भजे गल्लीत रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हातगाड्यांवर तसेच याठिकाणी उघड्यावर दारु पिणार्‍यांवर कारवाई केली.

त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने डिवायएसपींचा ताफा शिवाजीनगर, गेंदालाल मिल परिसराकडे वळला. दुध फेडरेशन परिसर, शाहुनगर, यासह शहरातील अतिसंवेदनशील परिसर व मुख्य रस्त्यावर डिवायएसपीच्या पथकाने रात्रभर गस्त घातली. तसेच सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी हद्दीमध्ये नाकाबंदी, वाहनांची तपासणी, हिस्ट्रीशिटरांवर कारवाई, दारु पिवून वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली. पहाटे 5.30 वाजेपर्यंत पोलीसांकडून अजामीनपात्र गुन्ह्यातील फरार संशयित, हिस्ट्रीशिटरांची तपासणी, हद्दपार आरोपींची तपासणी सुरु होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर रात्रीपासून पहाटेपर्यंत नागरिकांपेक्षा पोेलिसच दिसून येत होते. हद्दपार, हिस्ट्रीशिटर, फरार आरोपींसाठी पोलिसांनी रात्रभर धरपकड मोहिम राबविल्याने संशयितांचे दाबे चांगलेच दणाणले होते.

हद्दपार संशयिताला अटक
सुप्रिम कॉलनीतील रहिवाशी असलेला किरण शंकर खर्चे याला दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरी देखील तो घरी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुषंगाने एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या घरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द मु.पो. 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार किरण खर्चे याच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत.

एकही चोरी,घरफोडीची घटना नाही
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, घरफोडीच्या घटनां वाढल्या होत्या. परंतु शुक्रवारी रात्रभर शहरात पोलिस यंत्रणेने कोम्बिंग ऑपरेशन राबविल्याने एकही चोरी, घरफोडीची घटना घडली नाही. त्यामुळे शहरात दररोज पोलिसांनी नियमित गस्त घातल्यास चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा बसू शकतो.

हिस्ट्रीशिटरांची रात्रभर तपासणी
शहरातील सर्व पोलिस स्टेशनच्या अंतर्गत हिस्ट्रीशिटरांची रात्रभर तपासणी करण्यात आली. यात शहर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत हद्दपार व हिस्ट्रीशिटराची तपासणी करण्यात आली. शहर व जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी 10 हिस्ट्रीशिटरांपैकी 3 हिस्ट्रीशिटर त्यांच्या घरीच आढळून आले. याबाबत नोंद घेण्यात आली. तसेच रामानंद नगर पोलिसांनी 2 अजामीनपात्र गुन्ह्यांतील संशयितांना ताब्यात घेतले असून डंक अ‍ॅण्ड ड्राईव्हरची एक कारवाई केली आहे. तसेच जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 13 आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फरार असलेल्या आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अजामीनपात्र वॉरंटमधील सुनिल मदनलाल सांखला रा. बिलाल चौक, तांबापुरा, मोहम्मद भिकन खाटीक रा. बिलाल चौक तांबापुरा, टारझन अरुण दहेकर रा. जाखणी नगर, सादिक शेख अय्युब रा.श्यामा फायरसमोर तांबापुरा, हरीश लक्ष्मण ढाके रा. सदगुरु नगर, शेख कादीर शेख कबीर रा. उपासनी नगर या सहा संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनसाठी 3 स्वतंत्र पथक तयार केले होते. तसेच तालुका पोलिसांनी वॉरंटमधील अनिल एकनाथ कोळी रा. निमखेडी, प्रकाश दगडू पाटील रा. ममुराबाद या दोघांना देखील अटक केली आहे.

शहरातील चौका-चौकात नाकाबंदी
शुक्रवारी रात्री पोलीसांतर्फे शहरातील भिलपुरा चौक, नेरीनाका, आकाशवाणी चौक, प्रभातचौक, गुजराल पेट्रोलपंप, ममुराबाद जकातनाका यासह मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच दारु पिवून वाहने चालविणार्‍यांवर मद्यपींची ब्रिथ अनॉलायझेर मशिनद्वारे तपासणी करून त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान डंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, विना सिट बेल्ट वाहन चालविणे, विना लायसन्स, बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!