Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव फिचर्स

श्रीक्षेत्र तरसोद : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त उद्या श्री गणरायाची यात्रा

Share

राजेंद्र पाटील

तरसोद, ता.जळगाव ।

भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र ख्याती असलेल्या श्रीक्षेत्र तरसोद येथील गणरायाचा उद्या दि.12 नोव्हेंबर 2019 रोजी कार्तिक शुध्द त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त यात्रोत्सव आयोजीत केला आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी दर्शनाचा व यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे.

जळगाव शहरापासून 9 कि.मी. अंतरावर असलेल्या व जळगाव-भुसावळ महामार्गावरील तरसोद फाटा येथून तीन किमी अंतरावर शिवकालीन श्रीगणरायाचे जागृत देवस्थान आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून भाविक भक्त याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी कार्तिक शुध्द त्रिपुरारी पौर्णिमेला एक दिवसांचा यात्रोत्सव असतो. त्याचप्रमाणे गणेशोत्सव, संकष्टी, अंगारकी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. गणेश जयंतीच्या दिवशी गायत्री यज्ञ, होम हवन, पुजा पाठ सुरू असतात. या मंदिराला आता पर्यटन क्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असल्याने विविध विकासकामे सुरू आहेत.

मंदिराचा इतिहास

– इ.स.1662 साली मोरेश्वर हणमंत देशमुख यांनी बांधलेल्या श्रीक्षेत्र तरसोद गणपती मंदिर या जागृत देवस्थानाची पंचक्रोशीत ख्याती आहे. तरसोद, नशिराबाद, मुरारखेडा (उजाळगाव) या तीन गावांच्या सिमेसमोर हे जागृत देवस्थान वसले आहे.

पद्मालयचे सिध्द पुरूष गोविंद महाराज व आळंदी देवीची येथील सिध्द पुरूष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तसेच नशिराबाद येथील शिव योगिराज झिपरू अण्णा महाराज हे मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे परम पुज्य झिपरू अण्णा हे महापुरूष नशिराबादच्या पश्चिमेला तीन कि.मी. अंतरावर असलेल्या ज्या चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली असलेल्या गणपती मंदिराजवळ बसत तेच हे तरसोदच्या गणेशाचे मंदिर. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात याची नोंद सापडते.

नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्मालय येथे अमोद व प्रमोद गणरायाच्या दर्शनासाठी जात असत. त्यावेळी तेथे पुज्य श्री गोविंद महाराज वास्तव्य करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिध्दपुरूषांने सांगितले की, पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबाद जवळच असलेल्या तरसोद या गावी आहे. त्यानंतर परिसरातील भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणरायाचे पूजन करू लागले. काही दिवसांनी स्वत: पुज्य श्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली, अशी आखायिका आहे.

मंदिराला ऐतिहासिक वारसा

मराठ्याच्या फौजा उत्तरेकडे मुलूखगिरी करण्यासाठी जात, तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्याकाळी तरसोद-नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बु॥, खेडी व नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदाराच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्नी येसूबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. मंदिरासमोरील नाल्यामध्ये आलेल्या पुरात हत्ती वाहून गेल्यामुळे तेथील नाल्यास हातेड नाला असे नाव पडले आहे. त्याचप्रमाणे परिसरात वड-चिंचेची मोठी पुरातन झाडे व मंदिरामागे पायविहीर पायरी बुजून टाकलेल्या स्थितीत आहे. या गोष्टी पुरातन असल्याची साक्ष देतात.

मंदिर पुरातन  असल्याची नोंद

मुरारखेडे येथील मोरेश्वर देशमुख यांनी बांधलेल्या या मंदिराबाबत हे तरसोद ग्रामपंचायतीच्या व्हिजीट बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. इतिहास संशोधक द.ग.काळे, इतिहास संशोधक मेंबर स्टेट बोर्ड फॉर हिस्टॉरिकल रेकॉर्ड अ‍ॅन्ड एन्शंट मॉन्यूमेंटस मुंबई यांनी 9 मार्च 1958 रोजी मंदिर पुरात असल्याची नोंद केली आहे.

विश्वस्त समितीची स्थापना

तरसोद मंदिर देवस्थान विशस्त समितीची स्थापना 24 जुलै 1980 रोजी झाली. संस्थानच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून गणपती मंदिर देवस्थानचा विकास होत आहे. तसेच या मंदिरास आता महाराष्ट्र शासन पर्यटनक्षेत्र विकास ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असल्याने विविध विकास कामांसाठी मदत झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!