ताप्तीगंगा एक्सप्रेसला अपघात टळला

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-सुरत-भुसावळ तिसर्‍या रेल्वे लाईनचे सध्या काम सुरु आहे. दरम्यान कृषी विद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या रेल्वे लाईनच्य रुळावर बांधकामासाठी वापरनी जाणारी ट्रॉली रुळावरच राहून गेल्याने ट्रॉली चक्क सुरत कडून जळगावकडे येणार्‍या ताप्तीगंगा एक्सप्रेस खाली आल्याने गाडीचे नियंत्रण बिघडल्याने मोठया अनर्थ टळल्याची घटना आज दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व रेल्वे विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, सुरत-भुसावळ तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम सुरु आहे.

दरम्यान दुपारी 3. 45 वाजेच्या सुमारास कृषी विद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळाठिकाणी सिग्नल विभाग, रेल्वे विभागाचे काम सुरु होते.

यावेळी डाऊन रेल्वे रुळावर बांधकामासाठी वापरली जाणारी ट्रॉली राहुन गेली. यावेळी सुरतकडून येणारी 19045 क्रमांकाच्या ताप्तीगंगा एक्सप्रेस खाली ही बांधकामासाठी वापरली जाणारी ट्रॉली आल्याने गाडीने नियंत्रण बिघडल्याने मोठया अनर्थ टळला.

याचवेळी ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या चालक व गार्डच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठांना माहिती कळविली.

20 मिनीटे थांबून होती ताप्तीगंगा एक्सप्रेस
या घटनेनंतर तब्बल 20 ते 25 मिनीटे ताप्तीगंगा एक्सप्रेस कृषी विद्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या रेल्वे रुळावर थांबून होती. दरम्यान लोहमार्ग पोलिस व रेल्वे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ट्रॉली रेल्वेखालून काढण्यात आल्यानंतर ताप्तीगंगा एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर आली.

लोहमार्ग पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती कळताच लोहमार्ग पोलिस स्टेशनचे एपीआय सी.व्ही.आहेर व पोलिस कर्मचारी योगेश चौधरी यांनी पोलिस स्टेशनपासून जवळपास तीन किलोमीटर अंतर पायी गाठून रेल्वेखाली आलेली ट्रॉली बाहेर काढून तत्परता दाखविली.

पश्चिम रेल्वेच्या हद्दीत घडली घटना
कृषी विद्यालयाच मागील बाजूस आलेल्या रेल्वे रुळावर ही घटना घडली. ही घटना खांबा क्रमांक 303 जवळ घडली. दरम्यान हा खांबा पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असल्याने मध्य रेल्वेच्या अधिकारी तसेच जीआरपीएफच्या अधिकार्‍यांनी हद्दीचा वाद करीत घटनाठिकाणी जाणे टाळले. तसेच याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

वरिष्ठ स्तरावरुन होणार घटनेची चौकशी
घटनास्थळी बांधकाम, सिग्नल व रेल्वेच्या विभागाचे तिसर्‍या रेल्वे लाईन बाबत काम सुरु आहे. त्यामुळे रेल्वेखाली आलेली ट्रॉली नेमकी कोणत्या विभागाची होती. तसेच ती रेल्वे रुळावर कशी आली. कोणत्या विभागाच्या कर्मचार्‍याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला.याबाबत वरिष्ठ स्तरावरून या घटनेची चौकशी होणार असल्याचे समजते.

चालकाच्या मेमोवरुन होणार कारवाई
या घटनेबाबत ताप्तीगंगा एक्सप्रेसचे चालक व गार्डने रेल्वेच्या अधिकार्‍यांना कळविलेल्या मेमोवरून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

 

LEAVE A REPLY

*