Type to search

maharashtra जळगाव

पाणी टँकरवर जीपीएस यंत्रणा

Share
जळगाव । जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर पाणीटंचाई निवारणार्थ सद्य:स्थितीत 193 गावांना 175 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुका तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या फेर्‍यांची नोंद तालुकास्तरावरून महसूल तसेच गटविकास अधिकारी वर्गाला कळविली जाते. परंतु प्रत्यक्षात किती फेर्‍या होतात याची नोंद संबंधित यंत्रणेला अद्ययावत मिळणे. तसेच फेरफार होवू नये, यासाठी जिल्हाभरात होत असलेल्या पाणीपुरवठा टँकरला जीपीएस यंत्रणा सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी दिली.

हतनूर शून्य तर गिरणात केवळ 2.36 टिएमसी साठा!
या वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमानामुळे जिल्हयात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी टँकरची संख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत 15 तालुक्यातील 193 गावांना 175 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हयातील हतनूर207.70, गिरणा 385.19 व वाघूर 226.30 अशा 3 मोठया प्रकल्पात अनुक्रमे गिरणा 12.75 व वाघूर 16.35 टक्के आजमितीस सरासरी अत्यअल्प उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. तर बहुतांश मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात नगण्यच नव्हेतर शून्य पाणीसाठा आहे. कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्यास त्यावर जीपीएस यंत्रणा असणे बंधनकारक केले आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित नसल्यास टँकरला मान्यता देण्यात येवू नये,असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हयात आजमितीस 175 टॅकरव्दारे पाणीपुरवठा होत असल्याची नोंद आहे परंतु त्यानुसार नोंदीच्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. बर्‍याच ठिकाणी टँकर भरल्यानंतर नोंदविलेल्या गावात पोहचेपर्यत टँकरमधील पाण्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. टँकरची क्षमता लक्षात घेता पूर्ण क्षमतेने भरलेले टँकर नोंदविलेल्या गावात पोहचते किंवा नाही याची नोंद तालुका गटविकास अधिकारी यांचेकडे नियमीत असणे गरजेचे आहे.

जीपीएस नसलेल्या टँकरला मान्यता नाही!
पाणीपुरवठा करणार्‍या टँकरवरील जीपीएस यंत्रणेबाबत तालुकास्तरावरील अधिकारी उदासीन असून या यंत्रणेवर स्थानिक अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने गेल्या आठवडयात झालेल्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना खडसावले होते.जीपीएस यंत्रणा सर्वच अधिकार्‍यांना हाताळता येते, टँकरच्या दैनंदिन होणार्‍या फेर्‍या, संबंधित टँकरला पाणी भरण्यासाठी व नेमून दिलेल्या ठिकाणी पोचण्यास लागणारा वेळ यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांनी जीपीएस यंत्रणेची नोंद ठेवावी, जीपीएस यंत्रणायुक्त टँकर वापरास परवानगी नाही. वापरले असतील तर त्यांचे देयक अदा करण्यात येवू नसे असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याची माहिती टंचाई निवारण कक्षाच्या सुत्रांनी दिली. जिल्हयातील मोठे,मध्यम लघु प्रकल्पातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षीत असून गिरणा धरणातुन आतापर्यत चार आवर्तने सोडण्यात आली आहेत. चौथे आवर्तन नुकतेच 13 मे रोजी सोडण्यात आले होतेे. जिल्हयात 193 गावांसाठी 175 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून टंचाई निवारणार्थ करण्यात येणार्‍या उपाययोजनांतर्गत 271 गावांसाठी 278 विहिरींंचे अधिग्रहण करण्यात आले असून 51 तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यासह 61 गावांसाठी 111 विंधणविहिरींसह 48 ठिकाणी विहीर खोलीकरणाची कामे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!