तीव्र उन्हाच्या झळांनी दुधाची धारही आटली

चारा-पाण्याविना पशुधनाची उपासमार

0
जळगाव । वाढत्या उन्हाच्या दाहकतेसोबतच दुष्काळाची भीषणताही दिवसेंदिवस जाणवत आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न तीव्र होत आहे. चारा-पाण्याविना पशुधनाची उपासमार होत असून याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर जाणवत आहे. चारा-पाण्याअभावी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यातील दूध संकलनात एक लाख लिटर घट झाल्याची शक्यता शासकीय सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून जिल्हयात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करण्यात येतो. गत सन 2013 च्या पशुगणनेच्या आकडेवारीनुसार जिल्हयात पशुधनाची संख्या सुमारे 11 लाखाचे वर होती. ती यावर्षी करण्यात आलेल्या पशुगणनेच्या आकडेवारी पाहता जवळपास 3 ते 4 लाखांनी घट झालेली दिसून येत आहेे. जिल्हयात सतत तीन चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादन खर्चासह पशुधन पालनाचा देखिल खर्च जास्त आणि दुधाचे दर कमी असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत येत आहे. चारा, खुराकाचा खर्च कमी करीत दुग्ध व्यावसायिक कसाबसा हा व्यवसाय चालवित आहेत. या दुग्ध व्यवसायाची यंदाच्या दुष्काळातील वाट आणखीनच खडतर झाली आहे.
दूध संकलन घटले

तीव्र उन्हाचा परिणाम दुभत्या जनावरांवर आणि त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर होत आहे. हिरव्या चार्‍याचा अभाव, अपुर्ण कोरडा चारा, पशुखाद्याची कमी मात्रा, दिवसेंदिवस वाढते तापमानामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होत आहे. यापूर्वी दोन वेळेला किमान सहा लिटर दूध देणारी गाय किंवा म्हैस सध्या तीन ते चार लिटरच दूध देत आहेत. त्यामुळे दूध संकलन देखिल घटले आहे. जिल्ह्यात साधारण गेल्या दोन महिन्यांमध्ये एक ते दीड लाख लिटर दुधाची घट होत असल्याने पशुपालकांना मोठया प्रमाणावर आर्थिक झळ बसत आहे.

चारा टंचाई
जिल्ह्यात यावर्षी पावसाच्या 120 दिवसांपैकी केवळ 40/42 दिवस पर्जन्यमान झाले होते. ग्रामीण भागात सरासरी केवळ 38 टक्के पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट आल्ी आहे. त्यामुळे पाण्याचे मोठया प्रमाणावर दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. जिथे शेतात पिके घेण्यास पाणी नाही तिथे चार्‍याचे उत्पादन घेणे कठीणच झाले आहे. त्यात खरीपासह रब्बी हंगाम देखील जेमतेम झाल्याने ज्वारीचा कडब्याचेही उत्पन्न कमालीचे घटले आहे. परिणामी हिरव्या व कोरड्या चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून पशुखाद्याचे दर वाढल्याने जनावरांना पाहीजे त्या प्रमाणात पशुखाद्य देणे पशुपालकांना परवडणारे नाही.

LEAVE A REPLY

*