वेगवेगळ्या घटनेत तिघांची आत्महत्त्या

0
जळगाव । दि.2 । प्रतिनिधी-शहरातील मुक्ताईनगर परिसरातील हर्षवर्धन कॉलनी, मुख्य स्टेट बँक शेजारील कॉलनी व जामा मशिदीच्या तिसर्‍या मजला या तीन ठिकाणी घडलेल्या घटनेत तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना आज उघडकीस आल्या.
याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, हर्षवर्धन कॉलनीत सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर महाजन यांचे घर आहे. त्यांच्या मुलगा अरुण महाजन वय 35 हा खाजगी वाहनावर चालक होता.

दरम्यान अरुण हा घराच्या दुसर्‍या मजल्यावर झोपलेला असल्याने सकाळी त्यांची आई त्याला उठविण्यासाठी गेली असता, त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

यावेळी आईने आरडाओरड करून घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने अरुण याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

जामा मशिदीत तरुणाची आत्महत्त्या
तांबापुरा येथील तरूणाने जामा मशिदीच्या तिसर्‍या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रऊफ खान आलम खान वय 28 हा तांबापुरा परिसरातील मच्छीबाजार जवळ राहत होता. दि.1 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रऊफ खान या तरूणाने शनिपेठ परिसरातील जामा मशिदीच्या तिसर्‍या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली.

घटना मशिदीतील नागरिकांना कळताच त्यांनी याबाबत शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी नरेश सपकाळे व जितेंद्र सोनवणे यांनी भेट देवून तेथील नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. आज सकाळी रऊफ खान याच्यावर शवविच्छेदन करण्यात येवून याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्टेट बँक शेजारी कॉलनीतील एकाची आत्महत्त्या
स्टेट बँकच्या मुख्य शाखेच्या शेजारील कॉलनीत राहणार्‍या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, स्टेट बँकच्या मुख्य शाखेच्या जवळ डॉ. नरेंद्र दोशी यांचा बंगला आहे.

या ठिकाणी बंगल्याच्या एका बाजुला असलेल्या खोलीत संजय झेंडू पाटील यांचे कुटुंबिय राहते. दरम्यान संजय पाटील यांची पत्नी रेखाबाई हया डॉक्टरांच्या घरीच कामाला आहे. तर संजय पाटील हे दुसरीकडे कामाला होते.

परंतू सध्या त्यांच्या हाताला काम नसल्याने ते काही महिन्यांपासून घरीच होते. त्यांची मुले घरापासून जवळच असलेल्या ला.ना शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे ते दोघे शाळेत गेले होते. तसेच रेखाबाई हया देखील डॉक्टरांच्या बंगल्याठिकाणी कामाला गेल्या होत्या.

दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी एक महिला आली. त्यावेळी त्या महिलेला संजय पाटील यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

त्यांनी ही घटना तात्काळ रेखाबाईंना सांगितली. रेखाबाईंनी घराकडे धाव घेवून एकच आक्रोश केला. त्यानंतर नातेवाईक निलेश पाटील यांच्या मदतीने संजय पाटील यांना खाली उतरवून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*