स्टेरॉईडस्च्या गूढ विश्वात

0

अनेक खेळाडू स्टेरॉईड घेताना आढळतात. ही स्टेरॉईडस् नेमकी काय असतात? त्यांचे कोणते परिणाम होतात आणि त्यांच्यावर बंदी का घातली जाते? टेनिसपटू मारिया शारापोवापासून सामान्य कुस्तीपटूंपर्यंत अनेकांन बदनाम करणार्‍या स्टेरॉईडस्च्या विश्वाचा हा वेध.

स्टेरॉईडस्च्या वापरावर बंदी आहे. ही स्टेरॉईडस् नेमकी कसे कार्य करतात आणि त्यांचे कोणते परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते. खेळाडू वापरत असलेली स्टेरॉईडस् अ‍ॅनाबोलिक अँड्रोजेन स्टेरॉईडस् प्रकारातील असतात.

लेखक – चिन्मय प्रभू

ती स्नायूंचा आकार आणि ताकद वाढवतात. शरीरात नैसर्गिकरीत्या निर्माण होणारा प्रमुख स्टेरॉईड हार्मोन हा टेस्टोस्टेरॉन असतो.

इतर खेळांप्रमाणेच 1991 पासून बेसबॉल स्पर्धांमध्ये स्टेरॉईडस्वर बंदी घालण्यात आली होती. मात्र मोठ्या लीगमध्ये खेळाडूंची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास 2003 मध्ये सुरुवात झाली.

स्टेरॉईडस्मुळे खेळाडूंची कामगिरी नैसर्गिक कामगिरीपेक्षा उंचावते, असे मानले जाते. म्हणून ती घेण्यावर बंदी घातली जाते. अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईडस् किंवा अ‍ॅनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टेरॉईडस् (एएएस) ही कृत्रिम प्रकारची स्टेरॉईडस् असतात.

ती प्रयोगशाळेत तयार केलेली असतात. हे नैसर्गिकरीत्या तयार होणार्‍या टेस्टोस्टेरॉनचेच उपप्रकार असतात. त्यांच्यामुळे स्नायूंची वाढ होतेच शिवाय वयात आल्यानंतरचे विशिष्ट पुरुषी गुणधर्मही विकसित होतात.

खेळाडू प्रामुख्याने आपल्यावरचा दबाव कमी करण्यासाठी आणि कामगिरी उंचावण्यासाठी स्टेरॉईडस् घेतात. अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईडस्मुळे स्नायूंची भराभर वाढ होते. मात्र त्यांचे हानिकारक दुष्परिणामही असतात. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय ती वापरणे बेकायदेशीरही ठरवले गेले आहे.

रुग्णाच्या शरीरात कमी प्रमाणात हार्मोन निर्माण होत असेल तर त्याला पर्याय म्हणून डॉक्टर ही स्टेरॉईडस् लिहून देतात. सहसा कर्करोग किंवा एड्स यासारख्या आजारांमध्ये वजन झपाट्याने कमी होत जाते आणि स्नायू कमी होत जातात.

त्यावेळी त्यांची निर्मिती वाढण्यासाठी ती दिली जातात. मात्र खेळाडू ती वापरतात त्यावेळी शरीराची स्नायूबांधणीची नैसर्गिक प्रक्रिया गतिमान बनवणे हा त्यामागचा हेतू असतो.

अर्थातच नैसर्गिक प्रक्रियेतील ती ढवळाढवळ असते आणि प्रत्यक्षात आवाक्यात नसलेल्या ताकदीपेक्षा अधिक ताकदीची कामे त्या वेळेपुरती करण्याचा तो प्रकार असतो.

आपण नेहमी उचलत असलेल्या वजनाहून अधिक प्रमाणात वजन उचलतो त्यावेळी स्नायूंचे तंतू सूक्ष्म प्रमाणात फाटतात.

शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेनुसार हे तंतू दुरूस्त केले जातात आणि तिथे पूर्वीच्या तुलनेत अधिक मोठ्या पेशी तयार केल्या जातात. त्यामुळे अधिक बळकट स्नायूंची निर्मिती होते.

यालाच वैद्यकीय भाषेत ‘मस्क्युलर हायपरट्रॉफी’ असे म्हटले जाते. कालांतराने स्नायू फाटणे आणि त्यांची पुनर्निर्मिती ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा होत राहिल्याने स्नायूंची मोठी वाढ होते.

शरीरातील नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन हार्मोन ही प्रक्रिया नैसर्गिकरीत्या पार पाडत असतो. परंतु अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉईडस् या प्रक्रियेसाठी नैसर्गिक हार्मोनला मदत करतात.

एकदा इंजेक्शनद्वारे एएएस दिले गेले की ते रक्तप्रवाहात मिसळून स्नायू ऊतींपर्यंत पोहोचते. त्यानंतर ते स्नायूपेशींच्या ‘अँड्रोजेन रिसेप्टर’पर्यंत नेले जाते. तिथे पोहोचलेले स्टेरॉईड पेशीच्या डीएनएशी आंतरक्रिया करते आणि पेशीच्या प्रथिननिर्मिती प्रक्रियेला उत्तेजित करते. त्यामुळे पेशीच्या वाढीलाही उत्तेजन मिळते.

एएएसचे विविध प्रकार असून ते किती
प्रमाणात घेतले जाते त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अ‍ॅथलिटस् स्टेरॉईडस्ची विविध प्रकारची मिश्रणे वापरतात. याला स्टॅकिंग किंवा रेजिमेन्स म्हणतात.

याद्वारे अंतिम उत्तम परिणाम (खेळाडूंच्या दृष्टीने, आरोग्याच्या नव्हे) मिळतात. फक्त कामगिरी उंचावण्यापुरताच हा उपयोग मर्यादित नसतो तर ज्यांना आपल्या ताणल्या गेलेल्या आणि अतिवापर झालेल्या दुखर्‍या स्नायूंपासून जलद सुटका करून घेऊन स्नायूंची जलद गतीने वाढ करायची असेल तेही याचा वापर करतात.

अतिव्यायामामुळे कोर्टिसोल पाझरते. यालाच ‘स्ट्रेस हार्मोन’ असेही म्हणतात. तो स्नायूंच्या उती मोडतो आणि त्यापासून स्नायूदुखी निर्माण होते.

एएएस कॉर्टिसोलला प्रतिबंध करतात. ही स्टेरॉईडस् कॉर्टिसोलला स्नायूंच्या रिसेप्टर स्थानापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे स्नायू तुटण्याची प्रक्रिया रोखली जाते.

स्नायू कमी प्रमाणात तुटणे याचा अर्थ कमी प्रमाणात दमणे. त्यामुळे विशेषतः धावपटू झटपट ताजेतवाने होतात. मात्र या सगळ्या वरवर चांगल्या वाटणार्‍या परिणामांमागे स्टेरॉईडस्चे अत्यंत भयावह दुष्परिणाम लपलेले असतात.

मुळातच ही वैध नसलेली स्टेरॉईडस् बेकायदेशीररीत्या घेतली जात असल्यामुळे अनेकदा प्रशिक्षकांना आणि खेळाडूंनाही आपण कोणती स्टेरॉईडस् घेत आहोत ते माहिती नसते.

त्यामुळे बंदी घातली गेलेली अनेक स्टेरॉईडस् शरीरात जाण्याची शक्यता असते. ब्ल्यू क्रॉस ब्ल्यू शील्ड या अमेरिकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, अमेरिकेतील सुमारे दहा लाख मुले खेळातील कामगिरी उंचावण्यासाठी स्टेरॉईडस्चा वापर करतात. यात मुली आणि महिला खेळाडूंची संख्याही वाढती आहे.

7 टक्के शालेय मुली केवळ शालेय पातळीवरील स्पर्धांसाठी स्टेरॉईडस्चा वापर करताना आढळल्या आहेत. ही बाब अर्थातच गंभीर मानली जात आहे.

हेच लोण इतर देशांमध्येही पसरत आहे. म्हणूच स्टेरॉईडस्चे दुष्परिणाम समजून घेणेही आवश्यक आहे. दुर्गंधीयुक्त श्वास, झटके येणे यांसारख्या काही सौम्य दुष्परिणामांबरोबरच स्टेरॉईडस्मुळे तरुणपणीच टक्कल पडते.

मुलींमध्ये मिशांसारखी लव ओठांवर उगवणे, स्तनांची अपुरी वाढ होणे यासारखे दुष्परिणाम होतात. मुले आणि मुली या दोघांमध्येही लघुशंकेच्या वेळी जळजळ होण्यापासून नपुंसकता किंवा वंध्यत्व येण्यापर्यंतचे दुष्परिणाम आढळतात.

याखेरीज मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोकाही संभवतो. मानसिकदृष्ट्या विचार करता व्यक्ती अधिक आक्रमक आणि हिंसक बनत असल्याचा निष्कर्षही काही संशोधनातून काढण्यात आला आहे.

गोळ्या, पूड आणि द्रव पदार्थ अशा तिन्ही स्वरुपात स्टेरॉईडस् मिळतात. द्रवरूपातील स्टेरॉईडस् शरीरात इंजेक्शनद्वारे टोचली जातात.

स्टेरॉईडस् घेतली गेली आहेत का, हे तपासण्यासाठी लघवीच्या चाचणीपेक्षा रक्ताची चाचणी अधिक विश्वासार्ह मानली जाते.

खेळाडूंची तशी चाचणी पत्रकेही तयार केली जातात. परंतु याहून अधिक चांगली आणि विश्वासार्ह चाचणी तयार करण्याविषयीचे संशोधन प्रगतिपथावर आहे.

स्टेरॉईडस्चे दुष्परिणाम पाहता कामगिरी उंचावण्यासाठी थोडे अधिक परिश्रम करणे, आरोग्यपूर्ण आहार घेणे, शांत झोपणे आणि नैसर्गिकरीत्याच आपली ताकद वाढवणे अधिक चांगले ठरते हे कोणाही खेळाडूच्या लक्षात आले पाहिजे.

प्रत्यक्षात पारितोषिकाच्या आणि मानसन्मानाच्या आमिषापोटी आपल्या आरोग्याचा बळी देण्यास खेळाडू मागे-पुढे पाहत नाहीत आणि नंतर आयुष्यभर या दुष्परिणामांना तोंड देत बसतात.

म्हणूनच स्टेरॉईडस्विषयी जागृती केली जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे क्रीडातज्ज्ञांचे
म्हणणे आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*