पी.व्ही.सिंधूला रौप्यपदक

0
नानजिंक। ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या भारताच्या पी.व्ही.सिंधूला जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सिंधूला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या कॅरोलिन मरिनने पराभूत केले.

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना एकतर्फी झाला. कॅरोलिन मरिरने सिंधूवर 21-19, 21-10 असा सहज विजय मिळवला. या सामन्यात सिंधू पहिल्या सेटमध्ये आघाडीवर होती. पण, ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसर्‍या सेटमध्ये मरिनच्या जोरदार आक्रमणापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली.

त्यामुळेच सिंधूला सुवर्णपदकाला मुकावे लागले. सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.पहिला सेट सिंधू सहज जिंकेल असे वाटत होते. पहिल्या सेटमध्ये तिने 14-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र, मरिनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. मरिनने झटपट 6 गुण मिळवत सिंधूशी 15-15 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही आक्रमण खेळ करत 18-18 अशी बरोबरी साधली.

मात्र, त्यापुढे मरिनने आपले वर्चस्व राखत सेट 21-19 असा जिंकला. पहिला सेटमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने पिछाडीवर असताना जिंकल्याने मरिनचे मनोबल चांगलेच वाढवले होते. दुसर्‍या सेटमध्ये मरिनच्या आक्रमक खेळापुढे सिंधू निष्प्रभ ठरली.

हा सेट मरिनाने 21-10 असा सरळ जिंकला. सिंधूने गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

LEAVE A REPLY

*