फ्रान्स पुन्हा जिंकणार?

0
मॉस्को । सॅम्युअल उमटिटीच्या हेडरनं फ्रान्सला फायनलचं तिकीट आणि सेलिब—ेशनचीही संधी मिळवून दिली. रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममधून सुरु झालेल्या या सेलिब—ेशनचं लोण थेट पॅरिसच्या शॉज एलिजे या राजपथासह देशाच्या कानाकोपर्‍यात परसलं होतं.

कारण ज्या देशात फुटबॉल हा श्वास आहे. आणि तो देश तब्बल बारा वर्षांनी फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारणार असेल, तर सेलिब—ेशनला उधाण हे येणारच.

2006 सालच्या विश्वचषकाची फायनल आठवते? त्या सामन्यात फ्रान्सच्या झिनेदिन झिदाननं इटालीच्या मार्को मॅटेराझीला जादा वेळेत डोक्यानं ठोकर मारली होती. परिणामी पंचांनी झिदानला रेड कार्ड दाखवलं होतं आणि त्यानंतरच इटालीनं फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा पराभव करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. विश्वचषकाच्या फायनलमधल्या त्या पराभवानं फ्रान्सवासियांच्या काळजाला झालेली जखम अजूनही भळभळत आहे. त्यात 2016 साली मायदेशातल्या युरो कपच्या फायनलमध्येही फ्रान्सला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालकडून 0-1 अशी हार स्वीकारावी लागली होती. गेल्या बारा वर्षांमधल्या त्या दोन पराभवांची सार्‍या फ्रान्सला बोच लागून राहिली होती.

फ्रान्सनं आजवरच्या इतिहासात फिफा विश्वचषकावर एकदाच आपलं नाव कोरलं आहे. डिडियर डेशॉच्या नेतृत्त्वाखाली फ्रान्सनं 1998 साली फिफा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये डिडियर डेशॉच्या फ्रान्सनं ब—ाझिलचा 3-0 असा धुव्वा उडवला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे यंदा फ्रान्सनं पुन्हा विश्वचषकाची फायनल गाठली असताना तेच डिडियर डेशॉ फ्रान्सचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळं डिडियर डेशॉ यांना रशियातल्या फिफा विश्वचषकात अनोख्या विक्रमाची संधी आहे.

फ्रान्सनं विश्वचषक जिंकला, तर एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्वचषक जिंकणारे डेशॉ तिसरे फुटबॉलवीर ठरू शकतात. याआधी जर्मनीच्या फ्रान्झ बेकेनबाऊर आणि ब—ाझिलच्या मारियो झागलो यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्यानं विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता. बेकेनबाऊर हेही 1974 सालच्या जर्मनीच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर्मनीनं 1990 साली विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मारियो झागलो याचा ब—ाझिलच्या 1958 आणि 1962 सालच्या विश्वचषक संघात समावेश होता.

LEAVE A REPLY

*