हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक

0
ब्रेडा । नेदरलँडच्या ब्रेडा शहरात सुरु असलेल्या, चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने ठरवुन दिलेल्या नियमांनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेचं हे शेवटचं वर्ष असणार आहे, त्यामुळे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणं भारतासाठी महत्वाचं ठरणार आहे.

अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला नेदरलँडच्या सामन्यात किमान बरोबरी राखणं गरजेचं होतं. 60 मिनीटं चाललेल्या या थरारक सामन्यात दोन्ही संघांनी भक्कम बचाव केला. मात्र अखेरच्या सत्रात 1-1 बरोबरी झाल्यानंतर, नेदरलँडने केलेला दुसरा गोल पंचांनी अवैध ठरवल्यामुळे भारताचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चीत झालं.

सामन्यात तिसर्‍या मिनीटाला भारताला गोल करण्याची संधी आली होती. मात्र नेदरलँडच्या गोलकिपरने केलेल्या भक्कम बचावामुळे भारताची संधी वाया केली. यानंतर मनदीप आण जरमनप्रीतने चाल रचत नेदरलँडवर हल्ला चढवला, मात्र भारताचा हा हल्लाही नेदरलँडने परतवून लावला. यानंतर मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकाच्या संघावर आक्रमण रचली, मात्र गोलकोंडी फोडण्यात कोणत्याही संघाला यश आलं नाही.

अखेर चौथ्या सत्रात 47 व्या मिनीटाला, मनदीप सिंहने पेनल्टी कॉर्नरवर निर्माण झालेल्या संधीतून भारताला पहिली आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारतीय संघाने काहीकाळ सामन्याचं नियंत्रण आपल्याकडे राखलं होतं. मात्र याही सामन्यात भारताला आपली जुनी खोड पुन्हा एकदा नडली. अखेरच्या मिनीटांमध्ये सामन्यावरचा ताबा सुटल्याने नेदरलँडच्या ब्रिंकमॅनने 55 व्या मिनीटाला आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. अखेरच्या सत्रात नेदरलँडने आक्रमण करत आणखी एक गोल करुन भारताला धक्का दिला,

मात्र तिसर्‍या पंचांनी नेदरलँडचा हा गोल अवैध ठरवल्यामुळे सामना पुन्हा 1-1 असा बरोबरीत आला. यानंतर शेवटचं दीड मिनीट भारताने बचाव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या म्हणजेच रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून भारताला विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी लढावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

*