भारताचा आयर्लंडवर दणदणीत विजय

0
नवी दिल्ली । दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताने आयर्लंडला विजयासाठी दिलेल्या 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या 12.3 षटकात 70 धावा करून गारद झाल्याने भारतीय संघाचा 143 धावांनी मोठा विजय झाला.

भारतीय गोलंदाजांपुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारताकडून उमेश यादव 2 यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर सिद्धार्थ कौल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. आयर्लंडकडून सलामीला स्टर्लिंग आणि शेनॉन मैदानावर उतरलेल्या जोडीतील स्टर्लिंगला उमेश यादवने दुसर्‍याच चेंडूवर रैनाकडे झेल देण्यास भाग पाडत तंबूचा रस्ता दाखवला.

उमेश यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्या षटकात अवघी 1 धाव दिली. दुसर्‍या षटकात सिद्धार्थ कौलने 3 धावा दिल्या. तिसर्‍या षटकात गोलंदाजीस आलेल्या उमेश यादवला मात्र पोटरफिल्डने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. उमेश यादवच्या पहिल्या तीन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकल्यानंतर पोर्टरफिल्डने पुढील चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो त्रिफळाचित झाला. त्यानंतर चौथे षटक टाकण्यासाठी आलेल्या सिद्धार्थने चौथ्या चेंडूवर शेनॉनचा बळी घेत आयर्लंडला मोठा धक्का दिला.

5 व्या षटकापर्यंत आयर्लंडने आपले महत्त्वाचे तीन फलंदाज गमावत अवघ्या 27 धावांपर्यंत मजल मारली. आयर्लंडला विजय मिळविण्यासाठी एक मोठी भागीदारी होण्याची आवश्यकता आहे. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चहलने अँडीला त्रिफळाचित केले. त्याने 6 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांपुढे आयर्लंडच्या खेळाडूंना मैदानावर जम बसवणे मुश्किल झाले होते. सातव्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर केविनला हार्दिक पांड्याने कुलदीपकडे झेल देत आयर्लंडला पाचवा धक्का दिला. अवघ्या 32 धावांवर आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

8 व्या षटकात चहल गोलंदाजीला आला आणि दुसर्‍याच चेंडूवर त्याने सिमी सिंहला बाद करत सहावा धक्का दिला. त्यानंतर कुलदीपच्या गोलंदाजीवर विल्सनने चौकार ठोकला मात्र तिसर्‍या चेंडूवर कुलदीपने विल्सनला त्रिफळाचित केले. विल्सनने 15 धावा केल्या. आयर्लंडने 7 गड्यांच्या बदल्यात अवघी 44 धावसंख्या उभारली. थॉमप्सनने सलग दोन चौकार ठोकत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. 11 व्या षटकात उमेशने डॉकरेलला झेलबाद करत आठवा धक्का दिला. त्यानंतर रनकिनने एक षटकार ठोकला. त्यापाठोपाठ थॉप्सनने 13 धावा करून तंबूचा रस्ता धरला आणि भारताचा विजय निश्चित झाला.

तत्पूर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने निर्धारित षटकात 4 बाद 213 धावा केल्या. लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांचे अर्धशतक व हार्दिंक पंड्याच्या तडफदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 213 धावा फटकावल्या.

आयर्लंडविरुद्धच्या दुसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने दमदार फलंदाजी केली. राहुलने 36 चेंडूंत 3 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 70 धावा केल्या. राहुल बाद झाल्यावर रैनाने भारताचा डाव सावरला. रैनाने 45 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 69 धावांची खेळी साकारली. पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पंड्याने फक्त 9 चेंडूंत 1 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

LEAVE A REPLY

*