बांगलादेशचा सात गडी राखून विजय

0
क्वॉललंपूर । क्वॉललंपूर येथील किनरारा ओवल अ‍ॅकेडमीच्या मैदानावर आज झालेल्या महिला टी-20 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने भारतावर 2 चेंडू आणि 7 गडी राखून विजय मिळवला.

रुमाना अहमदची नाबाद 42 धावांची आणि फरगना हकचे नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने भारताच्या विजयी घोडदौडीला लगाम घातला. भारतीय संघाला दोन विजयानंतर बांगलादेशकडून पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 7 बाद 141 धावा केल्या. कर्णधार मिताली राज (15), सलामीवीर स्मृती मानधना (2) आणि पूजा वस्त्राकार (20) या तिघी झटपट बाद झाल्या. मात्र, हरमनप्रीत कौरने 42 धावा केल्या. तिला दीप्ती शर्माने चांगली साथ दिली. दिप्तीने 28 चेंडूत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. तर हरमनप्रीतने 37 चेंडूत 6 चौकारांसह 42 धावा केल्या.

या दोघींच्या खेळीमुळे भारताला 20 षटकात 7 बाद 141 धावा केल्या. 142 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. आयेशा रहमान ही 12 धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या फरगना हकने अप्रतिम फलंदाजी केली. तिने नाबाद 52 धावा केल्या.

या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार समाविष्ट होता. दरम्यान, सलामीवीर शमिमा सुलताना 33 धावांवर बाद झाल्यानंतर लगेचच निगार सुलतानाही 1 धाव काढून बाद झाली. अखेर फरगनाने रुमाना अहमदच्या साथीने किल्ला लढवला. आणि शेवटच्या षटकात 2 चेंडू राखून सामना जिंकवला.

LEAVE A REPLY

*