Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिवाजीराजांचा मानवतावाद !

शिवाजीराजांचा मानवतावाद !

जळगाव

छत्रपती शिवरायांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, पण त्यांची तलवार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी तळपत होती. शिवरायांचा इतिहास हा केवळ ढालतलवारीपुरता मर्यादित नाही, त्यांनी समतेसाठी संघर्ष केला, महिलांचा सन्मान हे त्यांचे महत्वाचे धोरण होते. त्यांनी शेतकर्‍यांचे हित जोपासले.

- Advertisement -

‘शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या सैनिकांना दिल्या. ‘धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं शत्रूंची जरी असली तरी त्यांचे रक्षण आणि सन्मान करावा’, हे आदेश त्यांनी आपल्या सैनिकांना दिले.

शिवाजीराजे जेव्हा दक्षिण विजयासाठी तामिळनाडूत गेले होते, तेंव्हा व्यापारी करार करण्यासाठी डच शिष्ट मंडळ त्यांच्या भेटीसाठी आहे. त्या करारात अत्यंत महत्त्वपुर्ण कलम शिवरायांनी समाविष्ट केले. ते कलम पुढील प्रमाणे.

शिवाजीराजे डच शिष्टमंडळाला म्हणाले “यापूर्वी तुम्हाला येथे स्त्री आणि पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हाला स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुमच्यावर कडक करवाई करतील.” शिवरायांनी व्यापारी करारात अंतर्भूत केलेल्या या कलमातून त्यांचा मानवतावाद प्रकर्षाने दिसतो.

शिवरायांच्या समकालीन डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज या युरोपियन सत्ता खुलेआम स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून वागवत असताना शिवरायांच्या राज्यात मात्र स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून वागविले जात नव्हते. तर माणूस म्हणून त्यांचा सन्मान केला जात होता. शिवाजी महाराज गुलामगिरीच्या विरोधात होते.

इ. स. 1670 साली गोव्या च्या पोर्तुगीज व्हाईसरॉयने त्याच्या राजाला पाठविलेल्या पत्रात शिवरायांबद्दल म्हटले आहे की, “या भागात शिवाजी नावाचा अत्यंत पराक्रमी, नितीमान आणि धोरणी राजा आहे. तो युद्धकला आणि राजनितीमध्ये अत्यंत निपूण आहे. चढाई कधी करायची आणि माघार कधी घ्यायची यामध्ये तर तो अत्यंत निष्णांत आहे. तो आणि त्याची प्रजा मुर्तिपूजक असली तर मुर्तिपूजा न करणारांना ते आनंदाने नांदू देतात.”

अशा प्रकारचा उल्लेख पोर्तुगीज पत्रात आढळतो. वरील पत्रावरुन स्पष्ट होते की शिवरायांनी परधर्माचा, परमताचा, इतरांच्या भावनांचा, श्रद्धांचा आदर केला. आपल्या धार्मिक भावना इतर धर्मियांवर लादण्याचा आततायीपणा महाराजांकडे नव्हता. तर अत्यंत साहिष्णुपणे त्यांनी आपल्या राज्यातील परधर्मियांचा आदर केला.

– श्रीमंत कोकाटे
इतिहास अभ्यासक

- Advertisment -

ताज्या बातम्या