Type to search

Breaking News जळगाव राजकीय

मुक्ताईनगरात माघार घेत जाणीवपूर्वक तडजोड : शरद पवार

Share

जळगाव । राज्यात आघाडी सरकार आणण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. यामुळेच मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार घेऊन जाणीवपूर्वक तडजोड केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी जळगावात दिली. मुक्ताईनगरात अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आम्ही पाठींबा दिला असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करतील, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता, राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, गत 30 वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एकनाथराव खडसे यांनी केले असले, तरी येथे कोणतीही कामे झालेली नाहीत. हा मतदारसंघ दोन नद्यांच्या संगमावरील असून विकासापासून दूर आहे. त्यामुळे यंदा येथे निश्चितच परिवर्तन होणार आहे. एकेकाळी जळगाव जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर होता. आम्ही राज्याच्या मंत्रिपदावर असताना त्या त्या काळातले मुख्यमंत्री आम्हाला जळगावच्या विकासाचे दाखले द्यायचे. आता मात्र जिल्ह्यातल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे हा जिल्हा मागे राहिला आहे.

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता काही जण ज्योतिषाचा सल्ला घेऊन भविष्य वर्तवितात; अशी खिल्लीही खासदार शरद पवार यांनी उडवली. पुढे पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने सत्तेचा वापर करून सीबीआय, ईडी याचा वापर करून राष्ट्रवादीच्या लोकांना पक्षात घेतले. मात्र, जळगाव जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे की, या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही माणूस भाजपवाल्यांना फोडता आलेला नाही. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी राज्याचे माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, निरीशक करण खलाटे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

विलीनीकरणाचा विषयच नाही
मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे. सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात, असेही पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत, असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.

जळगावातील रस्त्यांचा अनुभव घेतला
मी एरंडोलवरून जळगाव येत असताना रस्त्याचा अनुभव घेतला. यामुळे जळगाव जिल्ह्यात रस्ते आहेत की नाही, हा प्रश्न मला पडला. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच रस्ते बांधणीचे काम असतानाही ही अवस्था आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!