कोणी कोणतीही कुस्ती खेळो, आम्ही रस्त्यावर कुस्ती खेळणार!

आ.डॉ.सतीश पाटील यांचा महाजनांना टोला

0
जळगाव । “कोणी मातीत कुस्ती खेळतंय तर कुणी गादीवर कुस्ती खेळतोय. कोणी, कोणतीही कुस्ती खेळो, आम्ही मात्र रस्त्यावर उतरून कुस्ती खेळणार आहोत,” असा उपरोधिक टोला आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता बुधवारी लगावला. भाजपाच्या मंत्र्यांची ‘गादीवरची कुस्ती’ सर्वत्र फेमस असल्याची खिल्लीही त्यांनी उडवली. खडसेंनी विरोधकांकडे उमेदवार नसल्याची चिंता न करता आपली स्वतःची चिंता करावी, असाही टोला डॉ. पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी काढण्यात आलेल्या ‘जबाब दो’ आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सतीश पाटील यांनी चांगलीच बॅटींग केली. ते म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांमध्ये संस्कार आणि संस्कृतीच शिल्लक राहिलेली नाही. सगळी अश्वासने फोल ठरलेली आहेत. पालकमंत्री जिल्हावासियांच्या डोळ्यांनीही दिसत नाहीत. त्यामुळे आता भाजपावाल्यांना ठोकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एटी नाना जिल्हयात प्लास्टिक पार्क आणणार होते, मग कुठे गेले प्लास्टिक पार्क? आता त्यांचेच पार्क बंद होण्याची वेळ आली आहे. तेव्हा कुठून आणणार ते प्लास्टिक पार्क, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उमेदवारीवरुन पहिले आप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात सक्षम उमेदवार आहेत, असे ठासून सांगतांनाच डॉ. पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्याकडे इशारा करीत, आप्पा थोडी हिंमत धरा, आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत, असा धीर दिला. मात्र देवकरांनी लागलीच व्यासपीठावरून पलटवार केला. कोणी नसेल तर शेवटी मी आहेच. मात्र, अण्णा तुम्ही माझ्यापेक्षा सक्षम आहात असे देवकर म्हणाले. यावेळी अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग सुरू असल्याची बाब लक्षात आणून देताच चाणाक्ष सतीश पाटील यांनी रावेरमध्ये कोणी नसल्यास आहे आमचा बिचारा रवींद्रभैय्या, अशी कोटी केली. शेवटी सतीश पाटील यांनी जिल्हयातील नेतेच निवडणूक लढविण्यासाठी सक्षम आहेत असे सांगून उगाच बाहेरच्या माणसाचा टीआरपी वाढवू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करीत भाषण आवरते घेतले.

LEAVE A REPLY

*