वनशेतीचा पर्याय फायद्याचा

0
शेती क्षेत्रापुढील समस्यांची यादी मोठी आहे आणि त्यामध्ये अल्पमुदतीत बदल होऊ शकत नाहीत, हे आजचे वास्तव आहे. म्हणूनच या प्रश्नाकडे नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. शेतकर्‍याला जगवायचे असेल तर दोनच मार्ग आहेत. सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शेती करणे किंवा शेतीवर असे पीक लावणे की ज्यापासून त्याला जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळावयास हवा. धान्य शेती त्याला एवढा पैसा देऊ शकत नाही. म्हणूनच वन शेती हा त्यासाठी चांगला पर्याय आहे.

सध्या मान्सूनच्या पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्यामुळे शेतकर्‍यांसह सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरे म्हणजे गेल्या शंभर वर्षांचा इतिहास असे सांगतो की, एकही वर्ष मान्सून आलाच नाही, असे झालेले नाही. पण तरीही आपण पावसाच्या नावाने ओरड करतो. याचे कारण पडणारा पाऊस साठवण्यात आपण कमी पडतो.

अलीकडील काळात पाऊस बदलतो आहे हे तर सर्वश्रुतच आहे. पावसाचे दिवस कमी होत आहेत. पावसाचा वेग वाढत आहे. वेगाने वाहणारे पाणी जमिनीत मुरत नाही. खरीप आणि रब्बी हंगामाची शाश्वती राहिलेली नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. आत्महत्या वाढत चालल्या आहेत. दुष्काळाला तोेंड द्यायला सरकारी यंत्रणा कमी पडत आहे. विरोधी पक्ष मदत करण्याऐवजी उणेदुणे काढण्यात व्यस्त आहे. सरकारी यंत्रणा सुस्त आहे या गोष्टी आता नेहमीच्याच झाल्या आहेत. या सर्व गोष्टीत अल्पमुदतीत बदल होऊ शकत नाहीत, हेही खरे आहे.

म्हणूनच या प्रश्नाकडे नवीन आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे असे कोणालाच वाटत नाही, ही मात्र दुर्दैवाची बाब आहे. हवामान बदलामुळे खरीप आणि रब्बी साधत नाही याचा उल्लेख आधी आलाच आहे. खरिपाच्या पेरणीच्या वेळी पावसाअभावी जमिनीत ओल नसते. बरेचदा तर पेरणीही वाया जाते. दुबार पेरणी करावी लागते. कापणीच्या वेळी नेमका पाऊस येतो आणि तयार झालेल्या धान्याची नासाडी होते. रब्बीच्या पेरणीच्या वेळी समाधानकारक ओल असते. पण जसजसे पीक वाढत जाते तसतसे ओल कमी होऊन नेमके दाणे भरण्याच्या वेळी पुरेशी ओल नसल्यामुळे दाणे संख्येने कमी भरतात आणि जे भरतात ते बारीक पडतात. शिवाय पीक उभे झाल्यावर जानेवारी महिन्यात होणारी गारपीट तोंडातला घास काढून नेते. अशाप्रकारे शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात अडचणी येतात आणि शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था डबघाईला येते.

यातून काही मार्ग नाही का? जे अल्पभूधारक आहेत, ज्यांच्याजवळ फक्त एक-दोन एकर शेती आहे अशा शेतकर्‍यांजवळ शेती कसण्यासाठी आवश्यक असणारे भांडवल नसते. सर्वच कर्जाचा मामला. पीक बुडाले तर कर्ज डोक्यावर बसते आणि नवीन हंगामासाठी जुळवाजुळव अशक्य बनते. पिढ्यान् पिढ्या हेच चालू आहे. या दृष्टचक्रातून त्याला बाहेर पडणे शक्य नाही का?

कुटुंब चालवण्यासाठी दर महिन्याला किमान 5 हजार लागतात. म्हणजे वर्षाला रुपये 60 हजार लागत असतील तरच तो जगू शकतो. खर्च वजा जाता एवढी रक्कम त्याला त्याच्या तुकड्यापासून मिळण्याची अपेक्षा त्याने ठेऊ नये असे म्हणणे म्हणजे बुद्धीशी दुष्मनी करण्यासारखेच आहे.

या पार्श्वभूमीवर त्याला जगवायचे असेल तर दोनच मार्ग आहेत. सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शेती करणे किंवा शेतीवर असे पीक लावणे की ज्यापासून त्याला जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळावयास हवा. धान्यशेती त्याला एवढा पैसा देऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. मग त्याने काय करावयास हवे?

वनशेती हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याने आपल्या जमिनीवर अशी झाडे लावावीत की जी त्याला तेवढे उत्पन्न मिळवून देईल. साधारणपणे 5 ते 7 वर्षांत ती झाडे फळे द्यायला सुरुवात करतील. शिवाय त्याच्याजवळ लाकूडफाटा पण उपलब्ध असेल. अर्थात या सहा-सात वर्षांत त्याने गुजराण कशी करायची, हा प्रश्न आहेच. पण सध्याही तो जगण्यासाठी शेतीशिवाय दुसरे काहीतरी काम करत असेलच. त्या उत्पन्नाला सरकारने जोड देऊन हातभार लावला तर तो सहजपणे जगू शकतो.

सरकार सामाजिक वनीकरणावर अमाप पैसा खर्च करीत असते. त्या खर्चापासून काहीच साध्य होत नाही, असे अभ्यासक म्हणतात. हा पैसा सरकार अशा कामावर खर्च करू शकते. शिवाय रोजगार हमी योजनेचा फाफट पसारा वाढवण्यापेक्षा या रचनात्मक कामावर तो खर्च झाला तर त्याचा देशाला दीर्घकालीन फायदा मिळू शकेल. आज चिंच, सीताफळे, बोर, डिंक, निंबोण्या, शेवगा, कवठे, जळतण, जांभूळ, शिंदीपासून निर्माण होणारी निरा, शुद्ध मध यांचेे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी या पिकांकडे वळला तर त्याला त्यांचा लाभ निश्चितच मिळू शकेल.

आज देशात जंगलाखालील जमीन खूपच कमी झाली आहे. महाराष्ट्रात तर जंगलाखालील जमीन 8 टक्के उरलेली आहे. वनक्षेत्र कमी होत चालल्यामुळे पर्यावरणीय परिणाम जाणवत आहेत. उष्णतामान वाढत चालले आहे. पर्जन्यमान अस्थिर बनत आहे. या सर्वांचे प्रतिकूल परिणाम येणार्‍या काळात बिकट होत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर वृक्षराजी वाढली तर तापमानावर नियंत्रण येईल आणि पावसाळा स्थिर झाला तर त्याचा दुरगामी अनुकूल परिणाम शेती व्यवसायावर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

सामाजिक वनीकरणाखाली रस्त्यावर किंवा गायरानावर लावलेल्या झाडाचा धनी कोणीही राहत नाही. पण शेतावर झाड लावले तर त्याला हात लावायला कोणीही धजावणार नाही कारण त्या झाडाला कोणीतरी मालक राहील. शेतकर्‍याला जगवण्यासाठी कायम मदत देत राहणे योग्य नव्हे. त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्यावे.
– डॉ. दत्ता देशकर

LEAVE A REPLY

*