मराठी प्रेमाचे बेगड खरवडले!

0
‘आता मी मराठी नाटके आणि चित्रपट क्वचितच पाहते. मराठी आणि हिंदी मालिका तर अजिबात बघत नाही. आजकाल मराठी नाटकांना इंग्रजी भाषेत मथळे देण्याची खोड जडली आहे. ते पाहिले की माझा मस्तकशूळ उठतो. ज्या नाटकांचे मथळे इंग्रजी भाषेत दिले जातात ती नाटके मी बघत नाही.

अर्थात परिस्थितीत त्याने फारसा फरक पडणार नसला तरी मी माझ्या पद्धतीने निषेध व्यक्त केल्याचे समाधान मला मिळते. मराठी भाषेची आणि मराठी भाषिकांची इतकी दैन्यावस्था झाली आहे का? की आपल्याला मथळ्यांसाठी मराठी शब्दही सापडू नयेत?’ असा प्रश्न दिग्दर्शिका व लेखिका सई परांजपे यांनी परवा उपस्थित केला. सई परांजपे या रँगलर परांजपे यांची नात आणि गेल्या पिढीतील प्रसिद्ध लेखिका शकुंतला परांजपे यांच्या कन्या आहेत.

संवेदनशील दिग्दर्शिका आणि लेखिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. आचार-विचारांत खुलेपणा, नव्याचा स्वीकार करण्याची खिलाडूवृत्ती आणि सामाजिक समस्यांचे भान ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये सांगितली जातात. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ‘मुलांचा मेवा’ आणि ‘खेळण्यांच्या राज्यात’ ही पुस्तके लिहिली होती.

त्यांनी व्यक्त केलेली खंत फक्त मराठी नाटकांनाच लागू आहे का? जिथे शक्य असेल तिथे मराठी भाषेची मोडतोड सुरू आहे. ‘मराठी’ असा शब्द उच्चारला तरी कित्येकांना मराठी भाषेचा उमाळा दाटून येतो. ज्यांचा मथळासुद्धा इंग्रजी शब्दाशिवाय पुरा होत नाही, असा महाराष्ट्राचा ‘टाळ’सुद्धा मराठी भाषेचाच काळ ठरला आहे. मराठी भाषेला दैन्यावस्था प्राप्त झाल्याबद्दल बेंबीच्या देठापासून ओरड केली जाते;

पण ते सगळे आरण्यरुदन का ठरते? कारण मराठीचे इंग्रजीकरण करण्यात आणि सर्रास इंग्रजाळलेली मराठी वापरण्यात तथाकथित मराठी बुद्धिवादीच आघाडीवर आहेत. मराठी शब्दांना इतर भाषांमधील पर्याय शोधण्याऐवजी इंग्रजी शब्दांनाच मराठी भाषेत पर्याय शोधण्याची आणि ते कंसात छापायची वेळ येण्याइतकी दैन्यावस्था मराठी भाषेला का आली? याचा दोष सरकारला देणे हासुद्धा मराठीचा बेगडी पुळका!

चलबोलमध्ये (मोबाईल) मराठी टंकलेखनाची सुविधा उपलब्ध आहे. ती किती जण वापरतात? उलट बुद्धिवाद्यांना ‘भ्रमणध्वनी’ हा जोडाक्षरी बोजड शब्दच सोयीचा का वाटावा? मराठी शाळा बंद का पडत आहेत? सरकारी शाळांची दुरवस्था कोणामुळे होत आहे? ‘माझा मराठीचि बोलू कौतुके’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले खरे! तथापि ते फक्त वारकर्‍यांना पाठ आहे. सई परांजपे यांनी या वस्तुस्थितीवर नेमके बोट ठेवले आहे; पण ते मनावर घेण्याची समाजाची, सरकारची आणि प्रामुख्याने तथाकथित मराठी विद्वानांची मानसिकताच नसावी ही मराठीची खरी शोकांतिका आहे.

LEAVE A REPLY

*