Blog : विरोधकांचा आदर करण्याची संस्कृती कधी रुजेल?

0

राहुल गांधींनी राजकीय संस्कृतीचा ढासळता स्तर रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसे म्हटले तर राजकारणाशी ‘प्रामाणिक’ हा शब्द आता मेळ खात नाही.

तथापि राजकीय विरोधकांना सन्मान देण्याची संस्कृती पुन्हा रुजणे गरजेचे आहे. राजकीय विरोधक ‘शत्रू’ नसतात. ही विचारांची स्पर्धा आहे. सभ्य पद्धतीने आणि विशिष्ट नियमांनुसार हा खेळ खेळायला हवा.

लोकशाहीत हा खेळ सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी खेळला जातो, असे सांगितले जाते. देशातील नेते ही बाब समजून घेतील तेव्हा कदाचित खालच्या थराचे राजकारण ते करणार नाहीत.

तसे झाले तर राजकीय विरोधक त्यांचे शत्रू नसतील.‘एक स्वप्न अधुरे राहिले आहे. एक गीत मूक झाले आहे. एक ज्योत अज्ञातात हरवली आहे. स्वप्न होते भय आणि भुकेपासून मुक्त जगाचे!

एका महाकाव्याच्या गाण्यात गीता गुंजत होती. गुलाबाचा सुगंध त्यातून दरवळत होता. रात्रभर जळून मार्ग दाखवणार्‍या ‘त्या’ दिव्याची ज्योत… भारतमाता शोकमग्न आहे.

कारण तिचा सर्वात लाडका राजदुलारा आता कायमचा गेला आहे. मानवता उदास आहे. कारण तिच्या सेवकाने आणि पुजार्‍याने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

त्या पुजार्‍यात आम्ही वाल्मिकीच्या गाथेतील भावनांची झलक पाहिली होती. रामाप्रमाणे अशक्य आणि अकल्पनीय साध्य करणार्‍या साधकाची प्रतिमा त्यांच्यात होती.

तडजोडीस ते घाबरत नसत; पण घाबरून कोणतीही तडजोड करत नव्हते. शत्रू आणि विरोधकांसोबत मैत्री ठेवण्याची क्षमता, भद्रता, महानता कदाचित भविष्यात कधी दिसणार नाही. सूर्यास्त झाला आहे. आता तार्‍यांच्या आधारानेच आम्हाला आपला मार्ग शोधायचा आहे…’!

हे दीर्घ गुणगान या देशाच्या एका नेत्याबद्दल दुसर्‍या नेत्याने वाहिलेल्या आदरांजलीचा भाग आहे. त्या दिवंगत नेत्याचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या संसदेत श्रद्धांजली देणारे नेते आहेत अटलबिहारी वाजपेयी! यातील काही शब्दांत बदल होऊ शकतो.

कारण नेहरूजींच्या निधनानंतर वाहिलेल्या श्रद्धांजलीच्या इंग्रजी अनुवादाचा हा स्वैर अनुवाद आहे. त्याविषयी लिहीत असताना माझ्यासमोर त्यांचे मूळ भाषण नाही; पण पंडित नेहरूंबद्दल वाजपेयी यांच्या मनात किती आदर होता हे त्यातून कळते.

वाजपेयी त्यावेळी जनसंघाचे नेते होते आणि ते स्वत: तसेच त्यांचा पक्ष नेहरूंच्या धोरणांचे कट्टर विरोधक होते. असे असताना ‘नेहरू भारतमातेचे सर्वात लाडके राजकुमार होते’ असे म्हणताना वाजपेयींना संकोच वाटला नव्हता.

योगायोग म्हणजे मी या विषयावर लिहीत असताना हा दिवस म्हणजे 14 नोव्हेंबरच होता. पंडित नेहरू यांचा हा जन्मदिवस! पण त्यांचा जन्मदिन आहे म्हणून मला हे सगळे आठवत नाही.

आजच्या राजकारणासंबंधाने मला त्यांची आठवण होत आहे. आजचे राजकारण चिखल उडवून स्वार्थ साधणारे राजकारण आहे. अलीकडच्या काळात आपण सगळे राजकारणाची ही धूळवड पाहत आहोत.

राजकीय मतभेद हे मनभेदाच्याही पुढे गेले आहेत. आपल्या राजकीय विरोधकांबद्दल वाटेल ते बोलण्याची परंपरा आपण रुजवली आहे.

राजकीय विरोधकांवर खरे-खोटे आरोप करणे व व्यक्तिगत आक्षेपांशिवाय राजकारणाच्या मैदानात विजय मिळवता येत नाही, हा समज राजकारण्यांनी का करून घेतला असावा? निवडणुकांच्या वेळी तर चिखलफेकीचा भयानक उद्रेक होतो.

दीर्घकाळापासून निवडणूक काळातच हा खेळ चालतो हे दुर्दैव! खालच्या पातळीवरचे राजकारण एखाद्या स्पर्धेप्रमाणे चालू आहे. या स्पर्धेत कोणीही मागे राहू इच्छित नाही. मोठे नेतेसुद्धा या गटारगंगेत डुंबत राहतात. असे नेते प्रत्येक राजकीय
पक्षात आढळतात.

सिद्धांत, मूल्ये आणि आदर्शाचे राजकारण आता भूतकाळातील गोष्ट बनली आहे. त्यांची जागा आता संधिसाधू राजकारणाने घेतली आहे.

या नव्या राजकारणात कोणताही डाव अवैध नाही. राजकारणात विजयासाठी काहीही करणे उचित मानले जाते. वाटेल ते बोलून पुन्हा नाकारायला कोणालाच लाज वाटत नाही.

टीव्ही नव्हता तेव्हा ‘मी असे म्हटले नव्हते’ असे राजकीय नेते म्हणत. आता मात्र बहुतेक गोष्टी कॅमेर्‍यासमोर होतात. म्हणून ‘माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता’ असे सांगून नेते स्वत:चा बचाव करू पाहतात.

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राजकारण ‘पप्पू’ आणि ‘फेकू’पर्यंत जाऊन पोहोचले होते. ‘मौतका सौदागर’पासून ‘रामजादे’ आणि ‘हरमाजादे’ यांसारखी विशेषणे नेत्यांची हत्यारे बनली होती.

हे सर्व ऐकल्यावर मतदारांना हसू येते. नेत्यांचे असे सगळे प्रयत्न मतदारांना किती प्रभावित करतात? अशा लोकांची देशात कमतरता नाही; पण राजकारणाच्या या पतनाबद्दल लाज जरूर वाटते.

अशा लज्जास्पद वातावरणात अचानक एक बातमी वाचून आश्चर्य वाटले आणि समाधानही! बातमी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवडणूक भाषणाची आहे.

गुजरातमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पालनपूर येथील प्रचारसभेत ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’च्या घोषणा देणार्‍या आपल्या समर्थकांना राहुल यांनी चांगलेच खडसावले.

(लेखक – विश्वनाथ सचदेव ,ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

‘मोदीजी आमचे राजकीय विरोधक आहेत. म्हणून आम्ही त्यांच्याशी लढू; पण ‘मुर्दाबाद’सारखे शब्द कोणासाठीही वापरणार नाही’. बर्‍याच काळानंतर एखाद्या राजकीय नेत्याच्या तोंडून असे उदात्त शब्द ऐकावयास मिळाले.

अन्यथा एकमेकांची हवी तशी निंदानालस्ती करणे हे नेतेगण आपले ‘कर्तव्य’ मानू लागले आहेत. गुजरात निवडणुकीत पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलसंबंधी आक्षेपार्ह सीडी प्रसारित होणे भारतीय राजकारणाच्या घसरलेल्या दर्जाचे एक ज्वलंत उदाहरण आहे.

राहुल गांधींनी राजकीय संस्कृतीचा ढासळता स्तर रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसे म्हटले तर राजकारणाशी ‘प्रामाणिक’ हा शब्द आता मेळ खात नाही.

तथापि राजकीय विरोधकांना सन्मान देण्याची संस्कृती पुन्हा रुजणे गरजेचे आहे. राजकीय विरोधक ‘शत्रू’ नसतात. ही विचारांची स्पर्धा आहे. सभ्य पद्धतीने आणि विशिष्ट नियमांनुसार हा खेळ खेळायला हवा.

लोकशाहीत हा खेळ सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी खेळला जातो, असे सांगितले जाते. देशातील नेते ही बाब समजून घेतील तेव्हा कदाचित खालच्या थराचे राजकारण ते करणार नाहीत.

तसे झाले तर राजकीय विरोधक त्यांचे शत्रू नसतील. वाजपेयी पंडित नेहरूंच्या गुणांचा आदर करत, तसे आताचे नेतेही आपल्या राजकीय विरोधकांच्या गुणांचा आदर करू लागतील का?

नेहरू आणि वाजपेयी यांचाच आणखी एक प्रसंग आहे. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते आपल्या कक्षात पोहोचले तेव्हा त्यांना भिंतीवरील एक जागा रिकामी दिसली.

त्या जागी नेहरूंचे चित्र असायचे. अधिकार्‍यांना ‘जुन्या सत्तेचे ते चिन्ह’ हटवणे योग्य वाटले. मात्र वाजपेयी म्हणाले, ‘मी या कक्षात पूर्वी नेहरूंचे चित्र पाहिले होते.

ते येथे पुन्हा लावले जावे’. याला म्हणतात आपल्या राजकीय विरोधकांचा आदर करण्याची संस्कृती! गांधीजींनी नेहरूंना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते तर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘भारताचा ऋतुराज’ म्हटले होते.

अशा नेहरूंच्या धोरणांचा वाजपेयींनी जेवढा कडाडून विरोध केला होता तेवढेच ते त्यांचे कडवे प्रशंसकसुद्धा आहेत.
वाजपेयी आणि नेहरू यांच्या नात्याचा हा अध्याय देशाच्या राजकारणातील नेत्यांसाठी एक आदर्श ठरावा.

हा धडा जितक्या प्रामाणिकपणे आणि जितक्या लवकर राजकीय नेते शिकून घेतील तेवढे भारताचे भले होईल. आमचे वर्तमान सुधारेल आणि भविष्यकाळ उज्ज्वल होईल.

 

LEAVE A REPLY

*