Blog : प्रतिभावान नायकाचा अस्त

0
रंगभूमी आणि चित्रपटाशी निष्ठावान राहिलेल्या, वेगळ्या शैलीने रसिकांच्या मनावर वेगळी छाप उमटवणार्‍या, व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या शशीजींचे निधन ही अत्यंत दु:खद बाब आहे.
स्थित्यंतराच्या काळात त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि एक युग गाजवले. आजही त्यांची संवादफेक स्मरते, साधी नृत्यशैली डोळ्यापुढे येते आणि आठवणींचा डोंब उसळतो.
एखाद्या घराण्यावर परमेश्वराचा वरदहस्त असतो. रूप, वर्ण, कलागुण, संवेदना, भावना, संपन्नता या सर्वच अंगाने ते सरस असतात.

कदाचित त्यांच्या जीन्समध्येच अशी काही जादू असते जी इतरांना आकृष्ट करून घेते. कपूर घराण्यामध्ये हीच जादू आपण पाहिली आहे.

निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो, आडदांड शम्मी कपूर असो की लाजराबुजरा शशी कपूर असो… तिघा भावांची स्टाईल वेगळी, अभिनयाचा बाज वेगळा… देहयष्टीदेखील वेगळी… पण गाभा तोच, समृद्ध आणि सकस अभिनयाचा !

कपूर परिवाराच्या या पिढीने रुपेरी पडद्यावरच संपन्नतेचे एक वेगळे दालन उघडले होते. आता या पिढीतील शेवटचा मोती गळाला आहे. शशी कपूरच्या निधनाने एका समृद्ध दालनाची कवाडे बंद झाली आहेत, असेच आपण म्हणू शकतो.

शशी कपूर यांचे चित्रसृष्टीतील योगदान अनमोल आहे. याची दखल घेऊनच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. चित्रदेवतेची मनोभावे सेवा करणार्‍या कलाकारासाठी हा पुरस्कार म्हणजे घरचा आहेर असतो जो त्यांना मिळाला होता.

खरे सांगायचे तर हा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळतो याकडे समस्त चित्रसृष्टीचे डोळे लागलेले असतात. तो शशी कपूर यांना जाहीर झाला तेव्हा त्यांचा प्रत्येक चाहता सुखावला होता. त्यांची तीच छबी अनेकांच्या डोळ्यासमोर असेल.

लेखिका – सुलभा तेरणीकर, चित्रपट विश्लेषक

चित्रसृष्टीत कपूर खानदानाचे योगदान वादातीत आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांनाही फाळके पुरस्कार मिळाला होता. शशी कपूर यांनी ही परंपरा जपली हादेखील एक योगायोग होता.

त्यांना हा पुरस्कार केवळ चित्रसृष्टीतील भरीव कामगिरीमुळे नव्हे तर रंगमंचाची मनोभावे आराधना केल्यामुळे देण्यात आला होता. 1944 च्या सुमारास पृथ्वी थिएटरची स्थापना झाली.

या माध्यमातून पृथ्वीराज कपूर यांनी चित्रपट आणि नाटकांची निर्मिती केली. मात्र पृथ्वीराज कपूर यांच्या पश्चात पृथ्वी थिएटर्स जिवंत ठेवण्याचे श्रेय शशी कपूर यांच्याकडेच जाते. पत्नी जेनीफरसह त्यांनी पृथ्वी थिएटर्स पुनर्जीवित केले.

आता शशी कपूर यांची मुलगी संजना या संस्थेचा कार्यभार सांभाळते. यातही शशीजींचे संस्कारच दिसून येतात.
शशीजींनी चित्रसृष्टीत प्रवेश केला तेव्हा हे जग राज आणि शम्मीच्या प्रभावाखाली होते. त्यांची नवी स्टाईल प्रेक्षकांवर भुरळ पाडत होती. त्या दोघांचे देखणे व्यक्तिमत्त्व सर्वदूर प्रभाव टाकत होते.

अशावेळी शशीजींचे केवळ देखणे रूप पुरेसे पडले नसते. त्यांच्या छायेतून बाजूला होत वेगळी ओळख निर्माण करणे हे त्यांच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते. शशीजींना ते जमले आणि एक अनोख्या ताकदीचा कलाकार उदयाला आला.

त्यांनी अभिनय क्षेत्रात ठसा उमटवलाच पण केवळ व्यावसायिक चित्रपटात काम करून खिसा भरण्याचा उद्योग न करता कलात्मक चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

‘फिल्मवाला’ या बॅनरअंतर्गत आशयघन आणि कलात्मक चित्रपटांची निर्मिती हा त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा होता. ‘अजुबा’, ‘जुनून’, ‘उत्सव’, ‘कलियुग’ हे चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात असतील. साठच्या दशकात शशीजींचा प्रभाव जाणवायला लागला.

शशी कपूर यांची चित्रसृष्टीतील सुरुवात झाली वडिलांच्या आग्रहामुळे. शालेय परीक्षा संपल्यावर सुट्यांच्या काळात पृथ्वीजींनी त्यांना गोदफ्रे कैंडल यांच्या ‘शेक्सपियराना’ या थिएटर ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला.

पित्याच्या सल्ल्यानुसार शशीजी या ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यानिमित्त त्यांना जगभर फिरायला मिळाले. त्यापूर्वी 1948 मध्ये ‘आग’ आणि 1951 मध्ये ‘आवारा’ या चित्रपटांमधून त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या होत्या.

‘आवारा’मध्ये त्यांनी छोट्या राज कपूरची भूमिका साकारली होती. मात्र शेक्सपियरानाच्या निमित्ताने त्यांचा रंगभूमीशी परिचय झाला. त्याचप्रमाणे गोदफ्रे यांच्या मुलीशी म्हणजे जेनीफरशीदेखील परिचय झाला.

कालांतराने ही मैत्रीच त्यांना परस्परांचे जोडीदार बनवून गेली घरातील राज कपूर आणि शम्मी कपूर या तगड्या स्पर्धकांना न घाबरता त्यांनी उत्स्फूर्त अभिनयाने आगळीच छाप उमटवली.

मल्टिस्टारकास्ट हे त्यांच्या चित्रपटाचे विशेष म्हणावे लागेल. खरे तर एका चित्रपटात अनेक प्रख्यात कलाकारांचा सहभाग कडव्या स्पर्धेला जन्म देत असतो.

अशावेळी प्रत्येक कलाकार एका अनोख्या दबावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मांदियाळीत स्वत:चे वेगळे अस्तित्व जपणे हे कसब असते.

मात्र शशीजींनी या आव्हानाचा समर्थपणे सामना केला. ‘वक्त’, ‘दिवार’, ‘कभी कभी’, ‘त्रिशुल’, ‘सिलसिला’, ‘नमक हलाल’, ‘दो और दो पाँच’ आदी चित्रपट मल्टिस्टारर होते.

मात्र कुठल्याही चित्रपटात शशीजींचे अभिनय कौशल्य कमी पडले नाही. या देखण्या कलाकाराचा रूपेरी पडद्यावर प्रभाव जाणवला. विशेषत: अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांची केमिस्ट्री जुळलेली दिसली.

तेव्हाची ही स्पर्धा गळेकापू नव्हती. एकमेकांचे अस्तित्व झाकोळून टाकणारी नव्हती. दोन दिग्गज कलाकारांची जुगलबंदी रंगावी आणि दोघांनीही परस्परांच्या कौशल्याला मोकळेपणाने दाद द्यावी इतक्या सहजतेने आणि नैसर्गिकपणे पडद्यावरील कलाकारांचा अभिनय रंगत असे.

एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नव्हे तर एकमेकांचा अभिनय खुलवण्यासाठी होणारे प्रयास तेव्हा चर्चेचा विषय ठरते. म्हणूनच आजही ‘दिवार’मधील ‘मेरे पास माँ है’ हे साधेसे वाक्यही लक्षात राहते.

शशीजींच्या अभिनयात राज कपूर आणि शम्मी कपूर या दोघांचीही छटा दिसते. वस्तूत: त्यांच्यात नृत्य कौशल्याचा पूर्ण अभाव. त्यांना शम्मी कपूरसारखा धांगडधिंगा जमला नाही आणि राज कपूरसारखा लयबद्ध पदन्यासही जमला नाही.

मात्र उड्या मारत खांदे थोडे मागे झुकवून हात हलवत त्यांनी साकारलेली नृत्याची स्टाईलही भाव खाऊन गेली. आजच्या भाषेत म्हणायचे तर ही त्यांची सिग्नेचर स्टेप होती.

डोक्यावर केसांचा तुरा, हॉलिवूड स्टारला शोभावे असे देखणे रूप, उत्तम संवादफेक आणि कपूर घराण्यातून वारसाहक्काने मिळालेला सहजसुंदर अभिनय या कौशल्याच्या बळावर त्यांनी एक काळ गाजवला.

थिएटरचे संस्कार असल्यामुळे अभिनय एकसुरी नव्हता. त्यातही कलाभान जपले गेले. त्या काळात शशीजींनी प्रत्येक प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर रूपेरी पडदा शेअर केला होता.

नितू सिंग, नंदा, झिनत अमान, हेमामालिनी आदींबरोबर त्यांचे चित्रपट गाजले. ‘शर्मिली’सारख्या नायिकाप्रधान चित्रपटातही ते शोभले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांची केमिस्ट्री जुळली. ‘जब जब फुल खिले’ या हिट चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अगदी जोमात होता.

‘हाऊस होल्डर’ आणि ‘शेक्सपियरवाला’ सारख्या इंग्रजी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका निभावणारा हा एकमेव अभिनेता होता. हॉलिवूडमध्येही त्यांचे नाव गाजले. ‘उत्सव’पासून त्यांची इमेज बदललेली दिसली.

‘बसेरा’सारखा चित्रपट त्यांच्या अभिनयाची ताकद दाखवून जातो. या कलाकाराने स्वत:चे कर्तृत्व दाखवण्यापेक्षा भूमिकेला चहुअंगाने फुलवण्यासाठी अभिनय केला.

म्हणूनच तो जिवंत वाटला. दादासाहेब फाळकेंच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ही त्यांच्या आयुष्यातील उतरणीच्या वळणावर आलेली रम्य सायंकाळ होती. तो त्यांचा यथोचित गौरव होता.

त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशीजी माध्यमांमध्ये फारसे दिसले नाहीत. तरीदेखील पृथ्वी थिएटर्सच्या कार्यक्रमांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची.

ते नव्या कलाकारांना प्रोत्साहन देताना दिसायचे. असा हा प्रतिभावान कलाकार आता कधीही परत न येण्यासाठी गेला आहे.

 

LEAVE A REPLY

*