Blog : होय, मी प्रतिक्षार्थीऽऽऽ हे माझं सरकार !

0

पसीने की स्याहीसे जो
लिखते है अपने इरादों को,
उनके मुकद्दर के पन्ने
कभी कोरे नही हुआ करते…

या शायरीतला अन्वयार्थ माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवनात का उतरत नाही, दिवसरात्र हाडाची काडं करून पिकविलेल्या शेतमालास माय-बाप सरकार भाव का देत नाही… ना खाऊंगा, ना खाने दुँगा! म्हणणार्‍यांनी खरचं आमच्या शेतकर्‍यांच्या ताटात, ‘ना खाने दुँगा’ लिहून ठेवलं.

राज्यातल्या 36 लाख शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणार! 90 टक्के शेतकर्‍यांना कर्ज माफी…नियमीत कर्ज भरणार्‍यांना 25 हजाराचे अनुदान…अशी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 जून 2017 रोजी केली आणि राज्यातल्या सुरुकुतलेला बळीराजा सुखावला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी की ज्यांनी 1 एप्रिल 2009 नंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि.30 जून 2016 पर्यंत थकीत ठेवले.

अशा शेतकर्‍यांचे मुद्दल व व्याजासह दीड लाख रूपयांच्या मर्यादेत भरण्यात येईल, मात्र काही निकषांच्या अधिन राहूनच सदरहू कर्ज माफ केले जाईल!… आतापर्यंत दोनदा आघाडी सरकारने कर्जमाफी केली.

तशीच कर्जमाफी फडणवीस सरकारची असेल अशा भ्रमात शेतकरी आनंदून गेले. आणि घोषणेतील ‘निकष’ या शब्दाकडे सुध्दा गांजलेल्या कास्तकारांच ध्यान गेलं नाही.

पण जेव्हा प्रत्यक्षात कर्जमाफी मिळविण्यासाठी ऑन लाईन फॉर्म भरण्यापासून जी काही निकषांची सरबत्ती सरकारने सुरू केली ते एकुणच शेतकर्‍यांच्या डोक्याची चाती गरगरायला लागली.

‘भुल’ दिल्याशिवाय ऑपरेशन आणि ‘दिशाभूल’ केल्याशिवाय राजकारण करता येत नाही… या विडंबनाचा प्रत्यय यायला शेतकर्‍यांना उशिर लागला नाही.

लेखक – पुरषोत्तम गड्डम

एवढचं नाही तर दसर्‍याला देतो… दिवाळीला करतो… म्हणत अखेर जंगी सोहळ्यात कर्जमाफीची प्रमाणपत्रेही दोन चार शेतकर्‍यांना वाटली. मात्र, आज 15 नोव्हेंबर उजाडला तरी शेतकरी कर्जमुक्त झाला नाही व 7/12 सुध्दा कोरा झाला नाही.

निकषांचा आयचा घो !
कधी नव्हे ते गावच्या सरपंचाने जेवायचे निमंत्रण दिले…दवंडी झाली, मंदिराच्या लाऊडस्पीकर वरून सुचना दिली गेली…सगळा गाव हरखला, ऐन दुष्काळात एवढ्या हाल अपेष्टांमध्ये एक वेळचे जेवण म्हणजे पर्वणीच…ठरल्या दिवशी, ठरल्यावेळी देवळाच्या पटांगणात गाव गोळा झाला…कडेकोट बंदोबस्त लाऊन पटांगण बंदिस्त केलेलं…दारावर शिपाई अन् कारभार्‍याच्या हातात कागद, कारभार्‍यानं माईक हाती घेतला आणि म्हणाला ‘मालकांनी’ जेवायला सगळ्या गावाला बोलावलय, चूलबंद आवतण आहे, पण मालकाच्या काही अटी आहेत…दाढी काळी अन् मिशी पांढरी असलेल्या…डोक्यावरचे केस किमान 25 टक्के काळे असलेल्या …किमान दोन दात आणि चार दाढ पडलेल्या…अन् काल सकाळी आंघोळ केलेल्या पण परवा आंघोळ न केलेल्या सर्वांना जेवण मिळणार आहे…ज्या बायांना नऊ वारी नेसता येते, पण त्या सहा वारी नेसतात…ज्यांचे नवरे रहायला गावात पण कामावर तालुक्यात आणि ज्यांच्या लेकरांनी कधीच शाळेची पायरी ओलांडली नाही…अशा सगळ्यांना पोटभर जेवण मिळणार! गर्दीने फुलून गेलेले मैदान अवघ्या पाच
मिनिटात रिकामे झाले…तुरळक माणस,

मालकाच्या बारदान्यात असलेली माणसं, वाढपी फक्त शिल्लक राहिले… हात-पाय धुवून मालकाच्या हिशोबातले मोजकेच जेवायला बसले अन् बाकीचे गावकरी घरी जाऊन उपाशी झोपले…!’ असे एक ना अनेक किस्से ‘सोशल मिडीया’वरून व्हायरल होवून राज्यातील कर्जमाफीवरून दिसू लागले.

ऑनलाईन अर्ज दाखल करून निकषांच्या काटेरी आश्वासनांच्या निपटारा करूनही अद्याप शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळालेली नाही.

व्हय… मी लाभार्थी
फडणवीस सरकारने जलयुक्त अभियानासंदर्भात शेतकर्‍यांची जी जाहिरात केली. त्यात वेगळेच सत्य समोर आले. आघाडी सरकारने पूर्वी त्यांच्या कार्यकाळात केलेली ती कामे होती.

पुणे जिल्ह्यातील शेततळे पाच वर्षांपूर्वीची होती. पूर्वीच्या सरकारची कामे आपल्या नावावर खपविण्याची वेळ या सरकारवर का यावी? करोडो रूपये खर्च करू ‘व्हय मी लाभार्थी’ या शिर्षकाखाली जी जाहिरातींची सरबत्ती सुरू आहे….त्यातून महाराष्ट्राची जनता केवळ आणि केवळ विनोद घेत आहे.

आज सोशल मिडीयावर विविध विनोदांच्या माध्यमातून सरकारच्या या जाहिरातबाजी वर टिकास्त्र सुरू आहे. मी लाभार्थी…. या जाहीरातीची खिल्ली उडविणारे काही ‘जुमले’ खास आपल्यासाठी….सत्तेत नसतांना कापसाला सहा हजार भाव मागतो, पण सत्तेत गेला की तीन हजारात लिलाव करतो, कारण करणी अन् कथनी मध्ये फरक असणार्‍या

सरकारचा…मी लाभार्थी !
कामापेक्षा जाहीरातीवरच भर देतो, कारण अपारदर्शक असलेली पारदर्शी, सरकारचा… मी लाभार्थी!
परदेशातून आणलेला काळापैसा दिवस-रात्र मोजतो, कारण नोटबंदीने विवस्त्र झालेल्या विकासाचा… मी लाभार्थी.
माफ झालेले 349 रूपये अभिमानाने सांगतो, कारण जाहीरातीमधील कर्जमाफीचा… मी लाभार्थी. 16 महिन्यात 19 वेळा घरगुती सिलेंडर किंमतीत वाढ करून, आमचे आम्हालाच अनुदान म्हणून परत…व्हय. मी लाभार्थी! आम्हालाच अनुदान म्हणून परत… व्हय, मी लाभार्थी!
व्हय… मी लाभार्थी… हे माझं सरकार – विजय माल्या!

कृषीमित्र पवारांची ‘डेडलाईन’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो तथा कुठल्याही स्थितीत शेतकर्‍यांचा कैवार घेणारे शरद पवार यांनी आता कर्जमाफीसाठी 25 नोव्हेंबर 17 ची डेडलाईन दिली आहे.

सरकारनेच 25 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीचा घोळ संपवितो. अशी नवी घोषणा केल्याने, राष्ट्रवादीने आता ही डेडलाईन सिरीअसली घेतली आहे. शेतकरी प्रश्नावर सरकार जाहिरातीतून फारच सकारात्मक वाटते.

मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असल्याचा साक्षात्कार राज्य दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनाही घडला.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही नुकत्याच नागपूर भेटीत शेतकर्‍यांची काळजी घ्या’ हा सल्ला सरकारला दिला. मात्र, सरकार आपल्याच ‘मस्तीत’ असल्याने शेतकर्‍यांना आता विश्वास राहिलेला नाही.

व्हय मी लाभार्थी…. ऐवजी व्हयं मी कर्जमाफीसाठीचा प्रतिक्षार्थी….! अशीच नवी ओळख राज्यातील शेतकर्‍यांच्या नशीबी आली आहे.

LEAVE A REPLY

*