Blog : उत्तर कोरियाच्या कोंडीची व्यूहरचना

0

आर्थिक निर्बंध लादूनही उत्तर कोरिया जगाला जुमानायला तयार नाही. उत्तर कोरियाने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र चाचणीनुसार थेट अमेरिका या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहे.

उत्तर कोरिया अण्वस्त्र युद्धाच्या वाटेवर असून त्या देशाला रोखले नाही तर जग अण्वस्त्र युद्धाच्या खाईत लोटले जाईल. त्यामुळे आता चीनसह अन्य देशांनी उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादावेत, अशी व्यूहरचना सुरू करण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने केलेल्या शक्तिशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अमेरिका चांगलीच भडकली असून उत्तर कोरियावर यापुढे अतिरिक्त कडक निर्बंध लादण्यात येतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

या मुद्यावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि उत्तर कोरियाला समजावण्याची सूचना केली. ट्रम्प केवळ तेवढ्यावरच थांबले नाहीत तर चीनने कोणत्या उपाययोजना कराव्यात, हेही सुचवले.

उत्तर कोरियाने बुधवारी व्हॉसाँग-15 नामक सर्वाधिक शक्तिशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सादर केले. हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा हे पाऊल उचलले आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि संपूर्ण पूर्व अमेरिकेचा किनारी भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याची भीती काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाशी चर्चा केली आहे. उत्तर कोरियाविरोधात करावयाच्या कारवाईबाबत त्यांनी विचारविनिमय केला आहे.

दक्षिण कोरियाचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी उत्तर कोरियाला अशा प्रकारे संहारक कृत्ये न करण्याबाबत इशारा दिला असला तरी उत्तर कोरिया भीक घालण्याची शक्यता नाही.

ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशीही संवाद साधला. उत्तर कोरिया जपानवर कायम क्षेपणास्त्र डागत असल्याने त्याच्या उत्तर कोरियाबाबतच्या भावना अगोदरच तीव्र आहेत.

त्यामुळे ट्रम्प करत असलेल्या कोणत्याही कारवाईला त्यांची संमती असणार हे गृहीतच आहे. उत्तर कोरियावर अधिकाधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही आबे यांनी ट्रम्पना दिली आहे.

उत्तर कोरियाने यापूर्वी केलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपेक्षा आज चाचणी केलेले नवे क्षेपणास्त्र अधिक शक्तिशाली आहे. यावर्षी उत्तर कोरियाने आतापर्यंत 20 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.

आज केलेल्या तिसर्‍या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची ही यशस्वी चाचणी आहे. यापूर्वी त्यांनी जुलै महिन्यात दोन आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती.

उत्तर कोरियाने बुधवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले.

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो.

उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा ट्रम्प आणि संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. याआधी 15 सप्टेंबरला उत्तर कोरियाने शेवटची क्षेपणास्त्र चाचणी केली होती. यानंतर या भागात दोन महिने शांतता निर्माण झाली होती.

मात्र उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने ही वादळापूर्वीची शांतता ठरली. उत्तर कोरियाच्या या आगळीकीमुळे जगात पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तर कोरियाच्या दक्षिण प्योंगयांग प्रांतातून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांच्या म्हण्यानुसार, हे उत्तर कोरियाचे सर्वाधिक अंतराचा टप्पा गाठू शकणारे क्षेपणास्त्र (आंतरखंडीय क्षेपणास्त्र) होते.

जगातील कोणत्याही भागाला लक्ष्य करू शकणार्‍या क्षेपणास्त्रांची निर्मिती उत्तर कोरियाकडून सुरू आहे. आबे यांनी उत्तर कोरियाचे हे कृत्य हिंसक असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरियाची ही कृती सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आबे यांनी या प्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

अमेरिकेकडून उत्तर कोरियावर निर्बंध लादल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये प्योंगयांगमधून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. उत्तर कोरियाने 75 दिवसांत या मिसाईलची चाचणी घेण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी किम जोंग उनच्या लष्कराने जपानच्या दिशेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले होते. अमेरिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगातील जवळपास प्रत्येक देश उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आला आहे.

तसे असेल तर आता उत्तर कोरियाच्या चाचणीची केवळ अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने चिंता करून चालणार नाही तर चीन, रशिया, भारतासह अन्य देशांनीही त्याची चिंता केली पाहिजे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी उत्तर कोरियाच्या आयसीबीएम चाचणीला अधिकृत दुजोरा दिला. हे मिसाईल जगातील सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय मिसाईल्सपैकी एक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या क्षेपणास्त्राने किम जोंग उन आता कुठल्याही देशावर हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेने जगाला दिला आहे.
उत्तर कोरियाचे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाईल प्रकल्प जगासाठी घातक आहेत.

उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्र, चीन, युरोप आणि अमेरिकेसह अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. तरीही उत्तर कोरिया वारंवार निर्बंध धुडकावून या चाचण्या घेत आहे.

अमेरिकेत कुठेही मारा करू शकणार्‍या नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन आपला देश पूर्ण अणुशक्तीधारक झाला आहे, असा इशारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने दिला आहे.

दुसरीकडे या चाचणीनंतर ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे आव्हान मोडून काढण्याची अमेरिकेची तयारी आहे, असे म्हटले आहे. या चाचणीनंतर अमेरिका उत्तर कोरियावर आणखी निर्बंध लादणार आहे.

उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीनंतर संयुक्त राष्ट्रांनी सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, दोन्ही कोरियाच्या भागातील स्थिती बिघडत आहे, असा इशारा दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी दिला आहे.

पूर्वीच्या निर्बंधांना न जुमानता आता उत्तर कोरियाची आणखी कोंडी करण्याचे पाऊल उचलले जाईल, असा अंदाज आहे. चीनलाही आता केवळ तोंडदेखला इशारा देऊन चालणार नाही. किमचा स्वभाव लक्षात घेतला तर तो कधी कोणते पाऊल उचलेल सांगता येत नाही.

त्याला युद्धाच्या धमक्या देऊन किंवा अमेरिकेने त्याच्यावर कारवाई करूनही चालणार नाही. त्यामुळे त्याचे पित्त आणखी खवळेल. त्यासाठी चीनचा वापर करून घेण्याची जबाबदारी आता संयुक्त राष्ट्रांवर आली आहे.

किमने काही आगळीक केली तर त्याची किंमत चीनलाही मोजावी लागेल. उत्तर कोरियाच्या शेजारी चीन असून युद्धाची धग चीनला बसेल. त्यामुळे होता होई तो युद्ध टाळायचे आणि किमला आणखी चाचण्या घेण्यापासून रोखायचे यासाठी वातावरणनिर्मिती करावी लागेल.

त्यासाठी ट्रम्प यांनी जगातील सर्वच देशांना उत्तर कोरियाशी असलेले व्यापारी संबंध तोडण्यास सुचवले आहे. मुख्यतः चीनमधून उत्तर कोरियाला कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. तो थांबवण्याचे साकडे ट्रम्प यांनी चीनला घातले आहे.

युद्ध झाले तर जगाच्या नकाशावरून उत्तर कोरिया नष्ट होईल, असा इशारा देण्यात आला आहे. चीनने मान्य केल्याप्रमाणे उत्तर कोरियाशी आर्थिक संबंध तोडले नाहीत तर चीनच्या उत्पादनांवर बहिष्काराचे अस्त्र उचलण्याचा इशारा अमेरिकेत दिला जात आहे.

चीन अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर चिनी वस्तूंची निर्यात करीत असतो. त्यामुळे चीनला हे बहिष्कारास्त्र परवडणारे नाही. चीनच्या कंपन्याही त्यासाठी उत्तर कोरियावर दडपण आणण्याची स्थिती निर्माण करण्याची विनंती चिनी सरकारकडे करत आहेत.

आता चीन दुसर्‍याच्या काठीने साप मारण्याचा आनंद उपभोगत असला तरी हा आनंद त्याला दीर्घकाळ उपभोगता येणार नाही. विषारी साप केवळ दुसर्‍याला डंख करून थांबत नाही तर ज्याने तो पाळला आहे त्याच्यावरही कधी तरी डंख मारतो, याचे भान आता चीनने ठेवायला हवे.

रशिया आणि पाकिस्तानचीही उत्तर कोरियाला छुपी मदत झाली आहे. अण्वस्त्रनिर्मितीचे तंत्रज्ञान तर पाकिस्तानकडून उत्तर कोरियात गेले आहे.

अंधपणे भारताविरोधात पाकिस्तानला मदत करणार्‍या अमेरिकेवर आता कटू फळे भोगण्याची वेळ आली आहे. उत्तर कोरियाशी भारताचा व्यापार मोठा असला तरी जगाने घालून दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन भारत उत्तर कोरियाला मदत करणार नाही, याची जगाला खात्री आहे. चीन, पाकिस्तान आणि रशियाबाबत मात्र तशी खात्री देता येत नाही.

– प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

LEAVE A REPLY

*