Blog : नीतिमत्तेचा महान आदर्श

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्ती आणि दृष्टी तत्त्वज्ञानाची होती. ते बुद्धिनिष्ठ आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारे होते. बाबासाहेब नव्या पिढीला सतत सांगत की, तुम्ही शिक्षण घेऊन पुढे चाललात म्हणजे तुमचे कुटुंब विकासाच्या वाटेवर चालू लागते.

तुमच्या निमित्ताने एक ‘दीप’ घरात पेटवला म्हणून तुम्ही समाजाचे भान ठेवून तेथे अनेक दीप प्रज्वलित केले पाहिजेत. सामाजिक जाणीव असल्याशिवाय सामाजिक परिवर्तन होऊ शकणार नाही.

विद्येसाठी खडतर तपश्चर्या करून अनेक पदव्या मिळवून बाबासाहेब मोठे झाले. मात्र त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समतेच्या महान लढ्यासाठी वेचले.

सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या मोहात ते कधीच पडले नाहीत. नीतिमत्तेचा महान आदर्श त्यांनी निर्माण केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विद्योप्रमी, विद्वान आणि व्यासंगी पंडित होते.

मानवी जीवनाशी निगडीत अशा अनेक शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, घटनाशास्त्र, व्यवस्थापन आणि प्रशासनशास्त्र इत्यादी शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि म्हणून मानवी जीवनाचा समग्र वेध घेण्याची क्षमता त्यांना लाभली होती.

लेखक – मोहन एस. मते, सामाजिक कार्यकर्ते

हिंदू, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिचन धर्मांच्या मूळ ग्रंथांचा त्यांना परिचय होता. डॉ. आंबेडकरांना उच्च जीवनमूल्यांचे मनस्वी आकषर्र्ण वाटत होते.

त्यांनी पैसा, मान, कीर्ती, सत्ता अशा भौतिक गोष्टींना गौण लेखून अस्पृश्य समाजाची मुक्ती करण्याचे व्रत जन्मभर पाळले आणि समाजात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि शील आणण्यासाठी आपली वाणी, लेखणी आणि मन वापरले.

ते चिकित्सक वृत्तीचे असल्याने ते कोणालाही विभूनिमत्त्व द्यावयास तयार नव्हते. एकूण डॉ. आंबेडकरांची वृत्ती आणि दृष्टी तत्त्वज्ञानाची होती. ते बुद्धिनिष्ठ आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारे होते.

दलितमुक्ती लढ्याचे नेतृत्व करणारे डॉ. आंबेडकर हे विसाव्या शतकातील महापुरुष आहेत. त्यांचे कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव विसाव्या शतकावर तर आहेच; पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान असल्याशिवाय शोषणाविरुद्ध झुंजणार्‍या चळवळी यशस्वी होणार नाहीत.

डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा ही राष्ट्रीय संपत्ती आहे. भारतीय इतिहासाला वळण लावणार्‍या चळवळी डॉ. आंबेडकरांनी उभ्या केल्या. अन्यायाविरुद्ध लढे उभारले.

दलित-शोषितांच्या प्रश्नांची मांडणी केली. राजकीय रणधुमाळीत राहूनही त्यांनी ज्ञानोपासना केली. जवळ जवळ 32 हजार ग्रंथांचा संग्रह जोपासणारा राजकीय नेता भारतीय राजकारणात बहुधा एकमेवच असावा. डॉ. आंबेडकरांच्या ज्ञानलालसेला खरेच तोड नाही.

भगवान गौतम बुद्ध म्हणाले, ‘केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकूल मानू नका. ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला, तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती स्वीकारा. नाहीतर तुम्ही ती खुशाल टाकून द्या’. डॉ. आंबेडकरांचे हेच म्हणणे होते.

ते म्हणत, प्रत्येक मनुष्याने विचार स्वातंत्र्याचा उपयोग सत्याचा शोध घेण्यासाठी केला पाहिजे. सत्याचा शोध घेण्याचा मार्ग अत्यंत बिकट आहे.

सर्व माणसांना विवेकशक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करता येतो. डॉ.आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अखंड, उग्र ज्ञानसाधना होती.

ते खरेखुरे क्रियावान पंडित होते. भगवान बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव व ज्योतिरावांची बंडखोरी बरोबर घेऊन बाबासाहेबांनी भारतीय इतिहासाचा एक विराट कालखंड आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला आहे.

डॉ. आंबेडकरांना व्यक्तीपूजेपेक्षा वा विभूतिपूजेपेक्षा विचारांची पूजा महत्त्वाची वाटत असे. घटना परिषदेत समारोपाचे भाषण करताना ते म्हणाले, भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा अगर भक्तीचा प्रभाव एवढा आहे की इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती आणि अशी व्यक्तिपूजा आढळत नाही.

धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा आणि पर्यायाने हुकूमशाहीचा खात्रीलायक मार्ग होता. ‘न्या. रानडे, गांधी आणि जीना’ या विषयांवरील व्याख्यानातही ते म्हणाले होते की, विभूतिपूजा ही भक्तांना नीतिभ्रष्ट करते.

म्हणून ती देशाला मारक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणताही विचार चिकित्सापूर्वक स्वीकारला पाहिजे. विभूतिपूजा विवेकवादाला नेहमीच घातक ठरलेली आहे, अशी इतिहासाची साक्ष आहे.

जॉन स्टुअर्ट मिल म्हणत असे की, एखादा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका अगर त्यावर इतका विश्वास टाकू नका की त्यामुळे तो लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलून टाकील.

कारण विभूतिपूजा एकाधिकारशाहीला जन्म देते तर विचारांची पूजा लोकशाही बळकट करीत असते. प्रतिक्रांतिवादी
नेहमीच समाजाला व्यक्तिपूजेत गुंतवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात.

म्हणूनच समाजमनात विचार कसा रुजेल याची चिंता क्रांतिवादी वाहत असतात. क्रांतिवाद्यांना समाजप्रबोधनसाठी, जनजागरणासाठी वाणी आणि लेखणी राबवण्याशिवाय तरणोपाय नसतो.

बाबासाहेबांनी आयुष्यभर जे वाचन-चिंतन-मनन केले त्याचा परिपाक म्हणजे त्यांची अमोल ग्रंथसंपदा! आपल्या ग्रंथांवर अपार प्रेम करणार्‍या या महापुरुषाने विचारांशी मुकाबला विचारांनीच केला.

त्यांनी आपले विचारस्वातंत्र्य वापरले ते धर्माचिकित्सेसाठी, समाज चिकित्सेसाठी! त्यांनी तत्त्वासाठी कधीही तडजोड केली नाही.

अस्पृश्यांच्या आर्थिक विकासासाठी डॉ. आंबेडकर यांनी जी अनेक पावले उचलली त्यापैकी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘राखीव जागां’ची तरतूद होय. स्वतंत्र भारताच्या घटनेनुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले असे म्हणता येईल.

आर्थिक गुलामगिरी नष्ट व्हावी आणि त्यांना विकासासाठी शिक्षणासाठी दारे मोकळी व्हावीत म्हणून घटनेच्या 46 व्या
कलमात तशी तरतूद केली आहे.

घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांत समाजातील दुर्बल घटकांचे कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा ही भूमिका स्वीकारलेली आहे.

आज देशात अतिशय वेगाने सर्व क्षेत्रात वाढणार्‍या भ्रष्टाचाराबद्दल विचारवंतांना चिंता वाटत आहे. ज्या समाजात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे त्या समाजाला काही भवितव्य आहे का? भ्रष्टाचार, अनाचार, वामाचार ही भांडवलशाही समाजाची निर्मिती असते.

एका माणसाचा दुसर्‍या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण होते तेव्हा आपण म्हणतो की या समाजात माणसाला मूल्य आहे.

म्हणून डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करताना ‘एक माणूस, एक मत’ असा लोकशाहीचा मर्यादित अर्थ करून टाकला. त्यामुळे मतपेटीला महत्त्व आहे.

मतपेटीचे महत्त्व इतके वाढत आहे की कोणत्याही मार्गाने मतपेटी जिंकायची आणि सत्तेच्या धुंदीत लोळत राहायचे. यामुळे भ्रष्टाचार झपाट्याने फोफावतो. कारण मतपेटी व सत्ता यांचा एक विपरीत संबंध निर्माण होतो.

मग अशा भ्रष्ट समाजात मालक हेे मालकच राहतात. दास दासच राहतात. अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात व वंचित हे वंचितच राहतात.

न्यायनीतीच्या राज्याला अर्थच उरत नाही. म्हणून बाबासाहेब नव्या पिढीला सतत सांगत, तुम्ही शिक्षण घेऊन पुढे चाललात म्हणजे तुमचे कुटुंब विकासाच्या वाटेवर चालू लागते.

तुमच्या निमित्ताने एक ‘दीप’ घरात पेटवला म्हणून तुम्ही समाजाचे भान ठेवून तेथे अनेक दीप प्रज्वलित केले पाहिजेत. सामाजिक जाणीव असल्याशिवाय सामाजिक परिवर्तन होऊ शकणार नाही.

पुण्यातील अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात ते म्हणाले होते, आपण एकजुटीने वागलो तर काहीतरी करून दाखवाल. आपल्या समाजावर होत असलेला जोर, जुलूम व अन्याय निवारणाचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने शिरावर घ्यावयास हवे.

विद्येसाठी खडतर तपश्चर्या करून अनेक विषयांत बहुमानाच्या पदव्या मिळवून डॉ. आंबेडकर मोठे झाले. मात्र त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समतेच्या महान लढ्यासाठी वेचले.

सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा यांच्या मोहात ते कधीच पडले नाहीत. नीतिमत्तेचा महान आदर्श त्यांनी निर्माण केला.

 

LEAVE A REPLY

*