नेपाळचे पंतप्रधान देऊबा यांची भारत भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली आहे. केपी ओली आणि प्रचंडा यांच्या काळात नेपाळवर चीनचा प्रभाव वाढत चालला होता. त्याचवेळी भारतासोबतचे संबंध बिघडत चालले होते.
ही विश्वास तूट कमी करण्याच्या उद्देशानेच देऊबा भारत भेटीवर आले होते. या भेटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांत जो मवाळपणा आला आहे तो टिकून राहायला हवा.
नेपाळ आणि चीनच्या वाढत्या मैत्रीदरम्यान झालेला पंतप्रधान शेरबहादूर देऊबांचा भारत दौरा निश्चितच महत्त्वाचा मानला जात आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी देऊबांची भेट मोलाची मदत करू शकते. नेपाळमध्ये नवीन राज्यघटना तयार झाल्यानंतर उभय देशांतील संबंधात जो ताण आला होता त्याचा गैरफायदा अन्य देश उचलत होते. त्या पार्श्वभूमीवर नेपाळ पंतप्रधानांची भारत भेट ही उपयुक्त ठरू शकते.

वर्षानुवर्षे नेपाळचे भारताशी आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक, वैचारिक, धार्मिक संबंध राहिलेले आहेत. नेपाळच्या बाजूने भारताला फारसा त्रास झालेला नाही.

लेखक – विनायक सरदेसाई

अन्य शेजारी देश भारतात घातपाती कारवाया घडवून आणत असताना नेपाळने सच्चा सोबतीची भूमिका वठवली आहे. परंतु चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे हे दोन पारंपरिक जीवलग मित्र दुरावले जाऊ लागले होते. हा दोस्ताना कायम ठेवण्यासाठी देऊबांचा दौरा उपयुक्त ठरणारा आहे.

नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत असताना देऊबांचा दौरा हा दोन्ही देशांतील संबंधांना नवीन दिशा देण्याचे काम करू शकतो.

या दौर्‍यासाठी दोन्ही बाजूंनी जो उत्साह दाखवला गेला आहे त्यावरून जुने वाद मागे टाकले जातील, अशी चिन्हे आहेत. नेपाळमध्ये नवीन घटना अस्तित्वात आल्यानंतर तराई क्षेत्रात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता.

त्याचा फायदा चीनने उचलला. चीनने नेपाळशी केवळ आर्थिक संबंध वाढवले नाहीत तर भौगोलिक परिस्थितीमध्येदेखील हस्तक्षेप करण्याची नीती चीनने आखली. मात्र चीनचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच नेपाळमध्ये सत्तांतर झाले.

नवे पंतप्रधान देऊबा यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच पहिला परदेश दौरा म्हणून भारताची निवड केली आणि चार दिवसांच्या दौर्‍यासाठी देऊबा कॅबिनेट मंत्र्यांसह दिल्लीत दाखल झाले.

हा दौरा अशा काळात होत आहे जेव्हा नेपाळवर हेरगिरीचा आरोप केला जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात होणार्‍या या दौर्‍यातून दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित होतील, अशी अपेक्षा
बाळगली जात आहे.

शेजारील अनेक राष्ट्रे उपद्रवी आणि कुरापतखोर असताना नेपाळसोबत सदासर्वकाळ चांगले संबंध राहिले आहेत. परंतु चीनच्या धोरणाने संबंधात दरी निर्माण केली. परंतु भारताच्या कूटनीतीने नेपाळला पूर्वपदावर आणण्यात यश आले आहे.

देऊबा भारतात आले. म्हणजे निश्चितच भारताला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे, असे समजायला हरकत नाही. कालांतराने दोन्ही देशांत पूर्वीप्रमाणेच मैत्री दिसू लागेल, असे म्हणता येऊ शकेल.

देऊबांच्या दौर्‍याने भारत-नेपाळ संबंध अधिकच घट्ट होत असल्याचे बोलले जात असले तरी दिल्लीत येण्यामागे वेगळेच कारण सांगितले जात आहे.

चीनबरोबर नेपाळचा वाढता घरोबा लक्षात घेता काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊबांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. त्यात देऊबा यांनी दिल्लीला झुकते माप दिले.

दौर्‍याच्या दुसर्‍या बाजूचा विचार केल्यास जेव्हा नेपाळचा कोणताही मोठा नेता भारतात येतो तेव्हा अनेक
कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीचाही समावेश असतो.

याशिवाय भारतातील नेपाळी नागरिकांच्या भेेटीगाठीदेखील आयोजित केल्या जातात. मात्र यावेळी असे काही घडले नाही. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर देऊबा यांचे स्वागत केले. याचाच अर्थ असा की, भारत देऊबांच्या दौर्‍याला फारसे महत्त्व देऊ इच्छित नाही.

तसे पाहिले तर परदेशातून एखादा पाहुणा मग तो अध्यक्ष असो किंवा पंतप्रधान असो, त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जातात. त्यांचे जोरदार स्वागत केले जाते.

मात्र नेपाळचे पंतप्रधान आल्यानंतर असे काही घडले नाही. दुसरीकडे शेरबहादूर देऊबांच्या भारत दौर्‍याला नेपाळमध्ये विरोध झाला. मधेशी समाजाच्या लोकांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला. देऊबा मोदींना घाबरतात, अशी घोषणा दिली गेली.

भारताकडून नेपाळवर जे आरोप केले जात आहेत त्यावर नेपाळचे एकच म्हणणे की, चीन संबंधावरून भारताने गैरसमज करून घेऊ नये. शेजारी राष्ट्र असल्याच्या नात्याने भारताची आम्ही काळजी घेत आहोत, असेही नेपाळने म्हटले आहे.

देऊबा यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. नेपाळवर चीनकडून हेरगिरीचा आरोप हा प्रसार माध्यमांमुळे आला आहे, असे देऊबा म्हणतात.

नेपाळवरील आरोपांचे सावट दूर करण्यासाठी नेपाळचे उपपंतप्रधान कृष्णबहादूर महारा यांनी डोकलाम वादात नेपाळची भूमिका अतिशय संतुलित ठेवली होती.

या वादात नेपाळची भूमिका तटस्थ असेल, असे स्पष्ट करत भारत आणि चीन यांनी शांततापूर्ण चर्चा करून वाद मिटवावा, असेही आवाहन केले होते. नेपाळचे हे आवाहन भारत आणि नेपाळच्या संबंधाला अधिक मजबुती देण्यासाठी महत्त्वाचे मानले गेले.

नेपाळला भारताबरोबर संबंध अधिक मजबूत करायचे असून व्यापारी संबंधांवरही चर्चा करायची इच्छा देऊबा बाळगून आहेत. देऊबा यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान नेपाळी काँग्रेस सरकार हे मागील सरकार केपी ओलींच्या तुलनेत भारताशी अधिक संबंध मजबूत करण्यावर जोर देत आहे.

गेल्या काही वर्षांपासून चीनने नेपाळमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. अशा स्थितीत भारताशी आर्थिक संबंध वाढवण्याचेही प्रयत्न देऊबा करत आहेत हे विशेष.

अर्थात नेपाळलाच आपली भूमिका निश्चित करावी लागणार आहे. कारण भारताने केवळ शेजारील देशांशी नाही तर जगातील सर्वच देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी आग्रह केलेला आहे.

ही भारताची रणनीती नाही तर संस्कृती आणि सभ्यतेचा भाग आहे. नेपाळचे पंतप्रधान आल्यानंतर संबंधात जो मवाळपणा आला आहे तो टिकून राहायला हवा. ही बाब केवळ भारतासाठी नाही तर नेपाळसाठीदेखील महत्त्वाची आहे.

अर्थात हे पाहून चीन गप्प बसणार नाही, हे उघड आहे. तो नेपाळला भडकवण्यासाठी उद्योग करू शकेल. अशा काळातच नेपाळचे पारडे कोणत्या बाजूने झुकते हे पाहणे
महत्त्वाचे आहे.

 

LEAVE A REPLY

*