Blog : सामर्थ्य वाढवणारे यश

0

‘ब्राह्मोस’ या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे ‘सुखोई-30-एमकेआय’ या लढाऊ विमानाद्वारे प्रक्षेपण करण्यात भारताला दुसर्‍यांदा यश आले. हे यश अत्यंत महत्त्वाचे आहे.

जमीन, पाणी, पाण्याखालून आणि हवेतूनही डागता येणारे हे क्षेपणास्त्र भारतासाठी भलतेच लाभदायक ठरले आहे. दक्षिण चीन समुद्रावरील वर्चस्वावरून चीनला विरोध असणार्‍या देशांकडून या क्षेपणास्त्राला असलेली मागणी भारताच्या दुहेरी फायद्याची आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असणार्‍या देशांच्या यादीत भारत मानाने जाऊन बसला आहे.

‘सुखोई-30 एमकेआय’ या सुपरसोनिक लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात भारताला दुसर्‍यांदा यश आले आहे. आवाजाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करू शकणारे विमान म्हणजेच सुपरसोनिक विमान होय.

अशा विमानातून ब्राह्मोससारख्या अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम असणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र सध्या जमिनीवरून, पाण्यातून आणि हवेतूनही डागता येते. जमिनीखाली असलेली आण्विक बंकर, कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेन्टर्स आणि समुद्रावरून घिरट्या घालणारी शत्रूची लढाऊ विमाने अचूक टिपण्याची क्षमता ब्राह्मोस क्षेपणास्त्रात आहे.

सुखोई-30 एमकेआय विमानाला जोडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी 25 जून 2016 रोजी घेण्यात आली होती.

हिंदुस्थान एरॉनॉटिकलच्या विमानतळावरून ही चाचणी घेण्यात आली होती. 2500 किलोग्रॅम वजनाच्या क्षेपणास्त्रासह आकाशात झेपावू शकणारे विमान हवाई दलाच्या ताफ्यात असलेला पहिला देश असा भारताचा लौकिक त्याच वेळी झाला होता.

आता ही चाचणी दुसर्‍यांदा यशस्वी झाल्यामुळे सुखोई-30 एमकेआय हे अवजड क्षेपणास्त्रवाहू लढाऊ विमान असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या विमानाला हे क्षेपणास्त्र जोडण्यात आल्यामुळे वायुदलाची मारक क्षमता प्रचंड वाढली आहे. सुखोईच्या माध्यमातून हवेतून जमिनीवर प्रहार करण्याची क्षमता वाढविणे हा या चाचणीमागील प्रमुख उद्देश होता.

आता सुपरसोनिक क्रूझ मिसाइल प्रणाली असलेली भारतीय वायुसेना ही जगातील एकमेव वायुसेना ठरली आहे. दृष्टीच्या टप्प्यापलीकडे असलेले लक्ष्य भेदण्याची क्षमताही आता वायुसेनेने प्राप्त केली आहे. सुमारे चाळीस सुखोई-30 विमानांमध्ये ही प्रणाली बसविण्याची भारताची योजना आहे.

लेखक – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

या यशानंतर भारताने लष्करीदृष्ट्या स्वतःला महासत्ता म्हणून सिद्ध केले आहे. आता भारत या क्षेपणास्त्राची निर्यात करण्याच्या दिशेने पावले टाकण्याचीही तयारी करीत आहे.

एमटीसीआर संघटनेचा सदस्य बनल्यानंतर हे काम आणखी सोपे झाले आहे. 2011 पासून अशी क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या शर्यतीत व्हिएतनाम सर्वांत आघाडीवर आहे.

चीनपासून बचावासाठी व्हिएतनामला क्रूझ क्षेपणास्त्र यंत्रणा हवी आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची विक्री करण्यासाठी भारताच्या डोळ्यांसमोर व्हिएतनामसह आणखी 15 खरेदीदार देशांची नावे आहेत.

व्हिएतनामव्यतिरिक्त ज्या चार देशांबरोबर या क्षेपणास्त्राच्या विक्रीविषयी संवाद सुरू आहे, त्या देशांमध्ये इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, चिली आणि ब्राझीलचा समावेश आहे.

अन्य 11 देशांच्या यादीत फिलिपीन्स, मलेशिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. दक्षिण चीन समुद्रावरील नियंत्रणाच्या मुद्यावरून या सर्व देशांचे चीनबरोबर असलेले संबंध ताणले गेले आहेत.

जगातील सर्वाधिक गतिमान क्षेपणास्त्रांमध्ये समाविष्ट असलेली ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली हे एक प्रभावी अस्त्र मानले गेले आहे. हे क्षेपणास्त्र रडारपासून बचाव करून आपले लक्ष्य भेदू शकते.

त्याचप्रमाणे उड्डाणादरम्यान या क्षेपणास्त्राचा भेद करणे शत्रूला शक्य नाही. एकदा आपल्या लक्ष्याच्या दिशेने ब्राह्मोस झेपावले की त्यानंतर कोणत्याही अन्य क्षेपणास्त्राच्या वा अस्त्रप्रणालीच्या साह्याने त्याला रोखणे शक्य नाही.

300 किलोग्रॅम वजनाचे अस्त्र कवेत घेऊन झेपावण्याची क्षमता असलेले ब्राह्मोस मोबाइल कॅरिअरवरूनही डागता येऊ शकते. नुकतीच झालेली चाचणी याच स्वरूपाची होती.

ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी पोखरणच्या वाळवंटात अनेकदा करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीच विकसित केलेल्या या क्षेपणास्त्र प्रणालीत काळाबरोबर काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत.

त्याची क्षमताही वाढविण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य असे की, हे समुद्रातून, जमिनीवरून तसेच हवेतूनही डागंता येणे शक्य आहे.

त्यामुळेच या क्षेपणास्त्रामुळे तीनही सेनादलांची ताकद वाढली आहे. गेल्यावर्षी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण नौदलाच्या आयएनएस कोच्ची या युद्धनौकेवरून करण्यात आले होते.

या प्रक्षेपणाद्वारे नवीन प्रणाली वाहून नेण्याची आणि डागण्याची युद्धनौकांची क्षमताही तपासण्यात आली. ‘अ‍ॅक्सेप्टन्स टेस्ट फायरिंग’ कार्यक्रमांतर्गत हे परीक्षण करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे जून 2014 आणि फेब्रुवारी 2015 मध्ये ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण आयएनएस कोलकता या युद्धनौकेवरून करण्यात आले आहे.

ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या टॉमहॉक या सबसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षा तिप्पट अधिक गतिमान आहे. भारतीय नौदलाकडे असलेली ही अत्यंत वेगवान आणि विनाशक प्रहारप्रणाली आहे.

सामान्यतः एका युद्धनौकेची क्षमता आठ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची असते. परंतु आयएनएस कोलकता या युद्धनौकेवरून 16 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे वाहून नेली आणि डागली जाऊ शकतात.

या प्रणालीत खास युनिव्हर्सल व्हर्टिकल लाँचर डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. या लाँचरच्या साह्याने क्षैतिज स्वरूपात या क्षेपणास्त्राचा मारा कोणत्याही दिशेने करता येऊ शकतो.

ब्राह्मोस या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी आतापर्यंत पाणबुडीतून, युद्धनौकेवरून, विमानातून आणि जमिनीवरूनही यशस्वी करण्यात आली आहे.

मोबाइल ऑटोनॉमस लाँचरच्या साह्यानेही या चारही ठिकाणांहून परीक्षण करण्यात आले आहे. ब्राह्मोसच्या नव्या रूपात सीकर हेड हे वैशिष्ट्य असेल. अचूकपणे लक्ष्य वेधण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

300 किलोग्रॅम वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. त्याची सर्वाधिक गती 2.8 मॅक एवढी प्रचंड आहे. ही गती ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट आहे.

ध्वनीच्या गतीपेक्षाही अधिक गतीने प्रवास करून अचूक प्रहार करणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करू शकते. सुमारे 200 ते 300 किलोपर्यंतची पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास ते सक्षम आहे.

सुखोई लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर विमानातून क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची तीन रूपे आतापर्यंत विकसित करण्यात आली आहेत.

आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र पाण्यातून पाण्यात मारा करण्यासाठी तसेच हवेत प्रक्षेपित करण्यासाठी तयार करण्यात येत आहे.

लष्कराच्या दोन रेजिमेंटच्या ताफ्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्र आताही आहेच. कार्यात्मक स्वरूपात लष्करात ब्राह्मोस तैनात करण्यात आले असून, 67 क्षेपणास्त्रे, पाच मोबाइल ऑटोनॉमस लाँचर्स आणि अन्य उपकरणांसह दोन मोबाइल कमांड पोस्टही लष्कराच्या ताफ्यात आहेत.

ब्राह्मोस ब्लॉक-2 क्षेपणास्त्रांची दुसरी स्वतंत्र रेजिमेंट लष्कर तयार करीत आहे. लँड अ‍ॅटॅक क्रूझ मिसाइल रेजिमेंट या नावाने ती ओळखली जाईल.

या क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घनदाट लोकसंख्या असलेल्या भागातील अचूक लक्ष्यावर नेमका मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राकडे आहे.

ब्राह्मोस ब्लॉत-2 च्या साह्याने दहशतवाद्यांच्या तळासह अन्य सूक्ष्म लक्ष्यांचा भेद करणेही सहज शक्य होणार आहे. दोन रेजिमेंटमध्ये ब्राह्मोस तैनात केल्यानंतर आता तिसर्‍या रेजिमेंटमध्ये ते तैनात करण्यासाठी लष्कराने मागणी नोंदविली आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या ब्लॉक-3 या संस्करणाची यशस्वी चाचणी अचूक दिशानिर्देश आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साह्याने करण्यात आली आहे.

या क्षेपणास्त्राची अत्याधुनिक संचालन प्रणाली आणि तितकेच आधुनिक सॉफ्टवेअर याच्या साह्याने जमिनीपासून दहा मीटर उंचीवर असणार्‍या लक्ष्याचाही अचूक भेद करता येणे शक्य झाले आहे.

थोडक्यात, ब्राह्मोस हे सर्वगुणसंपन्न क्षेपणास्त्र आता लष्कराच्या भात्यात आहे. एवढेच नव्हे, तर भारताला व्यावसायिक व्यूहात्मकदृष्ट्याही ते उपयोगी पडत असून, चीनच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी चीनशी वाद असलेल्या देशांकडून या क्षेपणास्त्राला मागणी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे व्यवसायाबरोबरच भारताला सुरक्षितताही आपोआप मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

*