Blog : वृद्धापकाळातील आखणी

0

पन्नाशीत प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने विचार करायला हवा. भावी जीवनाची आखणी केली पाहिजे. जेवणाचे ताट द्या; पण बसायचे पाट देऊ नका.

इतरांचे अनुभव पाहून शहाणे व्हावे. पैसे जवळ ठेवा. सर्वच मुला-मुलींना वाटून देऊन भिकारी होऊ नका. ‘असतील शिते तर जमतील भूते’ हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.

नियमित व्यायाम, फिरणे, मित्रांमध्ये गप्पा-टप्पा केल्या पाहिजेत. डॉक्टरांकडे नियमित तब्येतीची तपासणी केली पाहिजे. पर्यटन केले पाहिजे.

निसर्गात माणूस अधिक मोकळा होतो. आनंद मिळतो. मित्रांबरोबर सुखदु:खे वाटली पाहिजेत. कुढत जीवन जगायचे नसते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

रेमंड कंपनीचे सर्वेसर्वा सिंघानिया या महान उद्योगपतीलादेखील त्यांच्या मुलाने वृद्धापकाळात जगणे कठीण करून टाकले.

मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लॅटमध्ये अमेरिकास्थित मुलाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे एका मातेचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला.

त्याहीपुढे एका महाभागाने तर आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना परदेशात घेऊन जाण्याच्या भूलथापा देऊन त्यांची सर्व इस्टेट विकून पैसे केले आणि त्या वृद्ध माता-पित्यांना विमानतळावरच सोडून परदेशी पसार झाला. कुठे चालला आहे आपला समाज ?

आयुष्यभर कष्ट उपसून पोटाला चिमटे देऊ1न आई-वडील मुलांना शिकवून मोठे करतात. ही मुले पुढे त्यांनाच विसरतात. त्यांची स्वप्न चक्काचूर करतात. त्यांना निराधार करतात.

माता-पिता हे अडगळ वाटू लागतात. त्यांची गरज संपते. त्यांना वृद्धाश्रमात भरती करून आपल्या जबाबदारीचे भाजन विसरतात. देशभर अनेक वृद्धांच्या अनेक कथा आहेत.

त्या ऐकल्या, पाहिल्या म्हणजे संवेदनशील माणसाचे हृदय पिळवटून निघते. ‘नटसम्राट’ हे कुसुमाग्रजांचे नाटक व त्यावरचा सिनेमा पाहून तर माणूस सुन्न होतो.

जीवनाचे शाश्वत सत्य पाहून आपण कमालीचे अस्वस्थ होतो. प्रत्येकालाच या अवस्थेमधून जायचे असते. वृद्धत्व तर कुणीही टाळू शकत नाही; पण या अवस्थेत जी प्रतारणा, अवहेलना काहींच्या वाट्याला येते ते पाहिले म्हणजे ही अवस्था शापच वाटू लागते. तशात जर एखादा जोडीदार लवकर निघून गेला तर मात्र दुसर्‍याची अवस्था अधिक कठीण बनते.

जेव्हा ही व्यक्ती तरुण असते, कमवती असते तेव्हा मात्र विशेष काळजी घेतली जाते. आगत-स्वागत केले जाते. त्यांना मानसन्मान दिला जातो. तो कमवणारा म्हणून काळजी घेतली जाते.

पण तीच व्यक्ती निवृत्त झाली, उत्पादन खूप कमी झाले, काम करेनाशी झाली तर मात्र पाहिजे तेवढी दखल घेतली जात नाही. तेवढा मानसन्मान दिला जात नाही. उलट ती व्यक्ती दुर्लक्षित ठरते.

घरातच जास्त वेळ असल्यामुळे एवढी दखल घेतली जात नाही. कधी कधी बाहेर गेल्यानंतर एवढ्या लवकर कसे परत आलात म्हणून अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते.

लेखक – डॉ. किशोर पवार, माजी प्राचार्य

वृद्धांनी जास्तीत जास्त वेळ बाहेर राहावे अशी काहींची अपेक्षा असते. ती व्यक्ती घरी अडथळा वाटते. कुणीच धड बोलत नाही. सुना, मुलांना, नातवंडांना या आजोबांची घरातील हजेरी अडचणीची वाटते. ज्याने सर्वस्व पणाला लावलेले असते, कष्ट उपसलेले असतात, घरदार उभे केलेले असते ते काय फक्त त्याच्या

स्वत:साठी नसून कुटुंबासाठी असते. तेथे कर्तव्य असते. परंतु त्याची कदर पुढच्या पिढीला नसते. ते बेजबाबदारपणे पैसे उधळतात ते पाहवत नाही.

चार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर ज्येष्ठांचा अपमानच होतो. त्यांच्या त्यागाची खिल्ली उडवली जाते. उलट कडवट शब्दांनी सुनावले जाते.

डोळे बंद करून घ्या, कटकट करू नका, घरात शांत राहा या गोष्टी म्हणजे तोंड बांधून बुक्क्यांचा मार! अपमानामुळे वृद्ध दु:खी होतात, कुढतात, आतल्या आत जळत राहतात. काय दिवस आले, असेच म्हणावे वाटते.

त्यांचा मानसिक छळ होतो. अडगळीच्या, अडचणीच्या खोलीत, गॅलरीत, जिन्याखाली व्यवस्था करतात. तळहाताच्या फोडासारखी जपलेली मुले जवळ येत नाहीत, बोलत नाहीत, चार शब्द ऐकत नाहीत, विचारपूस करीत नाहीत, आवडीनिवडी जपत नाहीत.

उलट आई-वडील अडचणीचे वाटू लागतात. त्यांच्या आजारपणात काळजी घेत नाहीत. काही महाभाग तर त्यांना वेगळे ठेवतात. काही वृद्धाश्रमात रवानगी करतात.

आपली मुले म्हातारपणातील काठी बनतील, सुखात ठेवतील ही आशा फोल ठरते. आजी-आजोबा होण्याचे स्वप्न असते. ते पूर्ण होते; पण नातवंडांना खेळवू, त्यांच्याशी खेळू पण नंतर मात्र वेगळेच दु:ख नशिबी येते.

काही विकृत तर नातवंडांशीदेखील बोलू देत नाहीत. खेळणे आणि खेळवणे तर दूूरच! त्यांच्या जमान्यातील गोष्ट कुठे पटतात सुनेला! त्यामुळे सून, मुलगा मुलांना रागावतात, मारतात. हे दु:ख आजी-आजोबांना पाहवत नाही.

तुमच्यामुळेच हा बिघडला, तुमचे संस्कारच वाईट अशा कडवट शब्दांनी वृद्धांना हतबल करतात, अपमानीत करतात. त्यांची स्वप्न धुळीला मिळतात.

वृद्धत्व शापच वाटू लागते. काही मुले खर्चाला पैसे देत नाहीत. ते मात्र पैसे उधळतात. लाचारीचे जीवन वृद्धांना जगावे लागते. म्हणून पन्नाशीत प्रवेश करणार्‍या व्यक्तीने गांभीर्याने विचार करायला हवा.

भावी जीवनाची आखणी केली पाहिजे. जेवणाचे ताट द्या पण बसायचे पाट देऊ नका. इतरांचे अनुभव पाहून शहाणे व्हावे. पैसे जवळ ठेवा. सर्वच मुला-मुलींना वाटून देऊन भिकारी होऊ नका.

‘असतील शिते तर जमतील भूते’ हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. नियमित व्यायाम, फिरणे, मित्रांमध्ये गप्पाटप्पा केल्या पाहिजेत. नियमित डॉक्टरकडे चेकअप केले पाहिजे.

पर्यटन केले पाहिजे. निसर्गात माणूस अधिक मोकळा होतो. आनंद मिळतो. मित्रांबरोबर सुखदु:ख वाटले पाहिजे. कुढत जीवन जगायचे नसते.

वृद्धपकाळातील सुखदु:खांची मुळे तारुण्यात असतात. आता मुलांवर अवलंबून राहायचे दिवस संपले आहेत. वाढती महागाई, स्पर्धा, आत्मकेंद्री वृत्ती यामुळे पुढील नियोजन करावे.

एक काळ आपला असतो. पण पुढे असेलच असे नाही. म्हणून तडजोड करायलाही शिकले पाहिजे. सतत अधिकार, हुकूमत गाजवून चालणार नाही. पुढची पिढी ही सतत स्मार्ट असते. त्यांचे आचार-विचार काहीवेळा पटत नाहीत; पण तडजोड करावी. म्हणजे क्लेश होत नाही. फुकटचे सल्ले देण्याचे टाळावे.

आर्थिकदृष्ट्या आपण मुलांवर अवलंबून राहू नये. गुंतवणूक केली म्हणजे पैसा हाती असतो. आपली सूत्रे मुलाकडे सोपवावीत. त्यांचे कौतुक करावे.

LEAVE A REPLY

*