Blog : नव्या समीकरणांच्या दिशेने…

0

दक्षिण आशियातील सत्तासमीकरणे सध्या झपाट्याने बदलत आहेत. यामध्ये अफगाणिस्तानातील परिस्थिती महत्त्वाची ठरत आहे. अमेरिकेने मागील काळात अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु ट्रम्प यांनी आता अतिरिक्त सैन्य पाठवण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे भारतानेही अफगाणमध्ये संरक्षणात्मक भूमिका बजावावी, अशी आग्रही मागणी होत आहे.

अमेरिकेचे टिलर्सन आणि अफगाणिस्तानचे अश्रफ गनी यांची एकाच वेळी झालेली भारत भेट या नव्या समीकरणांची दिशा ठरवणारी ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स डब्ल्यू टिलरसन आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष दोघेही एकाच वेळेला भारत भेटीवर आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची चर्चा झाली. हा योगायोग जुळवून आणलेला आहे. या दोघांची एकाचवेळी होणारी भारतभेट एका पार्श्वभूमीवर घडून आली आहे.

ही पार्श्वभूमी म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि दक्षिण आशिया धोरण जाहीर केलेले आहे. या धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत.

त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका अफगाणिस्तानातील अश्रफ गनी यांच्या नेतृत्त्वाखालील लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला पूर्ण पाठिंबा देणार आहे.

दुसरे म्हणजे गनी सरकारच्या विरोधात उठाव करणार्‍या तालिबानींना कोणत्याही प्रकारे समर्थन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी तालिबानशी चर्चेची तयारी दाखवली होती; परंतु ट्रम्प यांनी अशा प्रकारची चर्चा न करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे, पूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची मानली होती. त्या दृष्टिकोनातून अमेरिका पाकिस्तानकडे लक्ष देत होती.

मात्र ट्रम्प यांनी पाकिस्तानचे महत्त्व कमी करून भारताचे महत्त्व वाढवले आहे. ट्रम्प यांनी भारताने अफगाणिस्तानात विकासात्मक कामांबरोबर संरक्षणात्मक भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातील 25 हजार अमेरिकन सैन्य काढून न घेता उलटपक्षी अतिरिक्त 5 हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

लेखक – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

थोडक्यात अमेरिकेचा अफगाणिस्तानातील रस वाढलेला आहे, यासाठी अमेरिका पाकिस्तानला डावलून भारताकडे अपेक्षेने पहात आहे. त्या दृष्टिकोनातून टिलर्सन यांचा भारत दौरा घडून आला आणि त्याचवेळी गनीदेखील भारत दौर्‍यावर आले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशिया धोरणाला पूर्णत्त्व देण्यासाठी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी ही एकत्रित भेट आयोजित करण्यात आली होती.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष 2012 पासून नियमितपणे दरवर्षी भारतभेटीवर येतात. त्यामागचे कारण म्हणजे भारत-अफगाणिस्तान हे जुने मित्र आहेत. भारत अफगाणिस्तानात विकासात्मक भूमिका पार पाडतो आहे.

आजवर अफगाणिस्तानला भारताने अब्जावधी रुपयांची मदत केली आहे. त्यातून रेल्वे, रुग्णालय, शाळा, कॉलेजेस यांची उभारणी केली जात आहे.

अफगाणिस्तानातील जनतेला भारताविषयी आदर आहेच; परंतु भारताने अफगाणिस्तानात संरक्षणविषयक भूमिका पार पाडावी अशी अफगाणिस्तानची मागणी आहे.

म्हणजेच भारताने तिथे सैन्य पाठवणे, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याला प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे या गोष्टी भारताने कराव्या अशी अफगाणिस्तानची अपेक्षा आहे.

मात्र या संरक्षण भूमिकेसाठी भारत उत्सुक दिसत नाही. कारण भारताचे लक्ष्य हे विकासात्मक भूमिकेवर आहे.
वस्तुतः भारताने यापूर्वीच अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सैन्याला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे.

याखेरीज भारतातर्फे तीन लष्करी हेलिकॉप्टर्स देण्यात आली आहेत. मात्र अफगाणिस्तानकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्रास्त्र पुुरवण्याची मागणी केली जात आहे.ती पूर्ण होत नाहीये. हीच मागणी करण्यासाठी गनी भारतभेटीवर आले होते.

2012 मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामूहिक सुरक्षेच्या आधारावर महत्त्वपूर्ण करार झालेला आहे. त्या कराराच्या आधारावरच दोन्ही देश परस्परांच्या संरक्षणाची काळजी घेतील असे नमूद करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विश्वास नाही. तालिबानच्या चळवळीला पाकिस्तानचाच पाठिंबा आहे ज्याचा धोका अफगाणिस्तानच्या लोकशाहीला आहे.

त्यामुळे पाकिस्तानवर उघड टीका करून अफगाणिस्तान भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. टिलर्सन यांच्या भारतभेटीमुळे नवी सत्ता समीकरणे आकाराला येत आहेत. त्यामुळे भारताचे महत्त्व वाढत आहे.

अशा परिस्थितीत दुखावलेला पाकिस्तान भविष्यात चीन किंवा रशिया यांच्याकडे ओढला जाऊ शकतो आणि नवी युती आकाराला येऊ शकते. त्याला टक्कर देण्यासाठी भारत-अमेरिका एकत्र येऊ शकतात.

त्याच्या जोडीला दक्षिण आशियात जपानचाही रस वाढत असलेला दिसत आहे. त्यामुळे जपान अमेरिका आणि भारत अशी युतीही आकाराला येऊ शकते. एकूणातच टिलर्सन हे दक्षिण आशिया धोरणाला नवा आकार देण्यासाठी भारताच्या भेटीवर आले होते.

भारताच्या भेटीपूर्वी टिलर्सन अफगाणिस्तानात गेले होते. त्यांनी तिथे गनी यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर दोघेही भारतभेटीवर आले होते.

येत्या काळात अमेरिका आणि भारत अफगाणिस्तानात संयुक्तपणे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यातून भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधांना बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

भारत 1 अब्ज डॉलरची विकासात्मक मदत अफगाणिस्तानला करणार आहे. खरेतर 2013 पर्यंत अफगाणिस्तानात भारताने संरक्षणात्मक भूमिका पार पाडावी, अशी अमेरिकेची अपेक्षा नव्हती.

पण पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात दहशतवादाचा धोका वाढू लागल्यामुळे अमेरिका याबाबत आग्रही राहिली आहे. आता नव्या दक्षिण आशिया धोरणातही ट्रम्प यांनी उघडपणे ही मागणी कऱण्यात आली आहे.

टिलर्सन यांच्या भेटीमध्येही हा विषय चर्चिला गेला आहे. त्यामुळे भविष्यात अफगाणिस्तानातील संरक्षणात्मक भूमिकेबाबत भारत काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

LEAVE A REPLY

*