Blog : दुर्लक्ष परवडणार का ?

0

जलवायू चक्र परिवर्तनास कारणीभूत ठरणारे अन्य विषय नेहमीच उपेक्षित ठरतात. उदाहरणार्थ, प्लास्टिकमुळे होणार्‍या प्रदूषणाचा विषय अत्यंत चिंताजनक असून, या विषयाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

दिवाळीत फटाके फोडायचे की नाहीत, या विषयावर धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय अंगाने खूप विचारमंथन झाले. विषय गाजला, दिवाळी आली-गेली, विषय संपला! एकंदरीतच प्रदूषण हा विषय संपला.

आता प्रदूषण करणार्‍या अन्य घटकांवरसुद्धा चर्चा होणार नाही. प्लास्टिकला तर सगळे जणू विसरूनच गेले आहेत. प्लास्टिक कचर्‍यामुळे वातावरणाचे ज्या वेगाने प्रदूषण होत आहे, ते मानवी जीवनासाठी अहितकारक आहेच; परंतु स्वच्छ वातावरणाच्या वाटेत अनेक अडसर निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर, बिगरसरकारी संस्थांचे प्लास्टिकविरोधी अभियान वारंवार अपयशी का होते, हा प्रश्न निर्माण होतो. ही कारणे अद्याप कागदावर आलेली नाहीत. मुळात यातील बहुतांश मोहिमाच केवळ कागदावर दिसतात.

आपल्या देशात कागदावरील आकडेवारी जेव्हा जमिनीवर उतरून तपासली जाते, तेव्हा शून्य परिणाम दिसून येतो. सामाजिक जाणिवा प्रगल्भ नसल्यामुळे एकंदर प्रबोधनाच्या दृष्टीने आपला प्रवास शून्याकडून शून्याकडेच चालला आहे.

परंतु वास्तव असे की, प्लास्टिकचे प्रदूषण याच वेगाने वाढत राहिले तर एक दिवस आपल्याला स्वच्छ हवाही मिळू शकणार नाही. सध्याच्या काळातच वायूप्रदूषणामुळे आपल्या शरीरात तर्‍हेतर्‍हेच्या आजारांचे विषाणू सातत्याने प्रवेश करीत आहेत.

अनेक आजार केवळ अस्वच्छतेमुळे पसरताना दिसतात. ही अस्वच्छता जशी तुंबलेल्या नाल्यांमुळे पसरते तितकीच प्लास्टिक कचर्‍यामुळेही पसरते आहे.

प्लास्टिक पॉलिथीन किंवा खाद्यपदार्थांना आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक रसायनमिश्रित पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे विषमिश्रित पदार्थ आपल्या पोटात नाइलाजास्तव जात आहेत.

आपण आज स्वच्छ भारत अभियान राबवित आहोत. परंतु प्लास्टिकचे प्रदूषण हा स्वच्छ भारत अभियानात केवढा मोठा खोडा ठरला आहे, हे आपल्याला माहीत आहे का ?

प्लास्टिकमुक्तीशिवाय स्वच्छ भारत अभियान पूर्ण होऊच शकणार नाही, प्लास्टिक कचर्‍यापासून मुक्ती मिळवण्यासाठी छत्तीसगड सरकारने खूप चांगली पावले टाकली आहेत.

2014 मध्ये राज्य सरकारने छत्तीसगडमध्ये पॉलिथीनवर बंदी घातली होती आणि प्लास्टिकविरोधी लढाईचे रणशिंग फुंकले होते.

आता प्लास्टिकपासून बनविलेली प्रचारसामग्री आणि खाद्यपदार्थांच्या वेष्टनासाठी उपयोगात आणलेल्या प्लास्टिक वस्तूंवरही निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

छत्तीसगड सरकारने घेतलेले हे दोन्ही निर्णय अन्य राज्यांसाठी पथदर्शक आहेत. छत्तीसगड हे अत्यंत मागासलेले राज्य मानले जात होते. परंतु मागासलेपणाचा शिक्का या राज्याने धुऊन काढला असून, सरकारच्या अभियानामुळे नागरिकांमध्ये संवेदना जागृत झाल्या आहेत. त्याचे सुपरिणामही दिसू लागले आहेत.

प्लास्टिक कचरा हे एका अर्थाने ‘आयात केलेले दुखणे’ आहे. आपल्याकडे कागदी आणि कापडापासून बनविलेल्या पिशव्याच पूर्वी वापरात होत्या. किराणा मालाचा दुकानदार आपल्याला वस्तू कागदात बांधून देत असे.

आता सर्व वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देतो. विदेशी लोकांचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळेच आपण एवढे मोठे संकट ओढवून घेतले आहे.

याच प्रवृत्तीने आज देशातील सर्वांत मोठ्या आणि उग्र समस्येचे रूप धारण केले आहे. आपले काम निभावले म्हणजे झाले, ही प्रवृत्ती वाढीस लागली असून, तीच घशाशी आली आहे.

आपल्या पायापुरते वहाण कापण्याची ही प्रवृत्तीही विदेशातूनच आपल्याकडे आलेली आहे. लोक आपापली गरज तात्पुरती भागविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करतात आणि नंतर याच प्लास्टिकच्या पिशव्या प्रचंड कचर्‍याचे स्वरूप धारण करतात.

यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. प्लास्टिकची वापरलेली पिशवी फेकून देणार्‍याला, हीच पिशवी आपला घात करणार आहे, याची कुणकूणही नसते. मग देशासाठी ही केवढी मोठी समस्या आहे, याचा अंदाज कुठून येणार ?

परिस्थिती अधिक हाताबाहेर जाऊ देणे आपल्या भल्याचे नाही. मुख्य म्हणजे, केवळ सरकारने सुरुवात करून हे प्रश्न मिटणार नाहीत. नागरिकांनी या अभियानात समजून-उमजून, उत्स्फूर्तपणे घेतलेला प्रतिसादच आवश्यक ठरणार आहे.

ज्या देशाची जनता आपल्या मातृभूमीशी तादात्म्य पावून हिरीरीने काम करते, तोच देश स्वच्छ आणि सुंदर बनू शकतो. आपण भारताचे रहिवासी आहोत आणि त्यामुळेच आपल्या आचार-विचारात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडायलाच हवे.

‘सर्वेपि सुखिनः संतु’ म्हणजेच सर्वांचे भले होवो, हेच आपली संस्कृती आपल्याला सांगते. परंतु आजकालच्या पायापुरते पाहाण्याची जी सवय प्रत्येकाला लागली आहे, त्यामुळे आपल्या वर्तनातून समाज सुखी होतो की नाही, याचा फारसा कुणी विचार करीत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

भारतीय संस्कृतीला मान्य नसणारी ही प्रवृत्ती आहे. आपल्या देशाला रोगमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी आपण काय योगदान देतो, याचा आढावा प्रत्येक भारतीयाने आता घ्यायलाच हवा.

आम्ही भारतीय आहोत, असे लोक केवळ म्हणतात. परंतु आपल्या दिनचर्येत भारतीय संस्कृती दिसते का, याचे अवलोकन केल्यास आपल्याला असे दिसते की, आपल्या दिनचर्येतील बहुसंख्य क्रिया पाश्चात्यांच्या अंधानुकरणावर आधारित आहेत.

जोपर्यंत आपण अंतर्बाह्य भारतीय असल्याचे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत भारतीय म्हणवून घेण्याचा आपल्याला काय अधिकार राहतो? भारतीय लोकच आज एकमेकांसाठी समस्या निर्माण करून ठेवतात.

समस्यांचे ओझे एकमेकांच्या दारात टाकण्यासाठी प्रयत्न करतात. ही अत्यंत स्वार्थी वृत्ती झाली आणि जी आपल्या भारतीय संस्कृतीला अजिबात मान्य नाही.

देशात आज पर्यावरणाशी संबंधित, हवामानातील बदलांशी संबंधित ज्या काही समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, त्या आपल्या वर्तनामुळेच निर्माण झाल्या आहेत, हे आपण कधी समजून घेणार आहोत, हा खरा प्रश्न आहे.

पावसाचे बदलते प्रमाण आणि वितरण, अवेळी पाऊस, गारपीट या समस्या आपोआप निर्माण झालेल्या नाहीत. आपल्या वर्तनामुळेच त्या उद्भवल्या आहेत.

अशा वेळी संपूर्ण जगात हीच प्रक्रिया चालते म्हणून आपणही तशीच विकासप्रक्रिया राबवायची की, भारतीय जीवनशैलीच्या आचरणातून जगापुढे आदर्श उभा करायचा, हा खरा प्रश्न आहे.

आपण प्लास्टिकच्या अनेक वस्तू वापरतो आणि अनेक अन्नपदार्थ प्लास्टिकच्या वेष्टनातून विकत घेतो. रस्ते आणि वस्त्यांमध्ये प्लास्टिकच्या कचर्‍याचे ढिगारे साचत राहतात आणि ओढे-नाले तुंबून राहतात.

मुंबईसारख्या अनेक महानगरात प्लास्टिक कचर्‍यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यातही अडचणी निर्माण होतात. परंतु नागरिक यंत्रणेला दोष देऊन स्वतः मात्र बेजबाबदारपणे प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवतात.

प्लास्टिकमुळे प्रदूषित होणार्‍या वातावरणाचा फटका झाडावेलींना आणि पशुपक्ष्यांनाही बसतो आहे. झाडेही प्रदूषणाची शिकार ठरल्यास आपल्याला स्वच्छ हवा कोण देणार ?

आज आपल्यापुढील सर्वांत महत्त्वाची समस्या हीच आहे. जर अंतिमतः आपल्यालाच त्रास होणार असेल, तर अशा गोष्टी आपणच का करतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आणि गांभीर्याने या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

प्लास्टिकचा वापर ही यातील महत्त्वाची गोष्ट असून, भविष्यात प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्यापूर्वीच आपण आपली जबाबदारी ओळखायला हवी. देशाला स्वच्छ वातावरण मिळावे, ताजी हवा मिळावी, भरपूर ऑक्सिजन मिळावा, वेळेवर पाऊस मिळावा, असे वाटत असल्यास प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या मोहिमेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करायला हवी. – प्रा. रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

 

 

 

 

LEAVE A REPLY

*