Blog : राजकन्येची उद्यमशीलता

0

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या इव्हांका ट्रम्प अलीकडेच भारत दौर्‍यावर होत्या. यादरम्यान हैदराबाद इथे पार पडलेल्या जागतिक उद्योजकता परिषदेमध्ये त्यांनी बीजभाषणही केले.

35 वर्षांच्या इव्हांका एक यशस्वी उद्योजक आहेत शिवाय राष्ट्राध्यक्ष असलेल्या वडिलांच्या वैयक्तिक सल्लागारही आहेत. आपल्या व्यावसायिक तत्त्वांनी तरुण उद्योजकांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या इव्हांकाविषयी.

ती आली, तिने पाहिले, तिने जिंकले असेच काहीसे वातावरण इव्हांका ट्रम्प यांच्या येण्याने झाले. हैदराबादमधील आठव्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प भारतात आली होती.

दोन दिवसीय दौर्‍यामध्ये शिखर परिषदेत इव्हांकाने आपले विचार मांडले. हे विचार भारतीय स्त्रीच्या भविष्यावर किती दूरगामी परिणाम करणारे असतील हे आताच सांगता येणार नसले तरी भारत-अमेरिका संबंधांची मुत्सद्देगिरी यातून साधली जाईल हे नक्की.

यापूर्वीच्या कोणत्याही अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कन्येने अशा पद्धतीने भारताचा दौरा केला नाही. त्यामुळे देशात इव्हांकाच्या या भेटीची उत्सुकता वाढली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार सभांमध्ये हिरीरीने भाग घेणारी इव्हांका त्यांची सल्लागार बनली.

आपल्या पणजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने आपला व्यवसाय निर्माण केला, वाढवला आहे आणि मोठी उलाढाल असणार्‍या उद्योगांच्या रांगेतही स्थान मिळवले.

साधारण स्त्रीवादी अशी इव्हांकाची प्रतिमा रुजत चालली आहे. तिने व्हार्टन विद्यापीठामधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. वयाच्या दहाव्या वर्षी आई-वडिलांच्या विभक्त होण्याचे दु:ख सहन करणारी इव्हांका कुटुंबाचे महत्त्व पुरेपूर जाणून आहे. म्हणूनच आपल्या व्यस्त वेळापत्रकामधूनही कुटुंबाला वेळ देणे ती गरजेचे मानते. फ्रेंच आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर तिचे प्रभुत्व आहे.

इव्हांकाला मोठे डोळे आणि सरळ नाकाच्या सौंदर्याची देणगी आईकडून म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्व पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्याकडून मिळाली आहे.

मूळ सौंदर्यावर बुद्धिमत्तेचे तेज चढल्याने इव्हांका अधिकच सुंदर दिसते. इतकेच कशाला इव्हांकासारखे दिसण्याच्या हट्टापायी अमेरिकेमध्ये प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचीही लाट आली आहे.

राजकारणात येण्यापूर्वी इव्हांका यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवत ‘टॉमी हिलफिगेर’ या ब्रँडसाठी मॉडेलिंगही केले आहे. व्हर्साचे, मार्क बॉव्हर या ब्रँडस्साठी रॅम्पवॉकही केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘द अपेरेंटिस 5’ या मालिकेसाठी तिने काम केले आहे तर अ‍ॅपेरेंटिसच्या सहाव्या सत्रासाठी परीक्षक म्हणून जबाबदारी निभावली आहे.

इव्हांका एक चांगली लेखिकाही आहे. ‘द ट्रम्प : कार्ड प्लेईंग टू विन इन वर्क अ‍ॅण्ड लाईफ’ हे तिचे पहिले पुस्तक. इव्हांकाचे दुसरे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

‘वुमन हु वर्क : रिरायटिंग द रुल्स फॉर सक्सेस’ या पुस्तकात त्यांनी करिअरिस्टीक महिलांना समोर ठेवून लेखन केले आहे.

पिढीजात व्यवसायात रमणे इव्हांकाला कधीही शक्य होते. वडिलांसारख्याच महत्त्वाकांक्षी स्वभावाच्या इव्हांकाने उद्योग क्षेत्रालाही स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडले.

लेखिका – अमृता पाटील

अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये स्वत:चे रिटेल स्टोअर सुरू करणार्‍या इव्हांकाने स्वत:चा एक ब्रँड बनवला आहे. उद्योजक म्हणून स्थिरस्थावर होण्यासाठी इव्हांकाला ट्रम्प कुटुंबियांचे मैदान तयार असले तरी बाजारात स्वत:ची ओळख निर्माण करणे हे खरे आव्हान होते. त्यातूनच तिने इव्हांका ब्रँडची निर्मिती केली.

इव्हांकाचा हा फॅशन ब्रँड अमेरिकेतील प्रत्येक युवतीला आपल्या कलेक्शनमध्ये असावा, असे वाटल्यास नवल नाही. फॅशन जगत अजेंड्यावर ठेवूनच इव्हांकाची वेबसाईट बनवली गेली आहे.

कपडे, हॅण्डबॅग, दागिने, खरेदीच्या जाहिराती यांनी ती सजलेली दिसते. एखाद्या सामान्य स्त्रीच्या भावविश्वात हात घालून आपला व्यवसाय वाढवण्याचा बेरकीपणा इव्हांकाला वडिलांकडूनच मिळाला.

अर्थात या धामधूमीत वडिलोपार्जित व्यवसायाकडे तिचे दुर्लक्ष झाले असेही नाही. इव्हांका यांनी चार पिढ्यांपासून बाजारपेठेत नांदत असलेल्या ट्रम्प ऑर्गनायझेशनची धुराही उत्तमरीत्या सांभाळली आहे.

राष्ट्रपतिपदासाठी ट्रम्प यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मात्र इव्हांकाने वडिलांच्या प्रचाराकडे पूर्ण लक्ष दिले. डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इव्हांका पती जेरेड कुशनेर यांच्यासमवेत वॉशिंग्टन डी. सी. येथील राष्ट्राध्यक्ष निवासस्थानामध्ये राहायला गेली. इव्हांकाचे पती कुशनेर यांची राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारपदी निवड झाली आहे.

वयाच्या पस्तिशीत इव्हांकाला राष्ट्राध्यक्ष असलेल्या वडिलांची सल्लागार होण्याची संधी मिळाली असली तरी प्रतिमानिर्मितीचा मार्ग नक्कीच सोपा नव्हता.

एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या इव्हांकाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात व्हाईट हाऊसपासून झाली आहे. अनेक भूमिका निभावताना स्वत:च्या बुद्धिमत्तेची चुणूकही ती जाणवून देते.

तिची अमेरिकेविषयी, तिथल्या जीवनशैलीविषयी, तरुणाईविषयी स्वत:ची अशी विशिष्ट मते आहेत. ही मते ती वेळोवेळी प्रदर्शितही करत असते.

पण मत मांडणे आणि प्रशासनाला विशिष्ट निर्णयासाठी वळवणे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यातही डोनाल्ड ट्रम्पसारख्या हेकेखोर राजकारण्याला आपल्या मताच्या बाजूने यायला लावणे हेदेखील एक दिव्यच आहे.

हाच अनुभव ‘समान काम, समान वेतन’ या भूमिकेदरम्यान इव्हांकाला आला. स्त्रीवादी भूमिकेतून स्त्री-पुरुष यांच्यातील कार्यालयीन विषमता नष्ट करण्यासाठी ‘समान काम समान वेतन’ या धोरणाबद्दल ती आग्रही होती.

या भूमिकेला खुद्द पित्याकडूनच विरोध झाला. त्यामुळे तिला हा विचार बासनात गुंडाळून ठेवावा लागला. अशावेळी तिने प्रशासनाच्या बाजूने बोलत आपली हतबद्धता सिद्ध केली.

पित्याचे टोकाचे भांडवलवादी विचार आणि विरोधकांचे रोखलेले भाले इव्हांकाला अनेकदा सहन करावे लागले आहेत. समलिंगी आणि तृतीयपंथीयांचा मुद्दाही इव्हांकाने असाच उचलून धरला. ट्रम्प यांनी मात्र या मुद्यावर सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करणेच पसंत केले.

इव्हांकाच्या दौर्‍याबद्दल भारतात भरपूर उत्सुकता निर्माण केली गेली. या पार्श्वभूमीवर आपल्या
मूल्यांबाबत पित्याकडून मिळालेला घरचा आहेर पाहता इव्हांका भारत भेटीमध्ये काय बोलते याकडे माध्यमांचे लक्ष लागून राहिले होते.

हैदराबाद येथील परिषदेमध्ये बीजभाषण करताना तिने स्त्रीवाद आणि उद्यमशीलता या बाबी अधोरेखित केल्या. या परिषदेमध्ये इव्हांकाने महिला उद्योजकांच्या गटाचे नेतृत्व केले.

या विषयावर बोलताना महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर तिने लक्ष केंद्रित केले. महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना येणार्‍या अडचणींवरही तिने प्रकाशझोत टाकला.

महिला सर्व क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. त्यांच्या कामाने सामाजिक, आर्थिक क्षेत्रात मोठे बदल होतात. अशावेळी महिला उद्योजकांना संधी देणे जगाच्या एकूण उत्पन्नात दोन टक्क्यांची भर घालू शकते, असे मत इव्हांकाने व्यक्त केले.

तिच्या भाषणावर नजर टाकली असता महिला उद्योजिकांविषयीचे जुनेच मुद्दे नव्याने अधोरेखित केल्याचे दिसून येते. तिच्याकडून काही तरी खास ऐकायला मिळेल या अपेक्षेत असणार्‍यांची मात्र निराशा झाली.

कारण इव्हांका यांची व्यावसायिक पार्श्वभूमी आणि कुटिरोद्योग करणार्‍या एका सामान्य महिलेची पार्श्वभूमी यात मोठी तफावत दिसून येते. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशातील एका औद्योगिक घरातून आलेल्या इव्हांकाचा सामान्य भारतीय महिलांपुढील आव्हानांचा अभ्यास तोकडा आहे, हे यातून दिसून आले.

कारण काहीही असो, पंतप्रधान मोदींनी इव्हांकाला जातीने भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही तिला आगत्याने भारत भेटीचे आमंत्रण दिले होते.

यामुळे या परिषदेमध्ये ट्रम्प-मोदी संबंधांची वीण अधिक घट्ट करण्याचा सुप्त हेतूच दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर वडिलांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये असलेला इव्हांकाचा सहभाग पाहता अमेरिकेची भावी सत्तासूत्रे हाताळणारे ‘जनानी नेतृत्व’ जगाला दिसेल यात शंका नाही.

 

LEAVE A REPLY

*