Blog : भंडारींच्या फेरनिवडीचा अन्वयार्थ

0

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भारताचे न्या. दलवीर भंडारी यांची झालेली फेरनिवड भारतासाठी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील 5 पैकी 4 कायमस्वरुपी सदस्य देशांनी ब्रिटनच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यानेच निवडणुकीत माघार घेतली.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्य सदस्य देशांचा भारताला मिळणारा वाढता पाठिंबा पाहूनच ही माघार झाली. आंतरराष्ट्रीय समुदायात भारताला मिळू लागलेले महत्त्वाचे स्थान आणि वाढता पाठिंबा यांचेच हे द्योतक आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) न्यायाधीश म्हणून न्या. दलवीर भंडारी यांची झालेली निवड ही भारताच्या भूमिकेला जागतिक पातळीवर मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्याची द्योतक आहे.

कठोर मेहनतीने न्या. भंडारी दुसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत. जागतिक महत्त्वाच्या मुद्यांवर भारत आता अधिक आत्मविश्वासाने आपली बाजू मांडू शकणार असल्यामुळेच ही निवड अत्यंत महत्त्वाची आहे.

ब्रिटनचे उमेदवार ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी निवडणुकीच्या रिंगणातून स्वतःच माघार घेतली. त्याचा फायदा न्या. भंडारी यांना मिळाला व त्यांचा विजय सुकर झाला.

मूळ भारतीय वंशाचे असणारे न्या. भंडारी यांच्या निवडीमुळे भारताची बाजू आंतरराष्ट्रीय समुदायात आणखी भक्कम झाली आहे. भारताचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असल्याचीच ही पावती मानायला हवी.

जागतिक पातळीवर आपली ओळख पुन्हा एकदा निर्माण करताना भारताने खूप परिश्रम घेतले आहेत आणि तेच या निवडीतून दिसून येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक दिग्गजांनी न्या. भंडारी यांच्या फेरनिवडीसाठी अन्य देशांचा पाठिंबा मोठ्या मेहनतीने मिळवला होता.

लेखक – अ‍ॅड. प्रदीप उमाप, कायदे अभ्यासक

या निवडणुकीत मिळालेला जागतिक पाठिंबा भारत संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनेत आपले आंतरराष्ट्रीय स्थान अधोरेखित करण्यासाठी वापरू शकतो.

त्यादृष्टीनेही ही निवड महत्त्वपूर्ण आहे. पाकिस्तानातील कारागृहात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्याय मिळण्याच्या दृष्टीनेही न्या. दलवीर भंडारी यांची निवड ही एक महत्त्वपूर्ण घटना ठरू शकते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने यापूर्वी कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्यास पाकिस्तानला भाग पाडले आहे. त्यावेळीही न्या. भंडारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून कुलभूषण जाधव प्रकरणात आता भारत पाकिस्तानवर आणखी दबाव आणू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य देशही या निवडीमुळे चिंतीत झाले असतील.

कारण वैश्विक पातळीवर त्यांच्या ताकदीला आव्हान देण्याचे सामर्थ्य भारताकडे असल्याचे हे एक उदाहरण ठरू शकते. अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे चार सदस्य देश ग्रीनवूड यांच्या बाजूने या निवडणुकीत उभे राहिले होते.

त्यामुळे भारताची ताकद यानिमित्ताने या देशांनाही कळून चुकली आहे. भारताच्या दृष्टीने ही निवडणूक आणखी एका कारणासाठीही महत्त्वाची आहे.

ते म्हणजे 1947 नंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात ब्रिटनचे न्यायाधीश नसतील, असे प्रथमच घडत आहे. त्यामुळे आता दक्षिण चीनचा समुद्र, भारताचा अन्य देशांबरोबर असलेला सीमावाद अशा संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्यांवर तसेच मोठ्या निर्णयांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरेल.

पुढील वर्षी फेब्रुवारी 2018 मध्ये न्या. भंडारी यांचा कार्यकाळ समाप्त होणार होता. आता पुढील नऊ वर्षांसाठी त्यांची फेरनिवड झाली आहे. राजस्थानातील जोधपूर येथे 1 ऑक्टोबर 1947 रोजी भंडारी यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील व आजोबा राजस्थान बार असोसिएशनचे सदस्य होते. ऑक्टोबर 2005 मध्ये न्या. भंडारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.

सर्वोच्च न्यायालयाचेही ते माजी न्यायमूर्ती आहेत. पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले. 19 जून 2012 ला त्यांनी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजेच आयसीजेच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यापूर्वी भारतातील विविध न्यायालयांत त्यांनी सुमारे वीस वर्षे विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय न्यायाधिशांची फेरनिवड झाल्यानेे भारताच्या न्याययंत्रणेला बळ मिळण्याची व आवश्यक सुधारणा होण्याची शक्यता आहे.

न्या.भंडारी यांचा विजय हा भारताचाच नव्हे तर सर्व विकसनशील देशांचा विजय मानायला हवा. कारण सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांचा या निवडणुकीत एका अर्थी पराभवच झाला.

जनरल असेंब्लीत भारताला दोन तृतीयांश बहुमत मिळाले होते. सुरक्षा परिषदेचे 5 सदस्य भारताच्या बाजूने होते, तर 9 सदस्य ख्रिस्तोफर यांच्या बाजूने होते. गुप्त मतदान पद्धती असतानासुद्धा काहीजण भीतीपोटी त्यांना समर्थन देत होते.

परंतु नंतर भारताला मिळणारा पाठिंबा वाढत गेला. त्यामुळेच ब्रिटनच्या उमेदवाराने माघार घेतली. ख्रिस्तोफर यांनी माघार घेतली नसती तर मोठ्या नामुष्कीचा सामना ब्रिटनला करावा लागला असता.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 न्यायाधीश असतात. त्यातील 14 जणांची निवड आधीच झालेली होती. या जागेसाठी न्या. दलवीर भंडारी यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी अखेर माघार घेतली.

या प्रक्रियेवरून काही गोष्टी उघड होतात. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्य देश आणि अन्य देशांमध्ये मतभेद आहेत.

अनेकांना कायमस्वरुपी सदस्य देशांची भूमिका मान्य नाही. भारताने या निवडणुकीद्वारे जागतिक समुदायात आपले स्थान भक्कमपणे अधोरेखित केले असून सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरुपी सदस्यांना जगभरातून होत असलेला विरोधही दाखवून दिला आहे.

भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसारखे देश सुरक्षा परिषदेचे सदस्य झाले तर विकसनशील देशांना प्रतिनिधित्व मिळून एकंदरच संयुक्त राष्ट्रे ही संघटना अधिक बळकट होणार आहे.

परंतु वजनदार देश ही गोष्ट मान्य करायला आजही तयार नाहीत. त्यांना या निवडणुकीद्वारे चांगलीच चपराक बसली असून विकसनशील देशांचा आवाज बुलंद झाला आहे.

विकसनशील देश सुरक्षा परिषदेचे सदस्य झाले तरी अर्थातच त्यांना व्हिटोचा अधिकार नसेल. परंतु त्यांच्या समावेशाने सुरक्षा परिषदेत सुधारणा नक्की होतील. म्हणूनच सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांना कोणताही बदल नको आहे.

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निवडणुकीकडे पाहिल्यास काही गोष्टी ठसठशीतपणे दिसून येतात. ही निवडणूक सोपी नसते.

या निवडणुकीत जिंकण्यासाठी सुरक्षा परिषद आणि जनरल असेंब्लीमध्ये विजय मिळवणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर न्या. दलवीर भंडारी यांच्या विजयाचे एक वेगळेच महत्त्व आहे.

आयसीजे हे खूप जुने न्यायालय आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेपूर्वीही ते अस्तित्वात होते. त्यामुळे त्याचे महत्त्व मोठे आहे.

दोन-तीन देशांमध्ये नद्यांच्या पाण्यावरून चाललेला विवाद असो वा सीमेचा तंटा असो, मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा मुद्दा असो वा अन्य कोणताही आंतरराष्ट्रीय मुद्दा असो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची गरज जगातील प्रत्येक देशाला असते.

दक्षिण चीन सागराच्या मुद्यावरून दहा देशांमध्ये विवाद सुरू आहे. या सर्वच देशांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आधार घेण्यावाचून गत्यंतर नाही. कुलभूषण जाधव प्रकरणात न्या. भंडारी यांनी बजावलेली भूमिकाही त्यांच्या फेरनिवडीसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे.

अर्थात भारत आणि पाकिस्तानदरम्यान काही द्विपक्षीय मुद्दे आणि करार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालय याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही.

परंतु कुलभूषण जाधव यांचे अपहरण इराणमधून झाल्याचे निदर्शनास आणून देऊनच भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दार ठोठावले होते आणि या प्रकरणात कुलभूषण यांची फाशी रद्द करण्यात भारताला यशही मिळाले.

आयसीजेमधील न्यायाधीश आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आधारे निवाडा करतात आणि कुलभूषण प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायद्याने भारताला साथ दिली.

त्यामुळेच फाशी रद्द करण्यात भारताला यश मिळाले. याखेरीज संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांचीही न्या. भंडारी यांच्या फेरनिवडीच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका होती.

या यशाचे आणखी एक गमक म्हणजे शांततेसाठी भारताचे योगदान जगात मोठे आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक देशांमधून भारताने आपल्या शांतीसेना पाठवल्या आहेत.

यादवी किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन होण्याच्या स्थितीत भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. भारताच्या या भूमिकेचे जगभरातून कौतुक केले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर न्या. भंडारी यांची निवड ही भारताचे जगातील स्थान भक्कम होत असल्याचीच खूण आहे.

 

LEAVE A REPLY

*